कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:57 PM2019-01-09T16:57:44+5:302019-01-09T17:01:44+5:30

नर्सरी बागेत बांधण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा दगडी फुटपाथ, लॅँडस्केपिंग, भूमिगत विद्युतवाहिनी, डेकोरेटिव्ह विद्युतखांब, स्ट्रॉम वॉटर सिस्टीम अशा कामांकरिता ७० लाखांचा निधी बुधवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

Kolhapur: Rs. 70 lakhs fund for Shahu Samadhiasthan, recognition in the special session of Municipal Corporation | कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता

Next
ठळक मुद्देशाहू समाधिस्थळाकरिता ७० लाखांचा निधी, महापालिका विशेष सभेत मान्यता :‘जिल्हा नियोजन’कडे पाच कोटींचा प्रस्ताव देणार

कोल्हापूर : नर्सरी बागेत बांधण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा दगडी फुटपाथ, लॅँडस्केपिंग,  भूमिगत विद्युतवाहिनी, डेकोरेटिव्ह विद्युतखांब, स्ट्रॉम वॉटर सिस्टीम अशा कामांकरिता ७० लाखांचा निधी बुधवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

याशिवाय समाधिस्थळाची अन्य कामे पूर्ण करण्याकरिता लागणारा पाच कोटींचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून घेण्यासाठी तसा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचना सभेत प्रशासनाला देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

शाहू समाधिस्थळाचे लोकार्पण करण्याकरिता जी कामे आवश्यक आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याकरिता ७० लाखांचा निधी पाहिजे असून, तो मंजूर करण्याकरिता बुधवारी महापौर मोरे यांनी विशेष सभा बोलाविली होती. या सभेत कसलेही आढेवेढे न घेता सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेवरील विषय एकमताने मंजूर केले. शिवाय समाधिस्थळाची अन्य कामे करण्याकरिता जो पाच कोटींचा निधी लागणार आहे, त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा. त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.

समाधिस्थळाचे काम रखडल्याबद्दल भूपाल शेटे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत सेंट्रल किचनचा विषय पंधरा दिवसांत महासभेसमोर आणला जातो; मग शाहू समाधिस्थळाबद्दल तितकी तत्परता का दाखविली गेली नाही, अशी विचारणा केली.

अशोक जाधव, मेहजबीन सुभेदार यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. माधुरी लाड यांनी जिल्हा नियोजन समितीकडे यापूर्वीच का निधी मागितला नाही, अशी विचारणा केली.यावर खुलासा करताना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी समाधिस्थळाच्या कामात प्रशासनाकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा केला. 

निधी कमी पडून देणार नाही : आयुक्त

शाहू समाधिस्थळ हा सामाजिक तसेच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वांनाच त्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे समाधिस्थळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी प्रशासनाचीदेखील अपेक्षा आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. एवढेच नाही तर पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतुद करुन देणार असाल तर त्याची निविदा प्रक्रीया देखील आतापासूनच राबविण्याची प्रशासनाची तयारी आहे, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.
 

 

Web Title: Kolhapur: Rs. 70 lakhs fund for Shahu Samadhiasthan, recognition in the special session of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.