Kolhapur: The death of the bus driver who saved the students | कोल्हापूर : विद्यार्थ्यांना वाचविणाऱ्या बसचालकाचा मात्र मृत्यू
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना वाचविणाऱ्या बसचालकाचा मात्र मृत्यू

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना वाचविणाऱ्या बसचालकाचा मात्र मृत्यूलोकांत हळहळ : प्रसंगावधानामुळे टळली आपत्ती

कोल्हापूर : सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरने अतिग्रेच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या संजय घोडावत समुहाच्या बसचालकाने प्रसंगावधान राखून, स्वत:चा जीव धोक्यात घालून बस डाव्या बाजूच्या शेतवडीत घातल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

चालक जयसिंग गणपती चौगले (वय ४८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचविल्याबध्दल कौतुक झाले परंतू ते कौतुक स्विकारायला तेच या जगात राहिले नाहीत.

शेती नाही, छोटेखानी घरामध्ये थाटलेला संसार, घरामध्ये पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत जयसिंग चौगले राहत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते संजय घोडावत कॉलेजमध्ये कंत्राटी चालक होते. संसाराचा गाडा चालवीत मुलांना शिकविले. मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे.

त्यांच्याकडे रुट चार - गांधीनगर ते अतिग्रे मार्गाची जबाबदारी होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते गांधीनगर, वसगडे परिसरातील विद्यार्थी घेऊन अतिग्रेच्या दिशेने निघाले. पाऊस सुरु होता. बसमध्ये विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारत निसर्ग न्याहाळत होते.

चोकाक फाटा येथे येताच सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरने अचानक दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर येत स्कूल बसला जोराची धडक दिली.

चौगले यांनी प्रसंगावधान राखून बस शेतवडीत घातली. कंटेनर काही अंतर पुढे जाऊन शेतात उलटला. चौगले यांनी बस डाव्या बाजूला घेतली नसती तर कंटेनर बसला कापत गेला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. चालक चौगले यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले.

गंभीर जखमी अवस्थेत चालक चौगले यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यासह, छाती, पोटाला व हातापायांना जोराची दुखापत झाली होती. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचे प्राण वाचविल्याची भावना पालकांसह रुग्णालयातील डॉक्टर व जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली.

चालक चौगले यांच्यामुळेच मोठी दुर्घटना टळली, असेही प्रत्येकजण सांगत होता. परंतू या अपघातात चौगले यांचा मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांना धक्काच बसला. गडमुडशिंगी पंचक्रोशीतही हळहळ व्यक्त झाली. त्यांची पत्नी व मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घोडावत समुहाची अडीच लाखांची मदत

जयसिंग चौगले यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. पत्नी आणि दोन मुले पोरकी झाली. कर्ता पती आणि बापाचे छत्र हरविल्याने पुढचे आयुष्य कसे जगायचे, असा प्रश्न चौगले कुटुंबीयांसमोर आहे. हे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी रोख अडीच लाख रुपये व त्यांच्या मुलांस भविष्यात संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन घोडावत समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दिले आहे.

चौगले मामा गेले...

जयसिंग चौगले हे चिंचवाड, वळिवडे, गांधीनगर येथील विद्यार्थी घेऊन नेहमी ये-जा करीत असत. रोजच्या दिनक्रमामुळे विद्यार्थ्यांशी त्यांची चांगली ओळख झाली होती. ‘चौगले मामा’ म्हणून विद्यार्थी त्यांना बोलावत असत. त्यामुळे ते सर्वांचे लाडके होते. ‘आपल्या मुलांना वाचविणारे चौगले मामा गेले...’ असे म्हणत पालकांनी दु:ख व्यक्त केले.
 

 


Web Title: Kolhapur: The death of the bus driver who saved the students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.