थेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:52 AM2019-05-10T11:52:30+5:302019-05-10T11:55:53+5:30

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

Live pipeline scheme: Water purification center test in June | थेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

थेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

googlenewsNext
ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीइंटकवेल, जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करणार

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

योजनेचे काम समाधानकारक नसल्याबद्दल तसेच कामाचा बार चार्ट सुकाणू समितीला दिला नसल्याबद्दल कंपनीच्या तसेच सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांची भाजपचे गटनेते विजयराव सूर्यवंशी, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अजित ठाणेकर यांनी चांगलीच कानउघाडणी केली. ‘कामाचा बार चार्ट एक महिन्यात देण्याचे ठरले असतानाही तुम्ही दिला नाही. तुम्ही आमची चेष्टा करताय का?’ अशी विचारणा प्रा. पाटील यांनी केली. ‘काम होणार आहे की नाही आणि होणार असेल तर कधीपर्यंत होईल, हे एकदा सांगून टाका,’ अशी सूचना हसिना फरास यांनी केली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपणाला मागच्या बैठकीचा इतिवृत्तान्त आताच मिळाल्याचे सांगताच नगरसेवक, पदाधिकारी आणखी भडकले. हेडवर्क जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत योजना पूर्णत्वाकडे जाणार नाही, हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याची ठोस माहिती द्या, अशी सर्वच सदस्यांनी केली.

यावेळी प्रकल्प प्रमुख राजेंद्र माळी यांनी हेडवर्कची कामे सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण होतील अशी माहिती दिली. त्यांची बाजू उचलून धरत युनिटी कन्सल्टन्सीचे महेश पाठक यांनी खुलासा केला की, धरणक्षेत्रात काम करण्यास अद्याप ६५ दिवस आपणास मिळणार आहेत. तसेच तयार केलेल्या बार चार्टचा विचार केला तर उपलब्ध कालावधीत हे काम नक्की पूर्ण होईल.

जलवाहिनी जोडकामाच्या तपासणीबाबत अजित ठाणेकर यांनी संशय उपस्थित केला. वेल्डिंग करतानाचे चित्रीकरण करण्यात आलेले नाही, तसेच ते मजबूत झाले की नाही याची खात्री कोणीच देत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. १३ कोटींचे उपसा पंप घेण्यात केलेली घाई तसेच विद्युत पुरवठ्याचा विषयही ठाणेकर यांनी उपस्थित केला. त्यावरही बैठकीत बरच खल झाला.

विनाखंडित विद्युत पुरवठ्यासंदर्भात मंजूर आराखड्यानुसार बिद्री उपकेंद्रातून एक लाईन घेण्याचे तसेच दुसरा पर्याय असणाºया राधानगरी उपकेंद्रातून लाईन घेण्यास राज्य व केंद्र सरकारकडून मंजुरी घेण्याचे बैठकीत ठरले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपसा पंपाबाबत अधिकारी ठाम

जॅकवेलवर पाणी उपशाकरिता व्हर्टिकल पंप बसविण्यात येणार आहेत; परंतु अजित ठाणेकर फ्लोटिंग पंप बसवा, असा आग्रह करीत होते. मात्र व्हर्टिकल पंपच टिकाऊ आणि कार्यक्षम असल्याचा दावा राजेंद्र माळी यांनी केला.

कामात पारदर्शकता राखा

योजनेच्या कामात पारदर्शकता राखा. नगरसेवकांना माहिती द्या. तसेच कामाची माहिती महपालिकेच्या वेबसाईटवरही टाका, अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. उपअभियंता कुंभार यांना ‘या कामात लक्ष घाला,’ अशी ताकीदही आयुक्तांनी दिली.
 

 

Web Title: Live pipeline scheme: Water purification center test in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.