कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 03:42 PM2019-05-23T15:42:59+5:302019-05-23T15:44:13+5:30

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे.

Kolhapur Lok Sabha election result 2019: Bhagwati wave in Kolhapur, both seats to Shivsena: - The dream of Thackeray | कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार

Next
ठळक मुद्देशेट्टी-महाडिक यांना पराभवाचा जबर तडाखा


विश्र्वास पाटील-

कोल्हापूर : कोल्हापूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे. कोल्हापुरातून संजय मंडलिक हे बाराव्या फेरीअखेर दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल २ लाख २६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विजयाची घोषणाच होण्याची औपचारिकता आहे. हातकणंगलेतून धैर्यशील माने हे ७१ हजार मतांनी आघाडीवर आहेत; त्यामुळे त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.

कोल्हापुरात मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांची, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध खासदार राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. धैर्यशील माने हे पहिल्याच प्रयत्नात शेट्टी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरले. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. कोल्हापुरात गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापूरची रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावाशेजारील गोदामात सुरू झाली.

सुरुवातीच्या टपाली मतांमध्ये कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाले. ‘महाडिक आघाडीवर’ अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या; परंतु त्या काही क्षणांपुरत्याच. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासूनच संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारासच मंडलिक यांचा विजय निश्चित झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

धैर्यशील माने यांनाही पहिल्या फेरीपासूनच लीड मताधिक्य मिळाले. त्यांचे मताधिक्य तुलनेत कमी होते. पहिल्या फेरीत तर ते शेकड्यांत होते; त्यामुळे त्या मतदारसंघात चुरस होणार, असे वातावरण होते; परंतु दुसऱ्या फेरीपासून हे मताधिक्य वाढत गेले व कोणत्याच फेरीत शेट्टी यांना मताधिक्य मिळाले नाही. इचलकरंजी, हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी माने यांना भरघोस मते दिली. गेल्या निवडणुकीत हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी शेट्टी यांना तब्बल ८३ हजारांचे मताधिक्य दिले होते. धैर्यशील माने यांना या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर मताधिक्यात तब्बल ४९ हजारांचे मताधिक्य इचलकरंजी मतदारसंघाने दिले. वंचित आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी ५० हजार मते घेतली; या दोन्हीचा फटका शेट्टी यांना बसला.

शेट्टी का पराभूत झाले?
मोदी लाट, नवमतदार व तरुणाईमध्ये मोदी यांच्याबद्दल असलेली क्रेझ, शेट्टी यांनी सातत्याने ‘मोदी यांना पाडा,’ अशी घेतलेली भूमिका, ब्राह्मण समाजाबद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य, इचलकरंजीच्या पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, मतदारसंघातील जनतेशी कमी झालेला संपर्क हे घटक शेट्टी यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेच; परंतु जातीचे राजकारणही जास्त परिणामकारक ठरले. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेली बहुजन समाजाचा खासदार ही आरोळी खरी करून दाखविण्यात ते यशस्वी झाले. या निवडणुकीत शेट्टी यांचा ऊस आंदोलनाचा लढा, त्यांनी शेतकऱ्यांसाठी गेली दोन दशके केलेली चळवळ हे मुद्देच चर्चेत आले नाहीत.


महाडिक का पराभूत झाले..?
गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकजुटीने महाडिक यांच्या पाठीशी राहिल्या होत्या; परंतु निवडून आल्यानंतर महाडिक मात्र भाजपच्या संगतीत राहिले. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांत त्यांनी भाजपला पोषक भूमिका घेतली. भावजय शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून रिंगणात असताना खासदार महाडिक यांची भाजपच्या सदस्यांना घेऊन जाणारी बस चालविली. त्याचा त्यावेळी व्हायरल झालेला व्हिडीओ लोकसभा निवडणुकीतही महाडिक यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरला. त्यांच्या कुटुंबात सर्व पक्ष आहेत व त्या बळावर सर्व जिल्ह्यावर ते राज्य करू पाहतात, याबद्दल सामान्य माणसांच्या मनांत असलेली चीडही महाडिक यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

Web Title: Kolhapur Lok Sabha election result 2019: Bhagwati wave in Kolhapur, both seats to Shivsena: - The dream of Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.