Lok Sabha Election 2019 काँग्रेसच्या स्टार नेत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:58 AM2019-04-16T00:58:01+5:302019-04-16T00:58:17+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रचारासाठी वानवा भासत असल्याचे चित्र दिसत ...

Lok Sabha Election 2019 Lessons of Congress Leaders | Lok Sabha Election 2019 काँग्रेसच्या स्टार नेत्यांची पाठ

Lok Sabha Election 2019 काँग्रेसच्या स्टार नेत्यांची पाठ

Next

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रचारासाठी वानवा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वत:च्या मतदारसंघात अडकून पडले आहेत आणि जनमाणसांवर प्रभाव पाडेल, असा उत्तम वक्ता काँग्रेसकडे नसल्याने राज्यात सगळीकडेच ही समस्या भासत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातील अंतर्गत संघर्षाचीही त्यास झालर आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दहापैकी सोलापूर आणि पुणे या दोनच जागा काँग्रेस लढवत आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्या आघाडीचा स्वाभिमानी पक्षही घटक आहे. त्यामुळे जिथे राष्ट्रवादी व ‘स्वाभिमानी’चे उमेदवार रिंगणात आहेत, तिथे प्रचारासाठी मित्रपक्षांच्या नेत्यांनाही मागणी आहे; परंतु काँग्रेसकडून सुषमा अंधारे वगळता एकाही राज्यस्तरावरील प्रमुख नेत्यांची सभा या मतदारसंघात झालेली नाही. या घडीला लोकांवर प्रभाव टाकेल व ज्यांची भाषणे ऐकायला लोक जमतील असा एकही नेता प्रदेश काँग्रेसकडे नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याने ते मुलाच्या प्रचारात गुंग आहेत. काँग्रेस विदर्भात जास्त जागा लढवत आहे व तिथे काही जागांवर त्या पक्षाची स्थिती चांगली असल्याने त्या जागांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गेली दोन दिवस औरंगाबाद व अकोला मतदारसंघांत प्रचारासाठी गेले होते. त्यांना जो उमेदवार सभेला बोलावेल त्या उमेदवाराला काँग्रेसकडून निधी कमी मिळत असल्याची चर्चा आहे.
राहुल किंवा प्रियांका गांधी यांची सभा किंवा एखादा रोड शो तरी पश्चिम महाराष्ट्रात व्हावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे; परंतु त्याबद्दल राज्यस्तरावरूनही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शरद पवार यांनाही परवा पत्रकारांनी त्याबद्दल विचारल्यावर त्यांनी थेट उत्तर न देता उद्वेग व्यक्त केला.
पी. एन. व आवाडे यांचाच काय तो आधार
कोल्हापुरात तरी राष्ट्रवादीला आता प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचाच मोठा आधार वाटत आहे. ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे स्टार प्रचारक झाले आहेत. तिकडे हातकणंगले मतदारसंघात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांची मदत होत आहे; पण गंमत अशी की आवाडे यांना मानणारा कोल्हापूर मतदारसंघात व पी. एन. यांना मानणारा हातकणंगले मतदारसंघात फारसा वर्ग नाही. त्यामुळे ते ही एकाच मतदारसंघांत अडकले आहेत. आमदार सतेज पाटील हे काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा घेण्यात अनेक जोडण्या लावत होते, परंतु तेच या निवडणुकीत विरोधात असल्याने सगळेच घोडे अडले आहे. त्यामुळेही राज्यस्तरावरील कोण नेते इकडे फिरकायला तयार नसल्याचे चित्र दिसते.

Web Title: Lok Sabha Election 2019 Lessons of Congress Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.