जे. पी. नाईक यांनी शिक्षणाला दिशा दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:10 AM2018-04-24T01:10:56+5:302018-04-24T01:10:56+5:30

J. P. Naik gave direction to education | जे. पी. नाईक यांनी शिक्षणाला दिशा दिली

जे. पी. नाईक यांनी शिक्षणाला दिशा दिली

googlenewsNext


उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. जे. पी. नाईक स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
शरद पवार यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण, बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पवार यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला.
यावेळी शरद पवार यांनी प्रा. किसनराव कुराडे यांच्या ‘बहिरेवाडीचे जे. पी. ते काठीवाडीचे एस. पी.’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. स्मारकाचे बांधकाम करणारे ठेकेदार जयसिंग चव्हाण, रचनाकार संदीप गुरव यांचा सत्कार केला.
शरद पवार म्हणाले, डॉ. जे. पी. नाईक यांनी म्हैस व दोन एकर शेतीवर उपजीविका करत चौथीनंतरचे शिक्षण बाहेर घेतले. जागतिक शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या शंभर लोकांमध्ये रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधीनंतर डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव घेतले जाते. त्यांचासारखा मोठा माणूस आपल्या मातीत तयार होऊन जगाला दृष्टी देतो हे महानकार्य त्यांनी केले. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, महिलांच्या शिक्षणाची काळजी, औद्योगिक क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व याबाबत डॉ. नाईक हे भाष्य करायचे. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत नोकरीत करीत त्यांनी कोल्हापूर शहराचा आराखडा तयार केला. देशपातळीवर शिक्षणाचे काम करीत असताना कोल्हापूर, गारगोटी येथे विद्यापीठे सुरू केली.
कोल्हापूरच्या मातीत अनेक कर्तृत्ववान माणसे शाहू महाराजांच्या विचाराने तयार झाली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाईक यांचे कार्य जनतेला प्रेरित होईल. स्मारकासंदर्भात कै. बाबासाहेब कुपेकर यांचा पाठपुरावा असायचा. आमदार हसन मुश्रीफ यांनी हे काम उत्तम करून घेतले.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, स्मारकासाठी कै. सु. रा. देशपांडे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे यांनी पाठपुरावा केला. उर्वरित कामासाठी निधीची गरज आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम अपुरे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला आले असते तर निधीसाठी विचारणा झाली असती. डॉ. जे. पी. नाईक स्मारकाची देखभाल व दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळातून झाली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास वाईचे आमदार मकरंद आबा पाटील, माजी आम. श्रीपतराव शिंदे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार भरमू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, वसंतराव धुरे, प्रा. किसनराव कुराडे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, विष्णुपंत केसरकर, जि. प. सदस्य सतीश पाटील, जयवंत शिंपी, मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, डॉ. नाईक यांचे नातू प्रकाश मंत्री, किरण कदम, चंद्रकांत गोरुले, प्रा. जे. बी. बारदेस्कर, संजय शेणगावे, बी. आर. कांबळे, तहसीलदार अनिता देशमुख, संभाजी तांबेकर, उपसरपंच सुरेश खोत यांनी, तर आजरा पंचायत समितीतर्फे सभापती रचना होलम, उपसभापती शिरीष देसाई, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच अनिल चव्हाण यांनी स्वागत केले. डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी समीर देशपांडे यांनी घेतला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. उपअभियंता कांबळे यांनी आभार मानले.
मुश्रीफ निधी आणतील
च्डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी दोन कोटी निधीची गरज असल्याचे आमदार मुश्रीफ
यांनी सांगितले. यावर पवार म्हणाले, सरकार गमतीशीर आहे. निधी देईल की नाही शंका आहे. पण मुश्रीफ निधी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या कामाचा लौकिक मोठा आहे.
शा. ब. मुजुमदार यांचे कौतुक
गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागातून देश-विदेशांत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे पद्मविभूषण डॉ. शा. ब. मुजुमदार यांचा उल्लेख पवार यांनी करून ग्रामीण भागातील व्यक्ती काय करू शकते हे सांगून त्यांनी डॉ. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबाबत कौतुक केले.

Web Title: J. P. Naik gave direction to education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.