मराठा आरक्षणाच्या लढ्यात लोकमत ‘सारथी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:22 AM2019-06-28T01:22:09+5:302019-06-28T01:27:57+5:30

मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये ‘लोकमत’चाही मोठा वाटा राहिला आहे. खुद्द आंदोलकांनीच ‘लोकमत’च्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यभरातील मराठा मोर्चानंतर कोल्हापुरात १५ आॅक्टोबर २0१६ रोजी भव्य असा मराठा मोर्चा काढण्यात आला.

 Lokmat 'Sarathi' in the fight for Maratha reservation | मराठा आरक्षणाच्या लढ्यात लोकमत ‘सारथी’

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आंदोलकांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास गुरुवारी भेट देऊन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अनिल घाटगे, राजू सूर्यवंशी, अजय इंगवले, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देआंदोलनाला पाठबळ : बार्टी, सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळाबाबत पाठपुरावा

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये ‘लोकमत’चाही मोठा वाटा राहिला आहे. खुद्द आंदोलकांनीच ‘लोकमत’च्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यभरातील मराठा मोर्चानंतर कोल्हापुरात १५ आॅक्टोबर २0१६ रोजी भव्य असा मराठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने राज्यभर हवा निर्माण केली; परंतु याबाबत सरकार नेमके काय पाऊल उचलणार याची कोणतीच कल्पना येत नव्हती. अशातच शासनाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती ‘लोकमत’ला मिळाली.

‘बार्टी’ या संस्थेच्या धर्तीवर मराठा समाजातील मुलामुलींसाठी प्रशिक्षण संस्था राज्य शासन स्थापन करणार असल्याचे वृत्त पहिल्यांदा १७ आॅक्टोबर २0१६ रोजी केवळ ‘लोकमत’ने दिले. त्यानंतर या संस्थेची स्थापना, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, निधी देण्यास लागलेला विलंब या प्रत्येक टप्प्यावर ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला.

आरक्षणाच्या मागणीवर जे पर्याय पुढे आले त्यामध्ये ‘सारथी’ संस्थेची उभारणी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची तरतूद अतिशय तोकडी असल्यापासून ते असुविधांबाबतही ‘लोकमत’ने आवाज उठविला त्यामुळे तरतूदही वाढविण्यात आली.
‘लोकमत’ने बार्टी या संस्थेला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली होती. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन डिसेंबर २0१६ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये या संस्थेची आणि संस्थेला शाहू महाराजांचे नाव दिल्याची घोषणा केली.

चंद्रकांत पाटील, संभाजीराजेंचा खास उल्लेख
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे निवेदन केले त्यामध्ये त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे यांचा खास नामोल्लेख केला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची स्थापना केली होती. पाटील यांनी या कामामध्ये झोकून दिले होते, तर मुंबईतील मोर्चावेळी प्रचंड जनसमुदायासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू केवळ कोल्हापूरच्याच खासदार संभाजीराजे यांनीच मांडली होती; त्यामुळे विधानभवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांचा उल्लेख केला.


‘लोकमत’तर्फे आंदोलकांचे पेढे वाटून अभिनंदन

कोल्हापूर : मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आभार मानण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांचे ‘लोकमत’तर्फे पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे ‘लोकमत’चे आभार मानण्यासाठी वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते शहर कार्यालयामध्ये आले होते. यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी मुळीक यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केले.

वसंतराव मुळीक म्हणाले, आमच्या कोल्हापूर येथील आंदोलनाचा राज्यभर दबाव निर्माण करण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. ‘सारथी’ संस्थेच्या स्थापनेचे पहिले वृत्त देण्यापासून निधी मंजुरीपर्यंतचा पाठपुरावा करण्याचेही काम केले. आता ‘सारथी’चे उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात व्हावे, अशी आमची मागणी असून, त्यालाही आता पाठबळ मिळावे.
मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गनी आजरेकर म्हणाले, यापुढे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. अनिल घाटगे म्हणाले, मराठा समाजाला दाखले मिळविताना अडचणी येत आहेत. निवासी पुराव्याचीच मागणी केली जाते. यामध्ये सुलभता आणण्याची गरज आहे. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, अजय इंगवले, रवींद्र पाटील, किरण पडवळ, शरद साळोखे, उद्धव पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title:  Lokmat 'Sarathi' in the fight for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.