मोदी आणि मोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:03 AM2019-05-25T00:03:53+5:302019-05-25T00:03:57+5:30

उदय कुलकर्णी ‘हर हर मोदी, घर घर मोदी‘ ही घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यात भारतीय जनता पक्ष व त्यांचे साथी यशस्वी ...

Modi and Modi | मोदी आणि मोडी

मोदी आणि मोडी

Next

उदय कुलकर्णी
‘हर हर मोदी, घर घर मोदी‘ ही घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यात भारतीय जनता पक्ष व त्यांचे साथी यशस्वी झाले आहेत. आता पुन्हा एकदा ‘मन की बात’ करण्यास नरेंद्र मोदींना आवश्यक ते स्वातंत्र्य मिळालं आहे. रीटा बहुगुणा म्हणाल्या होत्या की, ‘२०१९ची लोकसभा निवडणूक म्हणजे एकप्रकारे भारतात होत असलेली अध्यक्षीय लोकशाहीची निवडणूक आहे!’ निवडणुकीचे निकाल बाहेर पडून भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर सोशल मीडियामध्ये एक प्रतिक्रिया आली- ‘आजपर्यंत निवडून आलेले खासदार पंतप्रधानांची निवड करतात असं आम्ही समजत होतो, पण या निवडणुकीत पंतप्रधानांच्या करिश्म्याने खासदार निवडून आले आहेत!‘
निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा मोदी व अमित शहा या जोडीची एकाधिकारशाही प्रस्थापित होणार अशी भीती काही लोकांच्या मनात जागी झाली. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सोशल मीडियावरून देशाची राज्यघटना, देशातील लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कायम रहावे यासाठी देशाला व देशातील जनतेला उपहासपूर्ण शुभेच्छा दिल्या. कोणी म्हणालं, ‘विजयाला उन्मादाचा आणि पराभवाला नैराश्याचा स्पर्श नसावा.‘ कोणी म्हणालं, ‘देशाला अल्पसंख्याकांचा द्वेष करणारं सरकार हवं होतं, ते मिळालं! अभिनंदन!
कोणी काही म्हणालं, कोणी काही म्हणालं त्यातच काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा एखाद-दुसराच उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनं आणखी एक पाऊल पडलं याचा आनंद काँग्रेसद्वेष्ट्या मंडळींना झाला. महात्मा गांधींची काँग्रेस बरखास्त करण्याची इच्छा अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष पूर्ण करतो आहे अशी मल्लिनाथी काही भारतीय जनता पक्ष समर्थक समीक्षकांनी केली. एकीकडं अशा पद्धतीनं काँग्रेस मोडीत निघाल्याची चर्चा आणि देशात मोदीच सर्वेसर्वा अशी हवा तयार झाली असताना खरी मोडी मोडीत निघते आहे याचा मात्र सर्वांना विसर पडला आहे.
अगदी विसाव्या शतकापर्यंत मोडी ही मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. मराठीची धावती लिपी म्हणजे मोडी! काही इतिहासकारांच्या मते मोडी ही मौर्य (ब्राह्मणी) लिपीचाच प्रकार आहे. मोडीमधील सर्वात जुना उपलब्ध लेख ११८९ सालचा आहे. राजा रामदेवराय, राजा महादेवराय, राजा हरपालदेव यादव यांच्या कालखंडात प्रामुख्याने मोडी लिपीचा प्रसार झाला. यादवांचे प्रधान हेमाडपंत (इसवी सन १२६० ते १३०९) यांना मोडी लिपी लोकाभिमुख करण्याचं श्रेय जातं. मोडीमध्ये अनेक शब्दांचं लघुरूप लिहिलं जातं. गोलाकार अक्षरांची वळणं आणि लपेट्यांमुळे ही लिपी दिसतानाही सुंदर दिसते. मोडी लिपीची साधारणत सहा कालखंडात विभागणी करण्यात येते. हे सहा कालखंड असे-आद्यकालीन, यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन व आंग्लकालीन.
आद्यकालीन शैलीतील मोडी लिपी बाराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर यादव साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडापर्यंत यादवकालीन मोडी अस्तित्वात राहिली. चौदाव्या ते सोळाव्या शतकाच्या कालावधीत बहामनीकालीन मोडी वापरात होती, तर छत्रपती शिवरायांच्या कालखंडात शिवकालीन मोडी लिपी अस्तित्वात आली. पेशव्यांच्या कालखंडात बोरूने मोडी लिपी लिहिली जात असे. ही मोडी लिपी रेखीव, गोलाकार, तिरकस आणि अधिक सुटसुटीत होती. एकोणिसाव्या शतकाची सुरूवात ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आंग्लकालीन मोडी लिपी वापरली जात असे. ही लिपी पेनानं लिहिली जायला लागली आणि छपाई यंत्रांचा वापर मोडीच्या छपाईसाठी सुद्धा होऊ लागला. तथापि, छपाईसाठी मोडी अवघड जात असल्यानं देवनागरी लिपीच मराठीसाठी वापरण्याची ब्रिटिशांनी सक्ती केली आणि हळूहळू मोडी लिपीला घरघर लागत गेली. १९६० सालापर्यंत मोडी लिपीचा प्राथमिक अभ्यासक्रमात समावेश होता, पण त्यानंतर अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आणि आता मोडी भाषेतील कागदपत्रे वाचण्यासाठी व त्यांच्या संशोधनासाठी माणसं मिळणं दुर्मिळ होऊन बसलं आहे. न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षं रेंगाळत पडलेल्या असंख्य खटल्यांमध्ये जुन्या काळातील कागदपत्रं मोडी भाषेत असल्यानं निकाल देण्यामध्ये अडचणी येत आहेत. सुदैवानं आता काही लोकांना मोडीचं महत्त्व जाणवत आहे आणि त्यामुळं मोडी लिपी डॉट कॉम सारख्या वेबसाईटस् मोडीच्या प्रसारासाठी बनल्या आहेत. ऐतिहासिक मोडी लिपीला आता आधुनिक तंत्रज्ञानाचाही स्पर्श झाला आहे. ‘सी-डॅक‘नं१ मोडीसाठी एक अ‍ॅप विकसित केला आहे, तर नाशिकमधील मोडी लिपीचे मार्गदर्शक सोज्वल साळी यांनी मोडी लिपी व्हॉटस् अप च्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. मोडी जगवण्याचे आणि तिच्या प्रसाराचे असे प्रयत्न नव्यानं होत असले तरी ते अपुरे आहेत. महाराष्टÑात ९०० वर्षं प्रचलित असलेल्या मोडी लिपीतील कागदपत्रांमध्ये खरं तर अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा दडलेला आहे. तो उजेडात येण्यासाठी मोडी जगवायला हवी आणि जास्तीत जास्त अभ्यासकांनी ती जाणायला हवी!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Web Title: Modi and Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.