कोल्हापूर : रंगोत्सवात न्हाले कोल्हापूरकर, रंगपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 08:25 PM2018-03-06T20:25:10+5:302018-03-06T20:25:10+5:30

लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या युवक-युवतींसह अवघे कोल्हापूर मंगळवारी रंगात न्हाले. यानिमित्ताने शहरातील रस्त्यांनाही वेगळाच रंग चढला.

Kolhapur: Nhale Kolhapurkar in the festival of colors, in Rangpanchami zeal | कोल्हापूर : रंगोत्सवात न्हाले कोल्हापूरकर, रंगपंचमी उत्साहात

कोल्हापूर : रंगोत्सवात न्हाले कोल्हापूरकर, रंगपंचमी उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देरंगोत्सवात न्हाले कोल्हापूरकर, रंगपंचमी उत्साहातकोल्हापूर शहरात बंदसदृश स्थिती

कोल्हापूर : लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या युवक-युवतींसह अवघे कोल्हापूर मंगळवारी रंगात न्हाले. यानिमित्ताने शहरातील रस्त्यांनाही वेगळाच रंग चढला.

होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीची मजा काही औरच असते. लहान मुले तर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाला सुरुवातच झाली बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने.

सकाळी उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्र-मैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही हसायला लावणाऱ्या होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांना उत्साह दुणावला.

दरम्यान, शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींनीही रंग खेळायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर रंगलेल्या चेहऱ्यांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराला रंगवण्यासाठी मुलं महिलांसोबत दुचाकीवरून जात होते.

घरातली मोठी माणसं, गल्लीतल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून झाल्यानंतर शहरात अन्य ठिकाणी राहत असलेल्या मित्र-मैत्रिणींना रंगवण्यासाठी युवक-युवती ग्रुपने दुचाकीवरून फिरत होते. वाटेत कोणी मित्र भेटले की त्यांना रंगवून पुढे जायचे. एरव्ही आपल्या लुकबद्दल अधिक जागरूक असलेले मुले-मुली वेगवेगळे रंग आणि पिवडीने नखशिखांत रंगून ओळखू न येणाऱ्या चेहऱ्यानिशी दुचाकीवरून सुसाट जाताना दिसत होते.

कुटुंबीयांच्या सरबराईत गुंतलेल्या महिलाही कामे आटोपून रंग खेळायला बाहेर पडल्या. आपल्या भागा-भागातील, कॉलन्या, पेठांमधील मैत्रिणींना रंगवण्यासाठी झुंडीने जात होत्या. एखाद्या महिलेने आढेवेढे घेतलेच तर त्यांना बाहेर काढून क्षणार्धात रंगवून आपल्यातलेच एक बनवायचे.

यानिमित्ताने महिलांमधील जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले. महिलांनाही मुक्तपण रंग खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी अनेक भागांमध्ये खास साऊंड सिस्टीम आणि पाण्याचे शॉवर लावून देण्यात आले होते. याशिवाय विविध तरुण मंडळे, तालीम मंडळांनीही रंगपंचमीचे आयोजन केले होते.

माणसांसोबतच कोल्हापूरचे गल्ल्या आणि रस्तेही सप्तरंगी रंगात रंगून निघाले होते. गल्ली, पेठा, कॉलन्यांमध्ये रंगांची धूम सुरू असताना शहरातील चौका-चौकांत, रस्त्याकडेलाही अनेक पुरुष, युवक रंग खेळताना दिसत होते. त्यामुळे नजर जाईल तेथे फक्त आणि फक्त रंगोत्सव साजरा होत होता.

या कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त होता, तसेच पोलिसांच्या गाड्या भागा-भागांतून फिरत होत्या. मात्र, नागरिकांनीही स्वयंशिस्ती बाळगत रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांना विशेषत: महिला आणि युवतींना आपल्या उत्साहाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मुलींचा सहभाग लक्षणीय

काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ मुलं रंगलेल्या चेहऱ्यानिशी आपल्या मित्रांना रंगवण्यासाठी दुचाकीवरून जाताना दिसायचे. आता मात्र मुलीही एका दुचाकीवर तिघी बसून आपल्या मित्र-मैत्रिणींना रंगविण्यासाठी जात होत्या. तिब्बल सीट असूनही वाहतूक पोलिसांनी त्यांना अडविले नाही. काही चौकांत मात्र गोंधळ घालणाऱ्या युवकांना तसेच अल्पवयीन मुलांना अडवून कागदपत्रे तपासणी व कारवाईचा बडगा उगारला. यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस चौका-चौकांत तैनात करण्यात आले होते.

कोल्हापुरातील बहुतांशी दुकाने रंगपचंमीनिमित्त बंद होती. मंगळवारी दुपारी न्यू शिवाजी रोड परिसरात असा शुकशुकाट जाणवत होता.(छाया : नसीर अत्तार)

बंदसदृश स्थिती

शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, महापालिका चौक, माळकर तिकटी, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसर मंगळवारी सायंकाळपर्यंत बंद होता. रंगपंचमीमध्ये काही युवक पैसे मागतात न दिल्यास सर्वत्र रंगांची उधळण करतात. त्यामुळे हा त्रास नको म्हणून अनेक दुकानदारांनी मंगळवारी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले. सायंकाळी पाचनंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत झाले.

 

 

 

Web Title: Kolhapur: Nhale Kolhapurkar in the festival of colors, in Rangpanchami zeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.