अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:43 AM2019-05-20T00:43:46+5:302019-05-20T00:43:50+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर ...

The need for 'Kolhapur Pattern' for funeral | अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर करण्याचा पर्याय आता गावागावांत स्वीकारण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण वाचले पाहिजे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने कृतिशील पाऊल उचलल्यास ते निश्चितच अनुकरणीय होणार आहे.
हिंदू समाजामध्ये पार्थिव दहन करण्याची प्रथा आहे. यासाठी किमान १२ मण लाकडे अंत्यसंस्कारासाठी वापरली जातात. सध्या १५० ते १७५ रुपये मण दराने ही लाकडे आणली जातात. पावसाळ्यामध्ये वाळलेली लाकडे मिळतानाही अडचणी येतात. तसेच पावसामुळे स्मशानभूमीकडे ही लाकडे नेणे अडचणीचे ठरते.
एवढे करूनही रॉकेलच्या दोन बाटल्या, चार-पाच किलो मीठही सोबत न्यावे लागते. अग्नी दिल्यानंतर घरची मंडळी गेल्यानंतर मग लाकडांवर रॉकेल शिंपडून तसेच नंतर मीठ मारून नीट दहन होईल, अशी व्यवस्था केली जाते. जर लाकडे अर्धवट ओली असतील तर आणखी निराळ्याच अडचणी निर्माण होतात. अनेकांना हे लाकडांचे १८०० ते २००० रुपयेही देणे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
सध्या कोल्हापूरमध्ये महापालिका टेंडर काढून शेणींची खरेदी करते. एक शेणी ५0 पैशांना पडते. अनेकदा तरुण मंडळे लाखो शेणी स्मशानभूमीला दान देत असतात. हीच पद्धत ग्रामीण भागामध्येही वापरता येईल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर एवढ्या शेणी उपलब्ध होतात, तर ग्रामीण भागामध्ये त्या सहज उपलब्ध होणार आहेत.
सध्या ज्या पद्धतीने चिता रचण्यासाठी लाकडे लावली जातात, त्याच पद्धतीने हवा खेळती राहील अशा पद्धतीने शेणी लावल्या की पार्थिवाचे दहन होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अशी पद्धत अवलंबल्यामुळे एकीकडे लाकडेही कमी लागणार असून, त्यामुळे खर्चही कमी येणार आहे.

काय आहे
कोल्हापूर पॅटर्न...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मृतदेहांसाठी मोफत दहन व्यवस्था गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे. नगरसेवकांचे पत्र आणल्यानंतर या ठिकाणी मोफत दहन केले जाते. एका पार्थिवासाठी सुरुवातीला खाली तीन मणाचे मोठे कंडे ठेवले जातात. त्यावर पार्थिव ठेवल्यानंतर ४०० ते ५०० शेणींनी ते झाकले जाते. खाली लवकर तापणाऱ्या विटा असल्याने २० रुपयांचा कापूर शेणींवर ठेवून पेटविला की केवळ पंधरा मिनिटांमध्ये चिता पेटायला लागते. शेणींमधून खेळणाºया वाºयामुळे अग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थितपणे दहन होते.

रॉकेल नको की टायर नको
बहुतांश ठिकाणी अंत्यसंस्कारांवेळी रॉकेल आणि टायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लाकडे नीट वाळली नसतील तर चिता लवकर पेटत नाही. त्यासाठी मग गाड्यांचे टायर वापरले जातात. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर अंत्यसंस्कारांचे साहित्य देतानाच सोबत दोन-तीन सायकलींचे, गाडीचे टायरही दिले जातात. मात्र शेणींचा वापर केल्यास रॉकेल, टायर काहीही लागत नाही.
लाकडांचा खर्च २०००,
तर शेणींचा ७०० रुपये
अंत्यसंस्कारासाठी किमान १२ मण लाकडे लागतात. म्हणजे १८०० रुपये आणि ट्रॉलीचे भाडे असा २००० रुपये खर्च येतो; तर दुसरीकडे शेणी लावल्या तर तीन मण लाकडांचे ४५० रुपये आणि ५० पैशांना एक शेणी अशा ५०० शेणींचे २५० रुपये असे ७०० रुपयांमध्ये शेणी लावून अंत्यसंस्कार होऊ शकतात. या ठिकाणी विषय केवळ पैशांचा नसला तरी लाकडांच्या कमतरतेमुळे यापुढील काळात ही शेणींची पद्धत अवलंबणे आवश्यक ठरणार आहे.

Web Title: The need for 'Kolhapur Pattern' for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.