Kolhapur: All 24 hours 'alert' should be kept during rainy season: Mayor's suggestions | कोल्हापूर : पावसाळ्यात सर्व २४ तास ‘अलर्ट’ राहावे  : महापौरांच्या सूचना
पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाबाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी घेतला. यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी तसेच नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवल्यास कारवाईचे आयुक्तांचे आदेशआपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा

कोल्हापूर : येत्या पावसाळ्यात नालेसफाईसह संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा महापौर शोभा बोंद्रे यांनी घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.

बैठकीत, पावसाळ्यात अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी पूरबाधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासह २४ तास सज्ज राहण्याचा सल्ला महापौर बोंद्रे यांनी दिला. तसेच अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिला.

प्र्रास्ताविकात अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. यानंतर आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन या विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती बैठकीमध्ये सांगितली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी बोलताना, महापौरांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समिती २०१८ स्थापन करण्यात आली. रिलायन्स मॉलजवळील फायर स्टेशनमध्ये स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. कावळा नाका येथे नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवला आहे. पावसाळ्यामध्ये तीन पथके तयार केली असून त्यांच्याकडून पूरबाधित क्षेत्रांत पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यावेळी इतर अधिकाऱ्यांनीही कामाचा आढावा सादर केला. तसेच सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, गटनेता शारंगधर देशमुख, रिना कांबळे, पूजा नाईकनवरे, निलोफर आजरेकर, आदींनी सूचना मांडल्या.

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, शहरातील उर्वरित राहिलेली नालेसफाई चार दिवसांत पूर्ण करावी. नालेसफाई झाल्यानंतर संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे तसे पत्र घेण्यात यावे. नाल्यातील काढलेला गाळ काठावर न ठेवता तो तातडीने उचलण्यात यावा.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत. विशेषत: रात्री सर्वांचे फोन सुरू हवेत, अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, प्रभाग समितीच्या सभापती शोभा कवाळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

२०२ नाल्यांची सफाई पूर्ण

मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी नाल्यांची तीन प्रकारे सफाई केली जात आहे. यामध्ये मनुष्यबळाद्वारे ४७६ छोटे नाले, जेसीबी यंत्राच्या साहाय्याने २३६ नाल्यांपैकी २०२ नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून दोन मोठ्या नाल्यांची पोकलॅनच्या साहाय्याने १३ किलोमीटरची सफाई करण्यात येत आहे.

 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.