लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:41 AM2017-10-30T00:41:44+5:302017-10-30T00:43:32+5:30

 Laxmi Hills Chowk Not 'Trap of Death' | लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

Next

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी व त्यावर उपाय सांगणारी वृत्तमालिका आजपासून...!
कोल्हापूर : अपुरे सेवा रस्ते, या रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंग, वाहतुकीला अडथळे ठरणारे बसथांबे, बेशिस्त वाहतूक यांमुळे उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौक (पंचतारांकित औद्योगिक) पर्यंतचा सात किलोमीटरचा मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील या सात किलोमीटरच्या अंतरामध्ये गेल्या वर्षभरात २४ जणांना जिवाला मुकावे लागले आहे.
उत्तर आणि दक्षिण भारतामधील रस्ते वाहतुकीचा दुवा असलेल्या, कोल्हापूरला महामार्गाच्या नकाशावर आणणाºया, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींची जीवनवाहिनी असणाºया राष्ट्रीय महामार्गाचे एक वेगळे महत्त्व आहे. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची दिवस-रात्र ये-जा सुरू असते. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला गती मिळावी, वाहनधारकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशान त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, या उद्देशाच्या उलट स्थिती सध्या या मार्गावर झाली आहे. या मार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौकापर्यंतचे अंतर मृत्यूचा सापळा बनला आहे. सात किलोमीटरच्या या मृत्यूच्या सापळ्याची सुरुवात ही कोल्हापूर शहराकडून शाहू नाक्यापासून येणाºया उजळाईवाडी उड्डाणपुलापासून होते. हा पूल महामार्गाच्या उजव्या बाजूपर्यंत बांधल्याने यावरून येणाºया वाहनांना महामार्गावर प्रवेश करताना जीवघेणी कसरत करावी लागते. या पुलावरून येणारी वाहने महामार्गाच्या कागलच्या दिशेने डाव्या बाजूला जाण्याऐवजी थेट महामार्गावर पुण्याकडून येणाºया वाहनांच्या आडवी जातात. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा चुकलेला थोडासा अंदाज मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पुलापासून अर्धा किलोमीटर मयूर पेट्रोल पंपाच्या पूर्व बाजूस असणारे वळण हे महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी न बदलता पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहे. या वळणाच्या आधी दिशादर्शक फलक असूनही ते सहजपणे दिसून येत नाहीत. भरीस भर म्हणून येथे बसथांबा आहे. यामुळे येथे रात्रीच्या वेळेस वाहने उलटून अपघात घडत आहेत. गोकुळ शिरगाव-कणेरी फाटा हा सिद्धगिरी मठ-म्युझिअम, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव, नेर्ली-तामगाव-सांगवडे यांना जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या फाट्यावर उड्डाणपूल आहे.
औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी अवजड वाहने, एस. टी., बसेस, कारखानदार व कामगारांच्या वाहनांचे प्रमाण लक्षात घेता, हा पूल वाहतुकीस अपुरा ठरत आहे. हा पूल आणि त्यालगतच्या सेवारस्त्यांवर झालेले विविध स्वरूपांतील अतिक्रमण, या रस्त्यांवरच असणारे बसथांबे, अनेकदा रस्त्याच्या मध्येच थांबणारे वडाप यांमुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सकाळी आठ आणि सायंकाळी पाचनंतर येथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. या गर्दीतून वाट शोधत पुढे सरकणारे दुचाकीधारक, पादचारी, धोकादायकपणे वळण घेणारी अवजड वाहने, मोठ्या आवाजात वाजणारे हॉर्न असा मोठा गजबजाट येथे रोज असतो. यातून वाहन घेऊन जाणे एक दिव्यच ठरते. या फाट्यावर नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. कणेरीवाडी येथे सेवारस्त्यांची उपलब्ध नसल्याने हे ठिकाण धोकादायक बनलेले आहे. लक्ष्मी टेकडी चौक तर या मार्गावरील अपघातांसाठीचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.
वाहतुकीला शिस्त नसल्याने येथे वारंवार अपघात घडतात. अवजड वाहनांना दुचाकी, अन्य वाहने धडकून झालेल्या अपघातांत अनेकांचा येथे मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता, महामार्गावरील वाहतुकीबाबतच्या असुविधा, वाहनधारकांचा बेजबाबदारपणा, बेशिस्त वाहतुकीमुळे हे सात किलोमीटरचे अंतर जीवघेणे ठरत आहे. ‘विमा, मेडिक्लेम पॉलिसी असेल तरच या मार्गावरून प्रवास करा,’ असे म्हणण्यासारखे येथील वास्तव आहे.

Web Title:  Laxmi Hills Chowk Not 'Trap of Death'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.