कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:53 AM2019-02-03T00:53:47+5:302019-02-03T00:54:51+5:30

कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री

 Kolhapur's seat is Congress: Prakash Awade | कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

googlenewsNext
ठळक मुद्देआमच्यातील विस्कळीतपणा विरोधकांच्या पथ्यावर; शहाणे होण्याची वेळ आली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी व्यक्त केला. आमच्यातील विस्कळीतपणाच विरोधकांच्या पथ्यावर पडला असून, यामध्ये सगळ्यांचेच नुकसान झाल्याने शहाणे होण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

प्रकाश आवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्टवादीसोबतच्या आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या वेळेला हातकणंगलेची जागा कॉँग्रेसकडे होती. येथून ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी निवडणूक लढविली होती. ‘स्वाभिमानी’बरोबर आघाडीची चर्चा सुरू असून, ही जागा त्यांना देण्याबाबत प्रदेश कॉँग्रेसकडून आमच्याकडे विचारणा झालेली आहे. कोल्हापूरच्या जागेवरील आमचा दावा अद्याप कायम आहे; पण कोणत्याही परिस्थितीत राज्यातील भाजप सरकारला घरी बसायचे असल्याने दोन्ही कॉँग्रेसची आघाडी मजबूत झाली पाहिजे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेची एक-एक जागा महत्त्वाची असून, कोल्हापुरातील आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल.

आमच्यातील विस्कळीतपणामुळेच भाजप-शिवसेना वाढली. दोन्ही कॉँग्रेस एकदिलाने राहिल्या तर चित्र वेगळे दिसले असते; पण आमचे शत्रू आम्हीच झालो, आता दुरुस्त झाले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सतेज पाटील, प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. सुरेश कुराडे, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते, राहुल आवाडे उपस्थित होते.

बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर देणार
कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस बळकटीकरणाचे अभियान राबविले जाणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यात जाऊन बूथ कमिट्यांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शनिवारी दिली.
मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभांसह सर्व निवडणुकांतील विजयी व पराभूत कॉँग्रेस उमेदवारांची बैठक आज, रविवारी कॉँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. बूथ कमिट्या अधिक सक्षम करून पक्षसंघटना चांगल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून सामान्य माणसाची दिशाभूल केली असून, शेतीनंतर सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्त्रोद्योग व्यवसायाच्या तोंडाला बजेटमध्ये पाने पुसली आहेत. आधुनिकीकरणाची एकही नवी योजना नाही, प्रत्येक घटकाला लॉलिपॉप दाखविण्याचे काम केल्याची टीका आवाडे यांनी केली. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून एकाही गरीब व्यक्तीला मूूलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहावे लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल बुधवारी (दि. ६) कोल्हापूर दौºयावर येत आहेत. सकाळी दहा वाजता कॉँग्रेसच्या कमिटीत मेळावा आयोजित केला आहे.

अशोक चव्हाण यांची शनिवारी सभा
कोल्हापूर काँग्रेस व इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शनिवारी (दि. ९) सकाळी १० वाजता शहापूर (इचलकरंजी) येथे सभा आयोजित केल्याची माहिती आवाडे यांनी दिली.
 

घरवापसी सुरू
मागील काळात काहीजण पक्षापासून दुरावले होते. त्या सर्वांना एकत्रित करणार आहे. रुसवेफुगवे कमी करून कॉँग्रेसच्या मजबुतीची मोहीम हातात घेतली आहे. येत्या काही दिवसांत अनेक नेते व कार्यकर्त्यांची घरवापसी सुरू होईल. काहीजण सरकारच्या दबावामुळे थांबल्याचे आवाडे यांनी सांगितले.

Web Title:  Kolhapur's seat is Congress: Prakash Awade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.