वारणा’प्रश्नी मंत्रालयातील बैठक निष्फळ - तज्ज्ञ समिती नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:00 AM2018-05-23T01:00:58+5:302018-05-23T01:00:58+5:30

The meeting of the 'Waray' question meeting will be fruitless - the expert committee will be appointed | वारणा’प्रश्नी मंत्रालयातील बैठक निष्फळ - तज्ज्ञ समिती नेमणार

वारणा’प्रश्नी मंत्रालयातील बैठक निष्फळ - तज्ज्ञ समिती नेमणार

Next

इचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजी शहरासाठी पाणी आणण्याबाबत शहर विरुद्ध ग्रामीण असा निर्माण झालेला वाद मिटवून त्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबन लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने २८ मे नंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. त्यापूर्वी तज्ज्ञ समिती नेमून चार दिवसांत कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार आहे.

या समितीमार्फत सर्व बाबी समजावून घेऊन समन्वयाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पंचगंगा नदी प्रदूषण व कृष्णा योजनेची दुरुस्ती या विषयावरही बैठकीमध्ये चर्चा झाली. दरम्यान, दानोळी (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांवर योजनेच्या प्रारंभावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यावरून आमदार उल्हास पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वाद-विवाद झाल्याने बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता.

सुरुवातीला आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीला शहराला ६६ एमएलडी पाण्याची गरज असताना ३२ टक्के इतका अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने आठ दिवसांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आवश्यक पाण्यासाठी काळम्मावाडीतून योजना राबविण्यात येणार होती; पण त्यासाठी मोठा खर्च असल्याने ती मागे पडली. दरम्यान, शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार वारणा योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर वारणाकाठावरील शेतकऱ्यांनी गैरसमजुतीतून विरोध सुरू केला. प्रत्यक्षात नदीत पाणी शिल्लक राहणार असल्याने विरोध का केला जातो, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात विरोध होण्याची ही पहिलीच घटना आहे. वेळेत योजना पूर्ण न झाल्यास निधी परत जाईल. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले.

नगराध्यक्ष अलका स्वामी म्हणाल्या, चार लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पंचगंगा नदीचे प्रदूषण व कृष्णा योजनेची गळती यामुळे पाणी-पाणी करावे लागत आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने ही योजना मंजूर केली आहे; पण गैरसमजुतीतून नदीकाठच्या नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. पाण्यासाठी नाही न म्हणता इचलकरंजीला पाणी द्यावे, असे भावनिक आवाहन केले.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आम्हाला संघर्षातून नव्हे, तर समन्वयातून पाणी हवे आहे. वारणाकाठावरील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यातून सर्वमान्य तोडगा काढून पाणी द्यावे. त्याचबरोबर पंचगंगा नदीकाठावरील इतर गावातील ग्रामस्थांचाही विचार व्हावा. नदी प्रदूषण कमी करणे व नदी प्रवाही ठेवणे यालाही प्राधान्य द्यावे.
वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, वारणा धरण बांधताना निश्चित केलेली उद्दिष्टे शासनाने आजपर्यंत पाळलेली नाहीत. नदीकाठावरील अनेक गावांना पिण्याचे पाणी नाही. २५ हजार एकर शेतीला पाणी मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. वारणा योजनेचा खर्च पंचगंगा प्रदूषण निवारणासाठी वापरल्यास हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना शुद्ध पाणी मिळेल.

रोग झाल्यावर उपचार करण्याऐवजी तो होऊ नये, यासाठी उपाय करावेत. रावसाहेब भिलवडे यांनी पिण्याचे पाणी देण्यास विरोध नाही; पण पर्याय असताना वारणेचा अट्टाहास का? आमदार सुजित मिणचेकर यांनी वारणेसाठी ७० कोटी खर्च करण्यापेक्षा कृष्णा योजना दुरुस्त करून इचलकरंजीची तहान भागवावी. तसेच पंचगंगा नदी स्वच्छ करून प्रवाही ठेवल्यास तेही पाणी वापरता येईल, असे मत व्यक्त केले.

 



गैरसमज दूर केले जातील
वारणा योजनेबाबत सर्व प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी व वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभाग, तसेच इचलकरंजी नगरपालिकेचे आराखडे तयार करणारे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती स्थापन करून माजी मंत्री विनय कोरे व एन. डी. पाटील, तसेच वारणा बचाव समितीच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घ्यावी. या समितीमध्ये इचलकरंजीच्यावतीने नगराध्यक्ष अलका स्वामी यांचाही समावेश राहणार आहे. या समितीने योजनेची वस्तुस्थिती समोर आणावी व गैरसमज दूर करावेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चक्री उपोषणाचाआठवा दिवस
इचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस होता. सुरू असलेल्या चक्री उपोषणामध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका शकुंतला मुळीक, नगरसेवक राजू खोत, आदींसह भागातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाला दिवसभरात कोल्हापूर जिल्हा सहकारी पॉवरलूम असोसिएशन, मराठा मंडळ, इचलकरंजी चंद्रभागा महिला बचत गट, कंजारभाट समाजाचे जयराज भाट, आदींसह विविध संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी आजी-माजी नगरसेवक सहभागी झाले होते.

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा ‘वारणा’ योजनेला पाठिंबा
इचलकरंजी : वारणा योजनेप्रश्नी प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या चक्री उपोषणाला येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी पाठिंबा दिला. वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी मिळावे, यासाठी पुरोगामी पेपर विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व विक्रेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन सहभाग नोंदविला. यावेळी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अण्णाप्पा गुंडे, माजी अध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी, सदाशिव पाटील, भालचंद्र कांबळे, नारायण शिंदे, शिवानंद रावळ, अमोल मुसंडे, महेश बावळे, विजय वार्इंगडे, महादेव चिखलकर सहभागी झाले होते.

इचलकरंजीच्या वारणा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबन लोणीकर यांच्यासोबत मंगळवारी संयुक्त बैठक झाली. यावेळी विनय कोरे, उल्हास पाटील, एन. डी. पाटील, सुजित मिणचेकर, राजू शेट्टी, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, निवेदिता माने, अलका स्वामी, महादेव धनवडे, रावसाहेब भिलवडे, अशोक स्वामी, डॉ. प्रशात रसाळ, श्रीनिवास घाटगे, आदी उपस्थित होते.

Web Title: The meeting of the 'Waray' question meeting will be fruitless - the expert committee will be appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.