भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानार्जनाचे धडे ‘उमेद’चे यशस्वी पाऊल : ३४ विद्यार्थ्यांच्या पंखात भरले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:16 PM2018-11-21T17:16:01+5:302018-11-21T17:18:27+5:30

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी

Learning steps for the children of the hawkers: Achievement of 34 students | भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानार्जनाचे धडे ‘उमेद’चे यशस्वी पाऊल : ३४ विद्यार्थ्यांच्या पंखात भरले बळ

भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानार्जनाचे धडे ‘उमेद’चे यशस्वी पाऊल : ३४ विद्यार्थ्यांच्या पंखात भरले बळ

Next
ठळक मुद्देएक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली

राजाराम लोंढे-

कोल्हापूर : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी तालुक्यातील भंगारवाल्यांच्या ३४ मुलांना ज्ञानदानाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयीची आस्था निर्माण त्यांची शाळेतील नियमितता वाढण्यात ‘उमेद’ला यश आले आहे.

राज्य व केंद्र सरकार समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असते. पण उदारनिर्वाहासाठी अनेक कुटूंबांना भटकंतीशिवाय पर्याय नसतो. मराठवाड्यातील ऊस तोड मजूरांच्या मुलांच्या शिक्षणाचे तर यामुळे बारा वाजले आहेत. पाच महिने कारखाना कार्यस्थळावर रहायाचे आणि उर्वरित काळ गावाकडे रहावे लागत असल्याने ते शाळेत जाऊच शकत नाहीत. तीच अवस्था इतर भटक्या समाजातील विद्यार्थ्यांची आहे.

गावोगावी जाऊन भंगार गोळा करणारे, कचरा वेचक मुलांची संख्याही काही कमी नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसे अवघड काम असते. पण उमेद फौंडेशन चे डॉ. झुंजार माने, संदीप गिरवले, प्रकाश गाताडे, महादेव कुंभार, गोरख कदम, दिंगबर पाटील, दशरथ आयरे यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला. मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथे भंगार गोळा करणारा समाज राहतो. साधारणता वीस ते पंचवीस झोपड्या आहेत, रोज सकाळी उठले की कुटूंबातील मोठी माणसांसाबेत लहान मुलेही भंगार गोळा करण्यासाठी गावोगावी जातात. त्यामुळे या मुलांचा आणि शाळेचा संपर्कच येत नव्हता. रोजच्या भटकंतीमुळे शाळेत अनियमितता होती. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय ‘उमेद’ने घेतला.

पण त्या कुटूंबातील वडीलधाºयांची मानसिकता वेगळी होती. काहीही करून या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायचीच या इराद्याने ‘उमेद’चे सदस्य कामाला लागले. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली. सुरूवातीला मुले टाळाटाळ करायची पण खेळाची माध्यमातून त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली. जी मुले येत नाहीत, त्यांच्या घरी जाऊन त्यांना वही, पेन, खाऊ देऊन त्यांना शिकवणीपर्यंत आणले. सध्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे ३४ विद्यार्थ्यांना शिकवणीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये आता एवढी गोडी निर्माण झाली आहे, एक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीचा नीटनेटकेपणा आला असून अप्रगत मुले आता प्रगतीच्या वाटेवर आहेत.

भंगार गोळा करून शाळेत
भंगार गोळा करण्यांवर रोजीरोटी अवलंबून असल्याने आजही ६-७ मुली पहाटे उठून आपल्या कुटूंबासोबत सकाळी भंगार गोळा करण्यासाठी जातात. तिकडून नऊ वाजता परतल्यानंतर शाळेत जातात.
 


ही मुले शाळेत अनियमित होती, त्यासाठी प्रबोधनपर जादा वर्ग भरवला. त्याचा परिणाम चांगला झाला असून शिक्षण विभागाच्या सकारात्मक भूमिकेने या मुलांना नियमित शाळेत पाठविण्यात आम्ही यशस्वी झालो.
-राहूल कदम (समन्वयक, उमेद फौंडेशन)

 ‘उमेद’च्या वतीने मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथील भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानदानाचे धडे दिले जात आहेत. 

Web Title: Learning steps for the children of the hawkers: Achievement of 34 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.