ठळक मुद्देजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले पानंद-शेत रस्ते मोकळे करण्यावर भर

कोल्हापूर, दि. ०७ :  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.


जनतेचे दैनंदिन प्रश्न आणि समस्यांची गावातच सोडविण्याच्यादृष्टीने जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले की, महाराजस्व अभियांनाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान करण्यावर भर दिला असून या अभियानातून गावागावात शिबिरांचे आयोजन करुन जनतेला लागणारे दाखले, प्रमाणपत्रे यासह अन्य अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, यामध्ये प्रामुख्याने गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला.

गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2015-2016 तसेच सन 2016-2017 या दोन वर्षात जिल्हयात 1 हजार 44 किलोमीटर लांबीच्या 877 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून जनतेसाठी रस्ते मोकळे करुन देण्यात आले आहेत.

यामध्ये करवीर तालुक्यात 219.04 कि.मी. लांबीचे 225 रस्ते, गगनबावडा तालुक्यात 26.50 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, पन्हाळा तालुक्यात 91.10 कि.मी. लांबीचे 68 रस्ते, शाहुवाडी तालुक्यात 18.52 कि.मी. लांबीचे 21 रस्ते, हातकणंगले तालुक्यात 62 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, शिरोळ तालुक्यात 21.85 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, राधानगरी तालुक्यात 83.20 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, कागल तालुक्यात 91.90 कि.मी. लांबीचे 65 रस्ते, भुदरगड तालुक्यात 58.50 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, आजरा तालुक्यात 75.21 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, गडहिंग्जल तालुक्यात 156.91 कि.मी. लांबीचे 91 रस्ते आणि चंदगड तालुक्यातील 138.90 कि.मी. लांबीचे 143 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून ते मोकळे करण्यात आले आहेत. यापुढेही ही मोहिम गतीमान करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.