ठळक मुद्देप्रशासनाची आयुक्तांकडे शिफारसजबाबदारी म्हणून कायम, रोजंदारी व ठोक मानधनावरील तब्बल ९५ चालकांवर कारवाई किमान १० चालक तरी के.एम.टी.कडे परत मिळावेत,

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. के.एम.टी.ची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रक्रिया गतिमान झाली असून त्याचाच एक भाग म्हणून ही शिफारस केली असून आयुक्तांच्या मान्यतेने लवकरच बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी दुपारनंतर अचानक दांड्या मारल्याने शहरातील ४० मार्गांवरील बससेवा बंद ठेवावी लागली होती. त्याची जबाबदारी म्हणून कायम, रोजंदारी व ठोक मानधनावरील तब्बल ९५ चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील २५ ठोक मानधनावरील चालकांना बडतर्फ करण्यात आले होते. कारवाईचा पुढील टप्पा म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर राहिलेल्या १३ कर्मचाºयांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. के.एम.टी.चे प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी गुरुवारी आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन या कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस केली.

बुधवारी ४० मार्गावरील बससेवा चालकांअभावी बंद राहिल्यामुळे असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून गुरुवारी के.एम.टी. प्रशासनाने कायम, रोजंदारी व ठोक मानधनावर काम करणाºया सर्व चालकांना व्यक्तिश: फोनवर संपर्क साधून ड्युटीवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शहरातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सेवा सुरळीत होती. १०७ मार्गांवर बसेस धावल्या तरीही दोन चालक पूर्वनियोजित ड्यूटीवर गेले नाहीत. त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

ठोक मानधनावरील कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कामावरून कमी करण्यापलीकडे कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. २५ चालकांना बडतर्फ केल्यामुळे तेवढेच आता नव्याने भरावे लागणार आहेत.
४० चालक मनपाकडेके.एम.टी.कडे चालकांचा प्रश्न गंभीर असतानाही मूळचे के.एम.टी.चे ४० कायम चालक महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या वाहनांकरीता घेतले आहेत. हे चालक पदाधिकारी, अधिकाºयांच्या वाहनांवर ड्युटी करत आहेत. त्यापैकी किमान १० चालक तरी के.एम.टी.कडे परत मिळावेत, अशी मागणीही संजय भोसले यांनी आयुक्तांकडे केली.

प्रतापराव भोसले तांत्रिक सल्लागारपदी
वाहतूक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले प्रतापराव भोसले यांना ‘तांत्रिक सल्लागार’ म्हणून के.एम.टी.च्या सेवेत घेण्याचा निर्णय आयुक्त चौधरी यांनी गुरुवारी घेतला. भोसले यांना आज, शुक्रवारीच सेवेत सामावून घेतले जाईल. त्यांच्याकडे वर्कशॉप तसेच वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येईल याचे नियोजन दिले जाणार आहे.