कोल्हापूर : पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नागरिकांची टीकेची झोड, ‘बांधीलकी तुमची-आमची’ बैठकीतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 05:16 PM2018-03-07T17:16:12+5:302018-03-07T17:16:12+5:30

कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोर संतप्त नागरिकांनी झोड उठविली.

Kolhapur: The criticism of the citizens on the inefficiency of the police, "Your commitment to the meeting" | कोल्हापूर : पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नागरिकांची टीकेची झोड, ‘बांधीलकी तुमची-आमची’ बैठकीतील सूर

कोल्हापूर : पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नागरिकांची टीकेची झोड, ‘बांधीलकी तुमची-आमची’ बैठकीतील सूर

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नागरिकांची टीकेची झोड‘बांधीलकी तुमची-आमची’ बैठकीतील सूर

कोल्हापूर : जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोर संतप्त नागरिकांनी झोड उठविली. जिल्ह्यात मटका, जुगार, गांजा, दारू यांसारखे अवैध धंदे फोफावले आहेत. युवती-महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चेन स्नॅचिंग यासारखा गंभीर घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटू लागले आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

 

आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात बुधवारी ‘बांधीलकी तुमची-आमची’ या विषयावर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवादात्मक बैठकीचे आयोजन केले होते.

सुरुवातीला पोलीस प्रशासनाविषयी समाजात भेडसावणाऱ्या प्रश्नांवर नागरिकांनी रोख धरला. जिल्ह्यात मटका, जुगार, दारू, क्लब, नेट कॅफे, गांजा, वेश्या व्यवसाय यांसारखे अवैध धंदे फोफावले आहेत. गल्लीबोळांतील वयात आलेली तरुण पिढी मद्य, गांजा व मटक्याच्या आहारी गेली आहे. किरकोळ कारणावरून होणारी हाणामारी, खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे वाढू लागले आहेत. कॉलेज युवती, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागले आहेत.

 

दिवसाढवळ्या लुटारूंकडून महिलांबरोबर पुरुषांनाही लक्ष्य केले जात आहे. पोलीस असल्याची बतावणी करून लोकांची लूटमार सुरू आहे. गुन्हेगार गुन्ह्यांसाठी खाकीचा वापर खुलेआम करीत आहेत. पोलिसांचा धाक कमी झाला आहे. गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे.

घराबाहेर पडणाऱ्या पुरुष व महिलेला आपण सुरक्षित पुन्हा घरी येऊ, याची शाश्वती देता येत नाही. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा-सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याचे सांगत नागरिकांनी नांगरे-पाटील यांच्यासमोरच पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर टीकेची झोड उठविली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक अशोक सावंत, शुभांगी पाटील (वाकरे), निवासराव साळोखे, अशोक देसाई, किशोर घाटगे, शुभांगी इंगळे (इचलकरंजी), स्वप्निल इंगळे (जयसिंगपूर), अर्चना पांढरे, ऋतुराज देसाई, नागेश चौगले, विक्रमसिंह घाटगे (हुपरी), तुषार भोसले (कागल), गजानन पाटील (इस्पुर्ली), आदींनी समस्या मांडल्या.

नागरिकांच्या भावना लक्षात घेत नांगरे-पाटील यांनी पोलीस प्रशासनाने जोमाने लक्ष देऊन अवैध धंदे मोडीत काढून गुन्हेगारांची पाळेमुळे उखडून टाकावी. जनतेशी चांगला संवाद साधता यावा, लोकांच्या अडचणी, समस्या जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजत नाहीत, तोपर्यंत तपासाची दिशा ठरत नाही. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी पोलीस मुख्यालयात दर तीन महिन्यांनी जनता दरबार भरविण्यात यावा, अशा सूचना पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिल्या.

बैठकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर विभागाचे सूरज गुरव, शाहूवाडीचे आर. आर. पाटील, गडहिंग्लजचे आर. आर. पाटील, इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ, जिल्हा विशेष शाखेचे शशिराज पाटोळे यांच्यासह शांतता कमिटी सदस्य व नागरिक उपस्थित होते.

फलकांवर कारवाई सत्र सुरू

शहरासह ग्रामीण भागांत शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल फलकांचे वारे मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोणीही उठतो आणि फलक लावून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दिंडोरा पिटतो. शहरभर फलक, झेंडे लावून विद्रूपीकरण केले जात आहे. त्यातूनच काही ठिकाणी समाजामध्ये सामाजिक विषमता वाढत आहे. त्यामुळे असे बेकायदेशीर फलक व झेंडे लावणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाला सोबत घेऊन कठोर कारवाई सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी बैठकीत सांगितले.

वाहतुकीची कोंडी दूर करा

कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. फूटपाथवर अतिक्रमणे वाढल्याने वाहने रस्त्यांवर पार्किंग केली जातात. ही वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा, अशी सूचना नागरिकांनी केली. त्यावर नांगरे-पाटील यांनी नगरपालिकेला पत्रव्यवहार करून फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करा. चौका-चौकांत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करा, संयुक्त नाकेबंदी करून मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार नियमबाह्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, आदी सूचना बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

उद्यानासह लॉज, नेटकॅफेवर कारवाई करा

शाळा-महाविद्यालयांतील मुले-मुली लॉजवर जाताना दिसत आहेत. नेट कॅफेमध्ये बीभत्स चित्रे पाहत असतात. उद्यानांतील अश्लील चाळे पाहून फिरायला आलेल्या नागरिकांना मान खाली घालून जावे लागते. ही प्रवृत्ती धोकादायक असून ती रोखण्यासाठी उद्यानांसह लॉज, नेट कॅफेंवर कारवाई करण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या.

महिला, लहान मुले, वृद्ध, दलित अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्या लागतील, या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या प्रश्नांचे मुद्दे घेतले आहेत. निश्चित विहित कालावधी ठरवून त्याचे निराकरण करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विश्वास नांगरे-पाटील ,
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

 

Web Title: Kolhapur: The criticism of the citizens on the inefficiency of the police, "Your commitment to the meeting"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.