‘अनिकेत’चा १७ व्या वर्षी ४९ लाखांचा मास्टर स्ट्रोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:41 AM2018-06-18T00:41:06+5:302018-06-18T00:41:06+5:30

Master Stroke of Rs. 49 lakhs for 'Aniket' on the 17th year | ‘अनिकेत’चा १७ व्या वर्षी ४९ लाखांचा मास्टर स्ट्रोक

‘अनिकेत’चा १७ व्या वर्षी ४९ लाखांचा मास्टर स्ट्रोक

Next

सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : फुटबॉलचे अफाट कौशल्य आणि जिद्द या जोरावर कोल्हापूरचा व सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघातील स्ट्रायकर अनिकेत जाधव यास जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. याकरिता त्याला ४९ लाखांचे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.
आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो जमशेदपूर एफसी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या वर्षी त्याने भारतात प्रथमच भरलेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. वयाच्या १७ व्या वर्षी अनिकेतने भारतीय फुटबॉल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे त्याला भारतातील अनेक नामांकित संघांकडून करारबद्ध होण्यासाठी मागणी वाढली आहे.
युवा विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारतीय फुटबॉल महासंघाच्या इंडियन अ‍ॅरो संघाकडून आयलीग स्पर्धेत खेळला. त्यातही त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. या स्पर्धेतही त्याने गोल करण्यात आघाडी घेतली होती. त्याच्या एकूणच या कामगिरीची दखल घेऊन जमशेदपूर फुटबॉल संघाने त्याला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ४९ लाख रुपयांच्या पॅकेजची आॅफर दिली. त्यानुसार या प्रस्तावास अनिकतने होकारही दर्शविला आहे. जमशेदपूर संघाकडून खेळण्याच्या कराराच्या तांत्रिक बाबी येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. त्यानुसार तो ४९ लाखांच्या करारावर स्वाक्षरी करणार असून, दोन वर्षे या संघातून तो खेळण्यास करारबद्ध असणार आहे.
यापूर्वी कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉपटू गोलरक्षक सुखदेव पाटील यालासुद्धा दिल्ली डायनामोज एफसी संघाने ४७ लाखांच्या पॅकेजवर करारबद्ध केले आहे. यासह निखिल कदम हाही देशातील अव्वल संघ कोलकात्याच्या मोहन बागानकडून चांगल्या मानधनावर खेळत आहे. त्यात आता अनिकेतची भर पडेल. एकूणच कोल्हापूरचा फुटबॉल या तिघांच्या रूपाने देशभरात पोहोचणार आहे.

जमशेदपूर एफ.सी.कडून आलेल्या प्रस्तावास मी होकार दिला आहे; परंतु अद्यापही करार झालेला नाही. हा करार येत्या काही दिवसांत होईल आणि मी त्या संघाकडून खेळेन.
- अनिकेत जाधव,

Web Title: Master Stroke of Rs. 49 lakhs for 'Aniket' on the 17th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.