The increase in students in Maharashtra is 'Delhi' | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘दिल्ली’ महागली, रेडिरेकनरमधील वाढ

ठळक मुद्देजीएसटीचा परिणाम; दरमहा सहा हजारांनी खर्च वाढलामहाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

संतोष मिठारी

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली महागली आहे. रेडिरेकनरमधील (बाजारमूल्य) वाढ आणि जीएसटीमुळे निवास व्यवस्था, क्लासेसचे शुल्क आणि जेवण यासाठीचा दरमहा एका विद्यार्थ्याचा खर्च किमान सहा हजारांनी वाढला आहे.


दिल्लीतील मुखर्जीनगर, करोल बाग, ओल्ड राजेंद्रनगर परिसरात युपीएससी परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारे वीसहून अधिक क्लासेस आहेत. त्यामुळे या परिसरात राहण्यास युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी प्राधान्य देतात. करोल बाग आणि ओल्ड राजेंद्रनगरसह विविध भागांत महाराष्ट्रातून आलेले तब्बल १५ हजार विद्यार्थी राहतात. त्यामध्ये अधिकतर मुलांची संख्या आहे. बहुतांश विद्यार्थी हे वन बीएचके फ्लॅट हा तीन ते चार जणांमध्ये भाडेतत्त्वावर घेतात. त्यासाठी त्यांना एकत्रितपणे दरमहा २० ते २२ हजार रुपये भाडे द्यावे लागते.

दिल्लीमध्ये दर अकरा महिन्यांनी रेडिरेकनरमध्ये वाढ होते. त्यानुसार सरासरी दहा टक्क्यांनी घरभाड्यामध्ये वाढ केली जाते. रेडिरेकनर वाढल्याने यावर्षी आॅक्टोबरपासून दहा टक्क्यांनी घरांची भाडेवाढ झाली आहे शिवाय जीएसटीमुळे क्लासेसचे शुल्क वाढले आहे. क्लास झाल्यानंतर अभ्यासासाठी त्यांना काही खासगी ग्रंथालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी दरमहा १५०० ते १८०० रुपये मोजावे लागतात.

एकूणच पाहता या विद्यार्थ्यांच्या दर महिन्याचा खर्च सहा हजारांनी वाढला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक नियोजनाची कसरत करावी लागत आहे. युपीएससीतील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यासाठी दिल्लीतील या विद्यार्थ्यांना ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची व्यवस्था करणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

  1.  दीपक नराळे (अकलूज) : रेडिरेकनरमधील वाढ आणि जीएसटीमुळे दर महिन्याच्या दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. घरभाडे आणि जेवणामध्ये काहीच तडजोड करता येत नाही. क्लास आणि रूममध्ये अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रंथालय, अभ्यासिका लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने दिल्लीमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि वसतिगृह सुरू करावे. पुण्यातील यशदा, मुंबईतील ‘एसआयएसएच’सारखी संस्था दिल्ली सुरू करण्याची गरज आहे.
  2.  
  3. राहुल सावंत (कोल्हापूर) : दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये ग्रंथालय आहे; पण, त्याठिकाणी ‘युपीएससी’साठीची पुस्तके उपलब्ध नाहीत. जुन्या महाराष्ट्र सदनमधील ग्रंथालय आमच्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास किमान १५०० ते १८०० रुपयांची आमची बचत होईल.

 

अकरा महिन्यांचा पर्याय

दिल्लीतील क्लासेसचे वर्ग हे अकरा महिन्यांचे असतात. त्यामुळे इतक्या कालावधीपर्यंत त्यांना दिल्लीमध्ये राहावेच लागते. वर्षागणिक वाढणारा खर्च परवडणारा नसल्याने काही विद्यार्थ्यांनी अकरा महिन्यांचा क्लास करून परत आपआपल्या शहर, गावांमध्ये जाऊन परीक्षेची तयारी करण्याचा पर्याय निवडला आहे.