कोल्हापूर : आरक्षणप्रश्नी धनगर समाजाचे ढोल गजर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:39 PM2018-12-10T16:39:04+5:302018-12-10T16:41:53+5:30

धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल गजर आंदोलन करण्यात आले. कुंभकर्णाची झोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दुपारपर्यंत अखंडपणे ढोल वादन सुरू होते.

Kolhapur: Reservation question Dhangar community Dholak alarm movement | कोल्हापूर : आरक्षणप्रश्नी धनगर समाजाचे ढोल गजर आंदोलन

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजातर्फे सोमवारी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ढोल गजर आंदोलन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधव सहभागी झाले होते. (छाया : दीपक जाधव)

Next
ठळक मुद्देआरक्षणप्रश्नी धनगर समाजाचे ढोल गजर आंदोलनलवकर प्रश्न मार्गी न लावल्यास उग्र आंदोलन : रानगे

कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल गजर आंदोलन करण्यात आले. कुंभकर्णाची झोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दुपारपर्यंत अखंडपणे ढोल वादन सुरू होते.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी न लावल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करू, असा इशारा मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी येथे दिला.

मल्हार सेना, धनगर समाज महासंघ, धनगर समाज युवक संघटनेतर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ च्या सुमारास धनगर समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. भंडारा उधळून यळकोट...यळकोट...जय मल्हार...., जय अहिल्या..., अशा घोषणा देत ढोल वादनाला सुरुवात झाली.

धनगरी ढोलाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यानंतर बबन रानगे, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके, धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघु हजारे, धनगर समाज युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद देबाजे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

बबन रानगे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कुंभकर्णाच्या झोपेत आहे. त्यांना जागे करण्यासाठी हे ढोल गजर आंदोलन केले जात आहे. निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निकाली काढण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी साडेचार वर्षांत अभ्यास करण्यापलीकडे काहीच केले नाही. भविष्यात आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल.

बयाजी शेळके म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तत्काळ शिफारस करावी व समाजाला अनुसूचित जमातीचे (एस. टी.) चे दाखले तत्काळ द्यावेत. अशी धनगर समाजाची रास्त मागणी आहे. त्याची सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी.

आंदोलनात छगन नांगरे, सिद्धार्थ बन्ने, शहाजी सिद, राघू हजारे, प्रल्हाद देबाजे, डॉ. विजय गोरड, बाबूराव बोडके, मायाप्पा धनगर, विठ्ठल धनगर, बाबूराव बोडके, नितीन कात्रट, आप्पा रेवडे, कुमार हराळे, आदींसह धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.

सतेज पाटील, नरके यांचा पाठिंबा

आंदोलनस्थळी आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. धनगर आरक्षणाचा प्रश्न वेळोवेळी विधिमंडळात उपस्थित केला असून, यापुढेही समाजासोबत राहू, अशी ग्वाही यांनी दिली. करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला.

मराठा समाजाचाही पाठिंबा

या आंदोलनाला मराठा समाजातर्फे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभागही घेतला. मराठा समाज हा धनगर समाजासोबत होता व इथून पुढेही तो राहील, अशी ग्वाही मुुळीक यांनी दिली.


 

 

Web Title: Kolhapur: Reservation question Dhangar community Dholak alarm movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.