स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा: ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:32 AM2018-06-25T00:32:32+5:302018-06-25T00:32:37+5:30

Keep it clean, 'dry' day: easy solution to stop dengue | स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा: ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय

स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा: ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय

Next


कोल्हापूर : शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठेवणे, असे सोपे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्वरूपातील स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध परिसरांत डेंग्यू, हिवतापसदृश रुग्ण आढळत आहेत. महानगरपालिका शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवीत आहे.
या मोहिमेसह नागरिकांनी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वच्छता राखण्यासह दक्षता घेणे आवश्यक आहे. अनेकांच्या घर आणि दुकानांमध्ये फूलदाणी, धातूचे कासव, फेंगशुईचे बांबू, ग्लासमध्ये लिंबू, फिश टँक, फ्रिजचे कंडेन्सर यामध्ये पाणी असते. ते आठ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास त्यात अळ्या होण्याची शक्यता असते; त्यामुळे ते रोज बदलावे. या वस्तूंसह घरातील टेरेस आणि जमिनीवरील पाण्याच्या टाक्या, पाणी साठविलेली भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करून ती २४ तासांपर्यंत कोरडी ठेवावीत. घर, कॉलनी, अपार्टमेंटचा मोकळा परिसर आणि गटारी स्वच्छ ठेवाव्यात. अनावश्यक झुडपे काढावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे कॅन, आदींमध्ये पाणी साचू देण्यात येऊ नये.
कायमच्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावेत. ‘डेंग्यू’ला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

सोपे उपाय
घरगुती पाणीसाठे, बॅरेल, हौद, गच्चीवरील टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात.
टायर, माठ, पत्र्याचे डबे, नारळाची करवंटी यांची योग्य विल्हेवाट लावावी.
गटारे वाहती करावीत. डबकी बुजवून परिसर स्वच्छ ठेवावा.
परिसरात गवती चहा, कडूनिंब, तुळशीची रोपे लावावीत.
आहारात हे असणे उपयुक्त
पपईमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. त्याचे सेवन हे रक्तातील प्लेटलेट्स वाढविते. आले घातलेला चहा अ‍ॅँटी बॅक्टेरिअल असतो. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असते. करक्युमिन असलेली हळद, ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्र्यांचा रस आहारात असणे उपयुक्त आहे.

Web Title: Keep it clean, 'dry' day: easy solution to stop dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.