लालभडक डाळिंब २० रुपये किलो, कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:30 AM2018-12-03T11:30:10+5:302018-12-03T11:35:22+5:30

कोल्हापुरात डाळिंबांची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. लालभडक डाळिंबांचा २० रुपये किलो दर झाला आहे. संत्री, सफरचंदे, बोरांची बाजारात रेलचेल दिसत आहे.

Gramflour pomegranate Rs 20 / kg, vegetable prices in Kolhapur rose | लालभडक डाळिंब २० रुपये किलो, कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारले

डाळिंबांची आवक सध्या वाढल्याने दरात घसरण झाली आहे. लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात लालभडक डाळिंबे २० रुपये किलो राहिली. (छाया - नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देलालभडक डाळिंब २० रुपये किलो, कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकडधान्याचे दर तुलनेत स्थिर, संत्री, सफरचंदांची रेलचेल वाढली

कोल्हापूर : कोल्हापुरात डाळिंबांची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. लालभडक डाळिंबांचा २० रुपये किलो दर झाला आहे. संत्री, सफरचंदे, बोरांची बाजारात रेलचेल दिसत आहे.

भाजीपाल्याची आवक स्थिर असली तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर वधारले आहेत. ओल्या वाटाण्याची आवक थोडी वाढल्याने दरात थोडी घसरण झाली आहे. कडधान्यांचे दर तुलनेत स्थिर राहिले आहेत.

बाजार समितीत डाळिंबांच्या रोज ५०० हून अधिक कॅरेटची आवक होते. घाऊक बाजारात १० ते ४० रुपये दर असला तरी किरकोळ बाजारात लालभडक डाळींब २० रुपये किलोपर्यंत खाली आले आहे. संत्र्यांची आवक वाढली आहे. पिवळीधमक संत्री ५० रुपये प्रतिकिलो असून, खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडताना दिसत आहेत.

संत्र्यांच्या आवकेत वाढ झाली असून लक्ष्मीपुरी आठवडी बाजार पिवळ्याधमक संत्र्यांनी फुलून गेला होता.  (छाया- नसीर अत्तार)

‘अ‍ॅपल’ बोरांची आवकही चांगली आहे. आवळा, सीताफळ, कलिंगडांची आवक जेमतेम असून चिक्कू, पेरू यांची आवक वाढत आहे. थंडी वाढू लागल्याने लिंबंूच्या मागणीत घट झाली. परिणामी दरही घसरले आहेत. चांगला रसरशीत लिंबू रुपयाला मिळत आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ओली मिरची, ढबू, घेवडा, गवार, कारली, भेंड्यांच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. फ्लॉवर, गाजर, श्रावणघेवडा, दोडका, वरण्याचे दर स्थिर आहेत.

पालेभाज्यांची आवक चांगली आहे, मेथी, पोकळा, शेपू दहा रुपये पेंढी राहिली आहे. कोबी, वांग्यांचे दर थोडी कमी झाले आहेत. घाऊकमध्ये वांगी २० रुपये असली तरी किरकोळमध्ये सरासरी ४० रुपये किलो दर आहे. कोबीचा गड्डा १० रुपये तर फ्लॉवर २० रुपये आहे.

तूरडाळ, हरभराडाळींसह एकूणच कडधान्यांचा बाजार थोडा शांत दिसत आहे. साखर, शाबूचे दरही स्थिर राहिले आहेत. कांद्यांची आवक वाढल्याने दरात थोडी घसरण झाली असून घाऊकमध्ये चार ते १३ रुपये किलो दर राहिला आहे. बटाट्याच्या दरात थोडी सुधारणा झाली असून, लसणाचे दर तुलनेत स्थिर आहेत.

‘द्राक्षे’, ‘हरभरा पेंढी’ची आवक!

द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास अद्याप वेळ असला तरी यंदा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात द्राक्षांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात ४० रुपये किलो दर आहे. हरभरा पेंढीची आवक सुरू झाली असून, पेंढीचा दर पाच रुपये राहिला आहे.

गूळ जैसे थे

गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुळाच्या आवकेत थोडी वाढ झाली असली तरी दर जैसे थे आहेत. बाजार समितीत गुळाचा दर सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल, तर एक किलो बॉक्सचा दर ३४०० रुपये राहिला आहे.

प्रमुख भाज्यांच्या घाऊक बाजारात दरदाम, प्रतिकिलो असा -

कोबी- ५, वांगी- १४, टोमॅटो- ७, ढबू- २५, गवार- ४०, घेवडा- २५, कारली- २०, ओला वाटाणा- ४५, भेंडी- ४०, वरणा- ३०, दोडका- १०.



 

 

Web Title: Gramflour pomegranate Rs 20 / kg, vegetable prices in Kolhapur rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.