ध्येयनिष्ठ, जिद्दी श्रावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:29 PM2018-10-17T23:29:59+5:302018-10-17T23:30:16+5:30

एखादी गोष्ट मिळवायचे जर ध्येय निश्चित केले तर ते मिळविणारच! हीच तिची महत्त्वाकांक्षा. या महत्त्वाकांक्षेमुळे तिने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे तिने मणिपाल युनिव्हर्सिटीतून

Goal-seeker | ध्येयनिष्ठ, जिद्दी श्रावणी

ध्येयनिष्ठ, जिद्दी श्रावणी

googlenewsNext

- तानाजी पोवार, कोल्हापूर

एखादी गोष्ट मिळवायचे जर ध्येय निश्चित केले तर ते मिळविणारच! हीच तिची महत्त्वाकांक्षा. या महत्त्वाकांक्षेमुळे तिने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे तिने मणिपाल युनिव्हर्सिटीतून अभियांत्रिकी विद्याशाखेची पदवी घेतल्यानंतर थेट ‘ग्लॅमर’चे ध्येय बाळगले. खरे तर तिला लहानपणीपासूनच ‘ग्लॅमर’च्या मागे लागण्याची सवय; पण आई-वडिलांचा सक्त विरोध.

अशा परिस्थितीत तिने ‘इन्स्टाग्राम’वर एका सौंदर्य स्पर्धेची जाहिरात पाहिली. नशीब खुणावत होतं म्हणून त्या जाहिरातीला क्लिक केले, फोटोही पाठविले आणि भाग्यच उजळले. थेट आॅडिशनसाठी निमंत्रण आले अन् प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने ‘ग्लॅमॉन मिस इंडिया’ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्यांत स्थान मिळवत ‘मिस बेस्ट टॅलेंट २०१८’ हा किताब पटकाविला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना, पहिल्या प्रयत्नातच सौंदर्य स्पर्धेचे ध्येय गाठण्यासाठी दुर्गा बनलेली ही कोल्हापूरची श्रावणी सुभाष नियोगी.

श्रावणी ही तशी ‘फोरसाईट’चे प्रमुख सुभाष नियोगी यांची मुलगी होय. सामान्य कुटुंबातील. १९९९ मध्ये कोल्हापुरात आलेल्या मिस वर्ल्ड युक्ता मुखीला पाहिले. तिच्या डोक्यावर चमकणारा मुकुट माझ्याही डोक्यावर चमकावा, अशी सुप्त इच्छा तिने या वयात आईशी बोलून दाखविली. त्यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकताना, श्रावणीने ‘मी मिस वर्ल्ड होणार’ हा निबंध लिहिल्याने शिक्षिकाही आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पुढे तिने अभियांत्रिकी विद्याशाखेची पदवी मिळविली. पुण्यातील कंपनीत नोकरीही मिळाली.

ग्लॅमरशिवाय कथ्थक डान्स, कविता, पेंटिंग, गायन हेही छंद तिने जोपासले; पण सौंदर्यवती होण्याची सुप्त इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती.योगायोगाने तिची ‘ग्लॅमॉन मिस इंडिया’ स्पर्धेच्या आॅडिशनसाठी निवडही झाली, निमंत्रणही आले; पण प्रारंभी आई-वडिलांनी नकार दिला; पण तिच्या ध्येय व जिद्दीला नंतर साऱ्यांनीच संमती दिली. आॅडिशनमधूनही निवड झाल्याने तिने आपल्या आईलाच प्रश्न केला,

‘आई, आता पुढे काय?’
त्यानंतर या सौंदर्य स्पर्धेबाबत अनेकांकडे चौकशी केली, अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्याने गैरसमज दूर झाले; पण या स्पर्धेत उतरण्यासाठी वडिलांचा विरोध राहिलाच. त्यावेळी वडिलांची परवानगी काढून तिने ‘मला स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करावयाची आहे. माझी माझ्याशीच स्पर्धा आहे,’ हे ध्येय बाळगले. सौंदर्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर तिने चिकाटी बाळगून ट्रॅडिशनल डान्स सादर करताना महाराष्टÑीय मराठमोळा बाणा सोडला नाही. त्यात तिने महाराष्टÑीय संस्कृतीचे दर्शन घडविल्याने अनेकजण खुश झाले. कोल्हापूरच्या शिल्पा देगावकर या योग डान्स टीचर कोरिओग्राफर होत्या.

अगोदरपासून कथ्थक डान्स अंगात रुजल्याने ‘ग्लॅमॉन मिस इंडिया’ स्पर्धेत त्यांची चांगलीच मदत झाली. त्यानंतर हळूहळू स्पर्धेतील टप्पे पार करताना तिने खूप मेहनत घेतली. प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास वाढत गेला. पुढे प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ‘ग्लॅमॉन मिस इंडिया’ स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांमध्ये स्थान मिळवीत ‘मिस बेस्ट टॅलेंट २०१८’चा मानाचा मुकुट श्रावणीच्या डोक्यावर चढला. आता पुढे चित्रपट, जाहिरात, म्युझिक अल्बममध्ये करिअर करण्याचे तिने ठरविले आहे. खसंपूर्ण भारतातून २५ राज्यांमधून १००० स्पर्धक सहभागी झाले होते.
 


मी कधीही हार पत्करून मागे वळलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात मी लक्ष्य पक्के करते. त्यानंतरच ते गाठते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे वेगळेपण जपले पाहिजे. तुम्हाला तुमचे वेगळेपण माहीत झाले की ते बाहेर काढा. यश नक्कीच मिळेल. मग ते क्षेत्र कोणतेही असो; पण त्यावेळी आपली संस्कृती मात्र विसरू नये.
- श्रावणी सुभाष नियोगी, मिस बेस्ट टॅलेंट किताब विजेती, ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धा.

 

Web Title: Goal-seeker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.