ठळक मुद्दे ५०० हून अधिक घरात पाणी शिरले, अनेक वाहने वाहून गेली प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसानरस्ते उखडले, बेसमेंट बनले तलावखंडीत झालेला वीज पुरवठा यामुळे सर्वत्र घबराटकळंबा तलाव पुर्ण क्षमतेने भरला

कोल्हापूर : वीजांच्या गडगडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहा:कार उघडला. ढगफुटीसारख्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहनेही वाहून गेली. पाचशेहून अधिक घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरात शिरलेले पाणी, खंडीत झालेला वीज पुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.


कोल्हापूर शहरातील पावसाचे प्रमाण ठिकठिकाणी वेगळे होते, पण रात्री ११. ४५ ते २.४५ या कालावधीत सरासरी ७0 ते ८0 मि.मी.च्या दरम्यान पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.


अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की अवघ्या काही मिनिटात शहरातील ओढे, नाले, गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहायला लागले.

शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यांदा सोडली, आणि घरात पाणी शिरायला सुरवात झाली. शहरात अनेक घरातून पाणी तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यात पाणी शिरल्याने त्यातील घाण घरात पसरली.


शास्त्रीनगर, मोरेवाडी, अ‍ॅस्टर आधार, रायगड कॉलनी, जोतिर्लिंग हौसिंग सोसायटी परिसरातील चार चाकी वाहने, दुचाकी वाहने, रिक्षा वाहून गेली.

रात्रीच्या पावसाने पाचगाव येथील सहा घरात पाणी शिरले. सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील व त्यांच्या सहकाºयांनी पाणी बाहेर काढण्यास रात्री ३ वाजता मदत केली. या पावसात त्यांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. उपनगरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे १00 ते १५0 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उपनगरातील वर्षानगर, आर. के. नगर, राजेंद्र नगर, देवकर पाणंद, रामानंद नगर, कळंबा, पाचगांव परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. शहरातील पारीख पूलासह अनेक मार्ग बंद झाले. रामानंद नगर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुसळधार पावसात जयंतीनाला पाईपलाईनचे तीन भाग झाले आहेत.


उपनगरातील जरगनगर येथील नवीन पुलाजवळील रस्ता खचला असून जरगनागर येथील ओढ््याजवळ एक कार वाहून गेली आहे. साळोखेनगर येथील राजे संभाजी शाळेजवळ पूल खचला असून या पुलावरील रस्त्याला भगदाड पडले आहे. उजळाईवाडी विमानतळ रोडवरील नाल्यावरील बांधकाम वाहून गेले आहे. परिसरात ठिकठिकाणच्या ओहोळात धबधबे मात्र ओसंडून वाहत आहे.
उपनगरातील नागरी वस्तीत पाणी घुसल्याने महापौर, आयुक्तांनी प्रशासनासह पाहणी केली.

दरम्यान, परिसरातील नागरिक नाले-सफाई आणि नाल्यावरील आतिक्रमणावरुन आक्रमक झाले आहेत. डायना बिल्ट येथे घरात घुसलेले पाणी बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी कंपाऊंडच्या भिंती फोडल्या. बोन्द्रेनगरात नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नागरी वस्तीत पाणी घुसले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी साईसृष्टी बिल्डरचे कार्यालय फोडले. बोन्द्रे नगर शिवशक्ती कॉलनी येथे घरांची कंपौंडची भिंत कोसळल्याने गटाराचे नाले बनले. पाचगांव मगदूम कॉलनीतील ओढ्यालगत असलेल्या जवळपास दहा बारा घरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचे पाणी शिरले.


दरम्यान, रात्रीच्या या जोरदार पावसाने कळंबा तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे. कळंबा तलावाची पाणी पातळी साडे तेवीस फुटावरून सत्तावीस फुटावर स्थिरावली आहे. तलाव काठोकाठ भरला असून अवघे सहा इंच पाणी वाढल्यास सांडव्यावरून पाणी उलटू लागेल, अशी स्थिती आहे.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.