- वसंत भोंसले
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा ‘लगे रहो मुन्नाभाई!’ हा गाजलेला चित्रपट १ सप्टेंबर २००६ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याला आता अकरा वर्षे होत आहेत. यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रसार फारच मार्मिकपणे करण्यात आला होता. चित्रपटाचा नायक संजय दत्त हा एका रेडिओ जॉकीच्या प्रेमात पडलेला असतो. तिला त्याने आपले पूर्वायुष्य सांगितलेले नसते. खोटी माहिती दिलेली असते. त्याचा त्याला पश्चात्ताप होत असतो. अशा प्रसंगात महात्मा गांधी प्रकट होतात आणि केवळ नायक संजय दत्त याच्याशीच संवाद साधून खरे बोल, सच्चाई के राहो पें चलते रहो, असा उपदेश करतात. त्यांच्या विचाराने हा नायक वागू लागतो. त्याच्या संकटसमयी महात्मा गांधी प्रकट होऊन त्यास जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतात आणि हे सुद्धा बजावून सांगतात की, माझ्या विचाराच्या वाटेने चालणे कठीण आहे. कारण मी सत्याचा, अहिंसेच्या मार्गाने जाण्यास सांगतो. तो मार्ग महाकठीण आहे; पण सत्य हे आहे की, अंतिमत: तोच मार्ग मानवाच्या कल्याणाकडे घेऊन जाणारा आहे.
हा चित्रपट आणि महात्मा गांधी यांचे विचार सांगण्यासाठी त्यांच्या अदृश्य प्रतिमेचा केलेला वापर आठवण्याचे कारण मुंबईत आॅगस्ट क्रांतिदिनी आझाद मैदानावर निघालेला सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा. हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ गेले होते. दरम्यानच्या वेळेत मुलींची भाषणे चालू होती. यावेळी संयोजकांतर्फे पंधरा मागण्यांचे निवेदन वाचून दाखविण्यात येत होते. शेती, शेतकरी, शिक्षण, आरक्षण, ग्रामविकास, सामाजिक-सांस्कृतिक संघर्ष आदी विषयांचा त्यामध्ये उल्लेख होता. या मागण्यांच्या निवेदनात राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्याचा कार्यक्रमच दिसत होता. सकल मराठा समाजाला राजर्षी शाहू महाराज आझाद मैदानावर मागे उभे राहून जणू हा कार्यक्रम सांगत आहेत, असे भासत होते. सर्व बहुजन समाजाच्या विकासासाठी राजर्षी शाहू महाराज असाच कार्यक्रम कोल्हापूर संस्थानच्या जनतेसाठी राबवित होते. शेतकºयांना उन्नत करण्याचा कार्यक्रम त्यात होता. शेतमालाला भाव मिळावा, शेतीचे उत्पन्न वाढवावे, शेतमालावर प्रक्रिया करावी, शेतकºयांना अर्थपुरवठा करण्यात यावा, औद्योगिकीकरण व्हावे, यासाठी जे काही करता येईल त्याचा विचार मांडला. शिवाय त्याप्रमाणे कृती त्यांनी केली. राज्यकर्ता कसा असावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांनी तरुण पिढीला शिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यातील मुख्य अडचण ही कोल्हापूरसारख्या शहरात राहण्याची सोय नव्हती म्हणून विविध समाज घटकांसाठी वीस वर्षांत बावीस वसतिगृहे स्थापन केली. त्यांना जागा दिल्या, इमारती बांधून दिल्या, त्यांना अनुदान मंजूर केले, कायमस्वरूपी उत्पन्नासाठी जागा दिल्या. आरक्षणाची तरतूद करणारा कायदा केला. सकल मराठा समाज ज्या पंधरा मागण्या करीत होता त्यापैकी अलीकडच्या घटनासंबंधीच्या एक-दोन मागण्या सोडल्या, तर राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची कार्यक्रमपत्रिकाच ती होती.
कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानचे राजर्षी शाहू महाराज राजे होते. उत्पन्नाची साधने मर्यादित, त्यामुळे उत्पन्न जेमतेम होते. हिंदुस्थानातील हैदराबाद, बडोदा, म्हैसूर किंवा ग्वाल्हेरसारख्या विस्ताराने आणि उत्पन्नाने मोठ्या संस्थानासारखे कोल्हापूर संस्थान नव्हते. तरीसुद्धा मर्यादित साधनांनिशी राजर्षी शाहू महाराज सकल समाजासाठी सर्व पातळीवर लढा देत होते. संस्थानमधील आपल्या सर्व समाज बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपासून उद्योगधंदे, व्यापारवृद्धी ते पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंतची त्यांची कार्यक्रमपत्रिका तयार होती. आजच्या भाषेत म्हणजे विकासाचे व्हिजन डॉक्युमेंटच होते. शेती-शेतकरी तसेच ग्रामीण भागात राहणाºया मराठा समाजाचे दु:ख वेशीवर मांडताना सकल मराठा समाज मोर्चाने ही कार्यक्रमपत्रिका तयार केली होती, असे वारंवार जाणवत होते. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज तेथे प्रकट झालेत आणि राज्यकर्त्यांनी हा कार्यक्रम हाती घ्यावा, असे मोर्चातील नायकांना सांगत आहेत, असे जाणवत होते.
महाराष्ट्रातील मराठा समाज एक-दोन नव्हे, तर अठ्ठावन्न प्रचंड मोर्चे काढून काय सांगत होता? मराठा समाजातील दु:ख आणि असंतोष हा काय आहे? त्याचे शेतीवर जगणं आणि ग्रामीण भागात राहणं काय आहे? त्याच्या उन्नतीसाठी राज्यकर्त्यांनी कोणती धोरणे स्वीकारायला हवी आहेत? विसाव्या शतकाच्या आरंभी राजर्षी शाहू महाराज जागतिक बदलाची विशेषत: युरोपमधील प्रगती अभ्यासून, पाहून धोरणे आखत होते. आज मराठा समाज जिल्ह्या-जिल्ह्यांत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करतो आहे. ती केव्हा उभा राहतील माहीत नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी १९०१ मध्ये पहिले वसतिगृह सुरू केले आणि वीस वर्षांत (१९२१) बावीस याप्रमाणे दरवर्षी एक अशी वसतिगृहे उभी केली. एवढेच नव्हे तर इंग्लंडमध्येसुद्धा आपल्या संस्थानातील मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी लंडनमध्ये जागा पाहण्याची चाचपणी केली होती. आपली ग्रामीण भागातील मुले केवळ कोल्हापूरला येऊन नव्हे, तर युुरोपातील उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला जावीत, असा विचार त्यांच्या मनात होता. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. बावीसावे रजपूतवाडी बोर्डिंग १९२१ मध्ये उभारले आणि पुढील वर्षी त्यांचे निधन झाले, अन्यथा कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानचा हा लोकराजा जागतिकीकरणाला शंभर वर्षांपूर्वीच स्वीकारण्यासाठी धडपड करीत होता.
‘लगे रहो मुन्नाभाई’मधील महात्मा गांधी सामान्य नायकाला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत मागे उभे राहतात. तसेच जणू ही कार्यक्रमपत्रिका पाहून राजर्र्षी शाहू महाराज सकल मराठा समाजाला मार्गदर्शन करीत नसतील ना? असा भास होत होता. आज हाच विचार सोडून महाराष्ट्र अलीकडच्या काळात वाटचाल करू पाहात असल्याने असंतोष वाढतो आहे. महाराष्ट्रातील लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त होते, हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्यकर्त्यांना झोपा कशा येतात? त्यांना सत्कार, हार-तुरे स्वीकारावे असे कसे वाटते? महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेलच चुकीच्या मार्गाने चालले आहे, असे का वाटत नाही? पै न् पैै गोळा करून सामुदायिक पद्धतीने शेती आणि त्यावर आधारित सहकारी कारखानदारी, दुग्ध, पशुपालन, आदी व्यवसाय मोडीत निघत असताना हे गुन्हे करणाºयांना अटकाव कसा होत नाही? त्यांना तुरुंगात कसे डांबले जात नाही? सामान्य माणसाला उच्चशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आर्थिक भार कसा उचलत नाही? आरक्षणाची मागणी ही केवळ नोकरीपुरती नाही. सरकारी नोकºयांसाठीच आरक्षण लागू होते पण एकूण रोजगारनिर्मितीत सरकारी नोकºयांचे प्रमाण किती? आरक्षणाचा खरा लाभ शिक्षणात होतो. ज्याला ज्याला शिकायचे आहे त्याला आर्थिक पाठबळ नाही म्हणून दर्जेदार शिक्षण मिळत नसेल, तर ती शाहू-फुले-आंबेडकर विचारांशी प्रतारणा नाही का? त्यांच्या विचारानुसार समाजाला समान संधी आणि उन्नतीसाठी साधने न देता स्मारकांचे भावनिक आवाहने करीत तरुणांना भुलवित ठेवणारे राज्यकर्ते काय कामाचे आहेत?
जागतिकीकरणानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील तरुण बदलला आहे. समाज बदलला आहे. त्या बदलात आपले शिक्षण कोणत्या दर्जाचे आहे? अनेकवेळा जागतिक पातळीवर शिक्षण संस्थांचे मानांकन जाहीर होते. त्यात पहिल्या शंभरमध्ये भारतातील एकही संस्था असू नये याचे दु:ख होते. परिणामी केवळ नोकरीसाठी नव्हे, तर लाखो रुपये खर्च करून तरुण-तरुणी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. अमेरिकेतील बफेलो शहरात एक विद्यार्थी अलीकडेच गेला, त्याच्या राहण्याच्या व्यवस्थेविषयी विचारता तो म्हणतो, आम्ही महाराष्ट्रातील चार-पाच मुलांनी एकत्र येऊन फ्लॅटच घेतला आहे. तेथे एकत्र राहून शिक्षण घेणार आहोत. ते ज्या प्रकारचे शिक्षण घेऊ इच्छितात ते आपण का देऊ शकत नाही?
आपल्या संस्थानातील विद्यार्थ्यांसाठी केवळ कोल्हापुरात वसतिगृहे काढण्याचा विचार राजर्षी शाहू महाराज यांनी केला नाही, तर लंडनमध्येही ते वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांच्या राहण्याची मोफत सोय ते करणार होते. जे विचार त्यांनी शंभर वर्षांपूर्वी करून कार्यक्रम राबविला, त्याच धर्तीवरचा कार्यक्रम आजचे सरकारही राबवित नाही. तेव्हा लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूून मागणी करावी लागते. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे वसतिगृहे बांधणार असे आजचे सरकार छाती फुगवून सांगत आहे. हा विचार राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी
कृतीत आणला आहे. एवढा मोठा इतिहास आपल्यासमोर असताना त्यातून आपण काय आदर्श घेतो आहोत?
आॅगस्ट क्रांती मैदानावर सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचाच जागर पुन्हा एकदा करून नव्या बदलानुसार, नव्या जगानुसार नवे धोरण आखून त्यांच्याच विचारमार्गाने जाण्याचा आग्रह धरला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पण हे करण्यासाठी आपले राज्यकर्ते