राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘मिशन यंग जनरेशन’-शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून साखरपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:30 AM2018-03-24T00:30:14+5:302018-03-24T00:38:44+5:30

सातारा : राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांची मोट बांधण्याचे वेगळे मिशन हाती घेतले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात

NCP leaders 'Mission Young Generation' - Shashikant Shinde, Shivendra Singh Bhojle | राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘मिशन यंग जनरेशन’-शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून साखरपेरणी

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘मिशन यंग जनरेशन’-शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून साखरपेरणी

googlenewsNext

सागर गुजर ।
सातारा : राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांची मोट बांधण्याचे वेगळे मिशन हाती घेतले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात क्रीडा स्पर्धा आयोजित करून या मिशनचा श्रीगणेशा या दोन्ही नेत्यांनी केला आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी राजकीय फासे टाकण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने २७ मार्च रोजी सातारा-मेढा-महाबळेश्वर-वाईमार्गे पुन्हा सातारा अशी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच कुडाळ (ता. जावळी) येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाने असलेले संघ या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मागील निवडणुकीत मोदी लाटेचा परिणाम सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात जाणवला होता. शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणांचे मतदान भाजपच्या उमेदवारांना झाले. ही परिस्थिती या निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन युवकांची मोट बांधण्याचे मिशन राष्ट्रवादीने हाती घेतले आहे.
नवमतदारांची आवड ओळखून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या मोहिमाच नेतेमंडळींनी हाती घेतल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने युवक एकत्र येतात. ‘इमेज ब्रँडिंग’ करण्याची नेत्यांसाठी हीच वेळ फलदायी ठरणारी असते. सुगीची कामे संपली आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षाही आता संपत आल्या आहेत. तसेच गावोगावच्या यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गावांमध्ये मोठी वर्दळ वाढू लागली आहे. युवावर्गासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांना मोठी गर्दी होते. या संधीचे सोने करण्यासाठी नेतेमंडळी तयारीला लागले आहेत.

कोण घेणार विकेट अन् कोण मारणार सिक्सर?
कुडाळ येथे आमदार शशिकांत शिंदे टायगर्स विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे ११११ या दोन संघांत २८ मार्च रोजी क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. या सामन्याची उत्सुकता लागून राहिलेले कार्यकर्ते कुडाळ गाठणार आहेत. या स्पर्धेत कोण घेणार विकेट अन् कोण मारणार सिक्सर? याची चर्चा सध्या भलतीच रंगली आहे.

Web Title: NCP leaders 'Mission Young Generation' - Shashikant Shinde, Shivendra Singh Bhojle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.