ठळक मुद्देशाहूनगरीच्या परंपरेला गालबोट दोन्ही जमाव आमनेसामनेअन् हिंदुत्ववादी उतरले रस्त्यांवरबिंदू चौकात चाळीस दुचाकींचे नुकसानस्वयंभू गणेश मंदिर परिसरात धुमश्चक्री

कोल्हापूर : संपूर्ण देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत बुधवारी केवळ अघटितच घडले नाही, तर येथील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेलाही काळिमा फासणारी घटना घडली.

भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी अक्षरश: धुडगुस घालीत बंद असलेल्या दुकानांवर, वाहनांवर, पोलिसांवर प्रचंड दगडफेक करून कायदा हातात घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हातात दांडकी घेऊन प्रतिमोर्चा काढला. तसेच रस्त्यांवर लावलेल्या वाहनांची वेचून तोडफोड केली.

दुपारपर्यंत शहराच्या सर्वच रस्त्यांवर मोर्चे, दगडफेक, घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीमार झाल्यामुळे शहरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले. शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

कोल्हापूरला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा आहे. याच विचारांचा पुरस्कार करणारे कार्यकर्ते मात्र बुधवारी हिंसक बनले आणि त्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरले. एवढेच नाही तर भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तीन ठिकाणी समोरासमोर आल्याने एकमेकांवर दगडांचा वर्षाव झाला. यातून पोलीस कर्मचारी, अधिकारीही सुटले नाहीत.पोलिसांना प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी जोरदार लाठीमार करावा लागला. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची वाहनेही जमावाच्या तावडीतून सुटली नाहीत. शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुधवारच्या दंगलीत नुकसान झाले.
भीमा कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद मंगळवारीच (दि. २) कोल्हापुरात उमटले.

या घटनेचा निषेध करण्याकरिता जिल्ह्यातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी बुधवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली. आंबेडकरवादी समाजाच्या सर्वच स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत बिंदू चौक येथून सकाळी साडेनऊ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शिवाजी पुतळा, जोतिबा रोड, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, तटाकडील तालीम, रंकाळवेश, गंगावेश, महापालिका, चिमासाहेब चौक, दसरा चौकजवळ आला. तो साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिंदू चौकात पोहोचला.

त्यावेळी शहराच्या विविध भागांतून आलेल्या जवळपास पाच ते सात हजार भीमसैनिकांचा जमाव बिंदू चौकात जमला होता. तो पुन्हा शिवाजी पुतळ्यामार्गे भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाद्वार रोडकडे गेला. या जमावावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शिवाजी चौकापासून दगडफेकीला सुरुवात झाली. भाऊसिंगजी रोड, गुजरी, जोतिबा रोडवरील शेकडो दुचाकी वाहने जमावाने पाडून त्यांवर दगड घातले.

जमावातील तरुण बंद दुकानांवर दगड फेकत होते. दुकानांचे फलक तोडत होते. जोतिबा रोडवरील फूलविक्रेत्यांचे साहित्य भिरकावत होते. पुढे हा जमाव गुजरी कार्नरला आला. एक जमाव जोतिबा रोडने महाद्वार रोडवर आला.
 

दगडफेक सगळीकडेच सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी दगडफेक करण्यापासून जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला; पण जमावाने उलट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनीही नंतर लाठीचार्ज करून जमावाला पांगविले. त्यांतील काही तरुण भाऊसिंगजी रस्त्याकडे गेले, तर काहींचा जमाव पापाच्या तिकटीकडे गेला.

अन् हिंदुत्ववादी उतरले रस्त्यांवर

महाद्वार रोडवरील मोहन रेस्टॉरंटजवळ बजरंग दलाचा फलक असून त्यावर जमावाने दगडफेक केली. तसेच अंबाबाई मंदिराभोवती बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य फेकले गेले. मंदिराच्या परिसरात प्रक्षुब्ध भीमसैनिकांनी धुडगुस घालण्यास सुरुवात केल्यानंतर शहरात अफवांचे पीक पसरायला लागले. त्यामुळे दुपारी पावणेबारा वाजल्यापासून संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्तेही महाद्वार रोडवर गोळा होऊ लागले.

बघता-बघता ही गर्दी काही हजारांच्या घरात गेली. त्याचवेळी चारशे ते पाचशे भीमसैनिकांचा जमाव कसबा गेटजवळ थांबून होता. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने कूच करताच पोलिसांनी त्यांना रोखले. ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी महाद्वार रोड दणाणून गेला.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर जमावात येऊन मिसळताच जमावाला प्रोत्साहन मिळाले. घोषणाबाजीला अधिकच चेव चढला. नंतर आमदार क्षीरसागर, रविकिरण इंगवले, बंडा साळोखे, विजय करजगार, कुलदीप गायकवाड, महेश उरसाल, तानाजी पाटील, आदी कार्यकर्ते जमावाला घेऊन शिवाजी चौकात पोहोचले. तेथे छत्रपतींच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घातला.

बिंदू चौकात चाळीस दुचाकींचे नुकसान

शिवाजी चौकात हजारो हिंदुत्ववाद्यांसमोर बोलताना आमदार क्षीरसागर यांनी शांततेत प्रतिमोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर तेथून हा प्रतिमोर्चा प्रथम बिंदू चौकात गेला. खबरदारी म्हणून पोलिसांनी शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या भीमसैनिकांना आधीच अन्य मार्गांनी वळविले होते.

हिंदुत्ववादी कार्यकर्ते अधिकच संतप्त होते. बिंदू चौकात लावलेल्या दुचाकी या भीमसैनिकांच्या आहेत असे समजून जमावाने सुमारे चाळीस ते पन्नास दुचाकींवर हल्ला चढविला. त्यावर मोठे दगड घालून बहुतेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही दुचाकी तर उचलून आपटण्यात आल्या.

पोलिसांची फौज असतानाही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. वाहने फोडल्यानंतर जमाव दोन गटांत विभागला गेला. एक जमाव मिरजकर तिकटीकडे, तर दुसरा पद्मा टॉकीजमार्गे लक्ष्मीपुरीकडे गेला. यावेळी असंख्य हिंदुत्ववाद्यांच्या हातांत काठ्या, दांडकी होती. अनेकांनी कपाळावर भगवे नाम ओढलेले होते.

स्वयंभू गणेश मंदिर परिसरात धुमश्चक्री

दसरा चौकात थांबलेला भीमसैनिकांचा जमाव लक्ष्मीपुरीकडे, तर बिंदू चौकाकडून दसरा चौकाकडे जाणारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जमाव आमनेसामने येणार अशी एकवेळ परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी महत्प्रयासाने लोखंडी बॅरिकेट्स टाकून स्वयंभू गणेश मंदिराजवळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना रोखले. त्यातूनही शेकडो कार्यकर्ते ‘सत्यवादी भवन’पर्यंत धावले आणि समोरासमोर एकमेकांना भिडले. त्याच वेळी एक गट लक्ष्मीपुरीतून आला.

एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तसेच हातांत असलेल्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा वर्षाव झाला. जमाव एकमेकांशी भिडताच पोलिसांचा संयम या ठिकाणी सुटला. दोन्ही बाजंूच्या जमावावर बेछूट लाठीमार सुरू केला. दिसेल त्याला पोलिसांनी ठोकून काढले. यावेळी अनेक जण खाली कोसळले. तेथे मोठी पळापळ झाली. या रस्त्यावर दगड, चपलांचा ढीग पडला होता.

 


Web Title: Massive rock carts in Kolhapur: Vehicle breach: Police lathamar: tear gas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.