पक्षीय निष्ठेला महाडिक कुटुंबियांकडून कायमच तिलांजली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:58 AM2019-03-09T00:58:10+5:302019-03-09T01:03:27+5:30

कोल्हापुरातील महाडिक हे सर्वपक्षीय कुटुंब आहे. पक्षीय निष्ठेला हे कुटुंब कधीच महत्व देत नाही. त्यामुळे ज्या पक्षांने आपल्या राजकीय सत्तेची संधी दिली त्या पक्षाशी प्रतारणा करून सोयीचे राजकारण करण्याचा या कुटुंबाचा आजपर्यंतचाच अनुभव

Mahadik family permanently abstained with party loyalty ...! | पक्षीय निष्ठेला महाडिक कुटुंबियांकडून कायमच तिलांजली...!

पक्षीय निष्ठेला महाडिक कुटुंबियांकडून कायमच तिलांजली...!

googlenewsNext

-विश्र्वास पाटील-

कोल्हापूर  : कोल्हापुरातील महाडिक हे सर्वपक्षीय कुटुंब आहे. पक्षीय निष्ठेला हे कुटुंब कधीच महत्व देत नाही. त्यामुळे ज्या पक्षांने आपल्या राजकीय सत्तेची संधी दिली त्या पक्षाशी प्रतारणा करून सोयीचे राजकारण करण्याचा या कुटुंबाचा आजपर्यंतचाच अनुभव असून त्याचेच प्रत्यंतर येथे गुरुवारी झालेल्या महिला मेळाव्यात झाले. या मेळाव्यात भाजपच्या चिन्हांवर निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांचे विकास काम चांगले असल्याने तुम्ही त्यांना पाठबळ देवून विजयी करा असे आवाहन केले. महाडिक गट हाच एक पक्ष असून आम्ही ठरवू तेच लोक मान्य करतात व गट म्हणून ताकद असल्याने राजकीय पक्षही आमच्या मागून येतात असाच हा व्यवहार आहे. परंतू या निवडणूकीत पक्षीय निष्ठा हाच कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे.  

शौमिका महाडिक या स्वत: तर कमळ चिन्हांवर निवडून आल्या आहेतच परंतू त्यांचे पती अमल महाडिक हे देखील भाजपचे आमदार आहेत. राज्याच्या राजकारणात भाजप व शिवसेनेची अधिकृत युती झाली आहे. कोल्हापूरची जागा युतीत शिवसेनेला आहे. या पक्षाकडून संभाव्य उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांचा प्रचाराचा नारळही दोन दिवसांपूर्वी मुरगूड येथे भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडला आहे. त्यांनी या कार्यक्रमात माझ्या पत्नीला जरी राष्ट्रवादी काँग्रेसने यदाकदाचित उमेदवारी दिली तरी मी तिच्यासोबत सकाळी चहा-नाष्टा करेन परंतू प्रचार मात्र युतीच्याच उमेदवारांचा करेन असे सांगून पक्षीय निष्ठा काय असते याचा दाखला घालून दिला आहे. असे असताना अध्यक्षा महाडिक यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या उमदेवाराचा प्रचार करणे यावरून महाडिक कुटुंबीयांची पुढील राजकीय दिशा काय असू शकेल हेच स्पष्ट होते. त्या जर एवढ्या उघडपणे राष्ट्रवादीला मते देण्याचे आवाहन करत असतील तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राहणार हे स्पष्टच आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीतही हाच अनुभव महाडिक कुटुंबियांकडून लोकांना आला होता. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे तत्त्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला. परंतू पुढे लगेच विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भाजपकडून अमल महाडिक हे रिंगणात उतरले व त्याच्या प्रचारासाठी खासदार महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक सक्रीय झाल्या होत्या. त्यावेळीही असाच टीकेचा सूर उमटल्यानंतर त्यांनी थेट प्रचारात सहभागी होणे टाळले होते. त्यावेळी दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना व काँग्रेसच्या आमदारांनी लोकसभेला खासदार महाडिक यांना मदत केली असतानाही चार महिन्यांत त्या त्यांच्याच विरोधात दिराच्या निवडणूकीत भाजपच्या प्रचारात उतरल्या होत्या. आता अध्यक्षा शौमिका महाडिक या भाजपच्या असतानाही त्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या दीराच्याच प्रचारासाठी सक्रीय झाल्या आहेत.

माजी आमदार महादेवराव महाडिक हे एकेकाळी काँग्रेसचे आमदार होते. त्या पक्षांने त्यांना तब्बल १८ वर्षे विधानपरिषद निवडणूकीची संधी दिली. तरीही त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या निवडणूकीत दोन्ही काँग्रेसच्या विरोधात भाजपशी संधान बांधून ताराराणी आघाडी रिंगणात उतरवली. आता राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे राजकारण भाजपला मोठे करण्याचे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपची ताकद वाढवायची असल्याने त्यांना महाडिक गटाची ताकद हवी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक गट भाजप सोबत असला तरी त्या पक्षालाही ते कसे सोयीनुसार बायपास करू शकतात हेच आता सुरु असलेल्या घडामोडींवरून दिसत आहे. खासदार धनंजय महाडिक यांना उत्तम प्रतिमा, लोकसभेतील छाप पाडण्यासारखे काम, चांगले संघटन, विकास कामांचे बळ अशा अनेक चांगल्या बाजू पाठिशी असताना सध्या सगळ््यात जास्त त्रास होत आहे तो पक्षीय निष्ठेचाच. साडेचार वर्षे दोन्ही काँग्रेसला सोबन न घेता ते पुढे धावत राहिले. त्यामुळे ते पुढे गेले परंतू पक्ष आणि कार्यकर्तेही फारच मागे राहिले. आता निवडणूकीत पक्ष, कार्यकर्ते व खासदार यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करणे हेच त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या आव्हानांस ते कसे सामोरे जातात यावरच त्यांचा गुलाल निश्चित होणार आहे.

 

Web Title: Mahadik family permanently abstained with party loyalty ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.