कोल्हापूर :  तीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चा, महापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:55 PM2018-12-12T14:55:23+5:302018-12-12T14:57:06+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

 Kolhapur: Talks of referendum in three wards, and preparation of municipal administration | कोल्हापूर :  तीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चा, महापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

कोल्हापूर :  तीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चा, महापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

Next
ठळक मुद्देतीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चामहापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या प्रभागांत फेरनिवडणुकीची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात कोणती अडचण नसली तरी माजी महापौर अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात फेरनिवडणूक घ्यावी का, याबाबतचे अधिक मार्गदर्शन नगरविकास विभागाकडून मागविण्याचे ठरविले आहे.

महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ - सिद्धार्थनगर येथून निवडून आलेले अफजल पीरजादे व प्रभाग क्रमांक ५५- पद्माराजे उद्यान येथून निवडून आलेले अजिंक्य चव्हाण यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार विभागीय आयुक्तांनी कारवाई केली असून, त्यांना नगरसेवकपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

या दोघांनी फेबु्रवारी महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलून राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांच्याविरोधात मतदान केले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी गटनेते सुनील पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती.

माजी महापौर अश्विनी अमर रामाणे यांचे नगरसेवकपद सोमवारी (दि. १०) सकाळी साडेदहा वाजता रद्द करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बजावला. त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर जावे लागले होते. रामाणे यांचा ओबीसी दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नगरसेवकपद रद्दची कारवाई यापूर्वी करण्यात आली होती.

तसेच त्यांच्या प्रभागात निवडणूक प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयातून आयुक्तांच्या कारवाईला त्यांनी स्थगिती मिळविली होती. त्यामुळे त्या सभागृहात येऊन बसत होत्या. त्यानंतर त्यांच्या जातवैधता फेरपडताळणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना जातवैधता प्रमाणपत्र नव्याने मिळालेले नाही.

दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांवरून एक वर्षाची करण्यात आली. सप्टेंबर २०१८ च्या अध्यादेशानुसार १५ दिवसांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली; पण त्यांना जातवैधता प्रमाणपत्रच प्राप्त झाले नसल्याने अंतिम १५ दिवसांतही ते त्यांना सादर करता आले नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही कारवाई केली.

पीरजादे व चव्हाण यांच्या प्रभागात निवडणूक घेण्यात यावी, अशी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात महापालिकेचे प्रशासनास कोणतीच अडचण राहिलेली नाही. मात्र अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात मात्र यापूर्वीच फेरनिवडणूक घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने पुन्हा फेरनिवडणूक घेता येईल का, याबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले आहे.

सदरचे मार्गदर्शन येताच तिन्ही प्रभागांत एकावेळी निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती केली जाणार आहे. या संदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात महापालिका प्रशासन व्यस्त आहे.

‘स्थायी’वर परिणाम अशक्य

सत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांना घरी जावे लागले असल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत काही बदल होईल का, अशी शंका उपस्थित केली जात होती; पण त्यामध्ये काही फरक पडणार नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांची पदे रद्द झाल्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ८१ वरून ७८ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थायी समितीवरील संख्याबळ तीनवरून दोनपर्यंत खाली आले, तर कॉँग्रेसचे संख्याबळ पाचवरून सहापर्यंत वाढले आहे. त्यामुळे त्यांचे आठ सदस्य ‘स्थायी’वर आहेत. शिवसेनेच्या एक सदस्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
 

 

Web Title:  Kolhapur: Talks of referendum in three wards, and preparation of municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.