कोल्हापूर दोन्ही काँग्रेसने भाजपाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:29 AM2017-10-18T01:29:06+5:302017-10-18T01:33:13+5:30

कोल्हापूर : गावपातळीवरील राजकारणाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची सरशी झाली

Kolhapur both the Congress stopped the BJP | कोल्हापूर दोन्ही काँग्रेसने भाजपाला रोखले

कोल्हापूर दोन्ही काँग्रेसने भाजपाला रोखले

Next
ठळक मुद्दे स्थानिक आघाड्यांनाही यशशिवसेनेचीही मुसंडी;सरपंचपदाच्या आकडेवारीत शिवसेना चौथ्या स्थानांवर, तर भाजपा पाचव्या स्थानांवर

कोल्हापूर : गावपातळीवरील राजकारणाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची सरशी झाली. भाजपाच्या वारू रोखण्यात दोन्ही काँग्रेसला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले; पण सर्वाधिक अकरा तालुक्यांत भाजपाला कमी असेना पण यश मिळाले आहे. पक्षीय बंध न पाळता झालेल्या स्थानिक आघाड्यांनाही चांगले यश मिळाले असून तब्बल दीडशेहून अधिक सरपंच आघाड्यांचे झाले आहेत.

सरपंचपदाच्या आकडेवारीत शिवसेना चौथ्या स्थानांवर, तर भाजपा पाचव्या स्थानांवर राहिला. स्थानिक आघाड्यांमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते असल्याने पक्षांचे बलाबल कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकांमध्ये एका पक्षाचे बहुमत आणि सरपंच मात्र विरोधी आघाडीचा असेही अनेक ठिकाणी घडले आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुलाची शिरोली माजी आमदार महादेवराव महाडिक गटाचा पराभव झाला. अनेक गावांत धक्कादायक निकाल लागल

लोकांनी अनेकांना ठरवून पराभवाचा दणका दिला. आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील यांनी गावातील गड राखले. पाचगांव ग्रामपंचायतीत भाजपाचे आमदार अमल महाडिक गटाचा धुव्वा उडाला. माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सोळांकूर, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे यांनी घोटवडे यांनी आपली गावे ताब्यात ठेवली. ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील चंदगडने नगरपंचायतीच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर चंदगड व राधानगरी तालुक्यात आरक्षणातील उमेदवार न मिळाल्याने चार गावांत सरपंच निवडणूकच झाली नाही.

विधानसभानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता; पण प्रत्यक्षात ४७ ठिकाणीच भाजपला यश मिळाले. लोकसभा निवडणूकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक होती. केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबाबत जनसामान्यांत काय भावना आहे, याची लिटमस टेस्ट करण्याची संधी भाजप-शिवसेनेला होती. जाहीर झालेल्या निकालावरून भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराबाबतची अस्वस्थता ग्रामीण जनतेने मतपेटीद्वारे व्यक्त केल्याचे दिसते.
भाजपला सगळ्यात कमी गावांची सत्ता मिळाली असली तरी मुळातच या पक्षाचे गावपातळीवरील अस्तित्व अजूनही मर्यादित आहे.

काँग्रेसला भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा आणि कागल या चार तालुक्यांत एकाही गावची सत्ता मिळालेली नाही. राष्ट्रवादीची स्थिती पन्हाळा व गगनबावड्यात तशी झाली आहे. भाजपने मात्र सर्वाधिक ११ तालुक्यांत अस्तित्व दाखविले असून पन्हाळा तालुक्यात या पक्षाला एकाही ग्रामपंचायतीत सत्ता काबिज करता आलेली नाही. शिवसेनेला भुदरगड, शिरोळ अणि गगनबावड्यात खाते उघडता आलेले नाही.

नेत्यांची दमछाक
तालुक्याच्या राजकारणापेक्षा गावचे राजकारण अवघड असल्याचे निकालावरून दिग्गज नेत्यांना कळून चुकले. शिरोली, वडणगे, राशिवडे, सांगरूळ, कोतोली येथील निकाल धक्कादायक लागलेच, पण तिथे नेत्यांची पुरती दमछाक झाली.
तीस सरपंच ‘शिवसेने’चे
करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील तीस सरपंच शिवसेनेचे झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतींमध्ये मित्रपक्षांसोबत आघाड्या करून सत्तेत सहभागी झाल्याचा दावा आमदार चंद्रदीप नरके यांनी केला आहे.
सर्वांत तरुण सदस्य
गोकुळ शिरगांव येथील प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात अपक्ष अजय टिपुगडे (वय २१) विजयी झाले. ‘सगळ्यांत कमी वयाचा सदस्य’ म्हणून ते ग्रामपंचायत सभागृहात जाणार आहेत. ते बी. ए. भाग-२ राजाराम महाविद्यालयात शिकत आहेत.
चार अपक्ष सरपंचपदी
करवीर तालुक्यातील सादळे-मादळे येथे मीनाक्षी जाधव, चिंचवडे येथे युवराज कांबळे, राधानगरी तालुक्यातील वलवण येथे सुभाष पाटील, तर कागल तालुक्यातील नंद्याळ येथे राजश्री पाटील या अपक्षांनी सरपंचपदी बाजी मारली.

गेल्या तीन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी आणला. सर्वसामान्यांविषयी सरकार करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना ही पोहोचपावतीच आहे. भाजपाची ही घोडदौड अशीच सुरू राहणार आहे.
- चंद्र्रकांतदादा पाटील, पालकमंत्री.

राज्याच्या राजकारणात नांदेडपासून सुरू झालेले परिवर्तनाचे वारे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींच्या निकालातही वाहिले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची नांदी केली आहे. भाजपाच्या भूलथापांना कंटाळलेली जनता परत काँग्रेसकडे वळली आहे.
- सतेज पाटील, आमदार


दृष्टिक्षेपात निकाल
करवीर - काँग्रेसच्या दोन्ही
पाटलांचा ‘जय’
राधानगरी - राष्ट्रवादीला बळ
आजरा - भाजपाला संधी
गडहिंग्लज - भाजपाची दमदार एन्ट्री
चंदगड - तिन्ही पाटलांना संमिश्र यश
भुदरगड - स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व
कागल - मुश्रीफांचा दबदबा कायम
हातकणंगले - संमिश्र कौल
शिरोळ - भाजपाला चांगले यश
शाहूवाडी - सत्यजित पाटील वरचढ
गगनबावडा - काँग्रेसला हात
पन्हाळा - विनय कोरेंना गुलाल

 

नेत्यांच्या प्रतिक्रिया...
गावपातळीवरील निवडणुकीत महाडिक कुटुंबीय कधी भाग घेत नाही. या निवडणुकीत गटा-तटाचे राजकारण असते. सगळीच मंडळी आपली असल्याने मदत कुणाला करायची? त्यामुळे आम्ही लक्ष घातले नव्हते.
- महादेवराव महाडिक (माजी आमदार)

राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराबाबत सामान्य माणसांच्या मनात राग असल्याचे या निवडणुकीवरून दिसून आले. कागल तालुक्यात दहा ठिकाणी राष्टÑवादी, १८ ठिकाणी मुश्रीफ-मंडलिक गटाची सत्ता आली आहे. एकंदरीत सरकारच्या कारभारावरील नाराजी लोकांनी मतांद्वारे व्यक्त केली आहे.
- आमदार हसन मुश्रीफ
------------------------------------
शिवसेनेने काही ठिकाणी स्वबळावर तर अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या करून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. गगनबावड्यात काँग्रेस व पी. जी. शिंदे गट यांच्याबरोबर आघाडी करून १३ ठिकाणी सत्तेत पोहोचलो तर चार शिवसेनेचे सरपंच झाले.
- आमदार चंद्रदीप नरके
----------------------------------
भाजपच्या धनशक्तीपुढे शिवसेनेचा ग्रामीण भागातील कार्यकर्ता ताकदीने उभा राहिला. याद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सामान्य माणसाने विश्वास व्यक्त केला असून जनतेचा कौल पाहता लोकसभेसह विधानसभेला शिवसेना तयार आहे.
- विजय देवणे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)
---------------------------------
जनतेच्या सर्व बाबी लक्षात आल्या आहेत. लोकांनी काहीतरी पदरात पडेल म्हणून बदल केला. मात्र, केवळ विकासाच्या घोषणा ऐकाव्या लागल्या. गेल्या तीन वर्षांत काही नवीन झाले नाही. ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. फसवी कर्जमाफी केली. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे जनतेने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला स्पष्टपणे नाकारल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
-पी. एन. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, कोल्हापूर)

 

Web Title: Kolhapur both the Congress stopped the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.