Kolhapur: 'stone' in front of every minister: Raju Shetty, Khot's support to throw stones on the car: Farmers' | कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन
कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन

ठळक मुद्देसदाभाऊंची औकात तर काय? : राजू शेट्टीतुमची प्रतिमा तपासा : राजू शेट्टीशेतकऱ्यांच्या रोषाचे प्रत्यंतर

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्तीव्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे? असा सवालही त्यांनी केला.

माढा मतदारसंघात शनिवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्याचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटले आहेत. व्यक्ती व्देषातून हल्ला केल्याचा खोत यांचा आरोप खोडून काढत खासदार शेट्टी म्हणाले, सरकारच्या भूमिकेने शेतकरी हैराण झाला आहे.

ऊस उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष असून त्या रोषाचे प्रत्यंतर खोत यांना आले आहे. आतापर्यंत शेतकरी शांत होता, आता त्याचा राग बाहेर पडत आहे. आज खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, ही परिस्थिती सुधारली नाहीतर राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या वाट्याला दगड येतील, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.

सदाभाऊंची औकात तर काय?

ऊस दराच्या पहिल्या उचलीवरून सध्या पेच निर्माण झाला आहे. याबाबत विचारले असता, ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची औकात व कुवत नसल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

तुमची प्रतिमा तपासा

‘स्वाभिमानी’च्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका काही मंडळी करत आहेत, पण आमच्या पायाखालची वाळू सरकली की नाही, यापेक्षा समाजातील तुमची प्रतिमा तपासा, असा टोलाही शेट्टी यांनी राज्यमंत्री खोत यांना लगावला.
 

 


Web Title: Kolhapur: 'stone' in front of every minister: Raju Shetty, Khot's support to throw stones on the car: Farmers'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.