ठळक मुद्दे कोल्हापुरातील उद्योजकांशी समस्यांसंदर्भात चर्चाविजेचे दर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्टÑ या ठिकाणी वेगवेगळे आहेतकेंद्र सरकारची योजना असलेले ‘मुद्रा लोन’ बॅँका देत नाहीत

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्राचे जाळे अधिक मजबूत करायचे असेल तर राज्यातील सर्व भागांतील उद्योजकांना एकाच समान दराने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. या मागणीसह ‘मुद्रा लोन’चा विषय हाती घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही उद्योगात विजेचा कच्चा माल म्हणूनच वापर केला जातो. विशेषत: फौंड्री, स्टील उद्योगांना वीज ही कच्चा माल म्हणूनच लागते; परंतु या विजेचे दर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्टÑ या ठिकाणी वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दरआकारणी केली जाते, सबसिडी दिली जाते; त्यामुळे वीजदरात ही तफावत आहे; परंतु औद्योगिक विकास साधायचा असेल आणि उद्योगांचे क्षेत्र अधिक मजबूत करायचे असेल तर त्यासाठी राज्यात सर्वत्र विजेचे दर सारखेच असले पाहिजेत. म्हणूनच याचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, असे मंडलेचा म्हणाले.

एकीकडे सौरऊर्जेचे उत्पादन पाच ते सहा पटींनी वाढल्याचा दावा केला जातो; पण उत्पादन वाढते तेव्हा दर कमी होतात, याचा अनुभव या सौरऊर्जेच्या बाबतीत आलेला नाही. त्यामुळे जाहीर केलेल्या खºया आकड्यांचेही आता संशोधन करावे लागेल, असे मंडलेचा म्हणाले.

नोटबंदी, जीएसटी, लोड शेडिंग यांचा राज्यातील उद्योग क्षेत्रावर परिणाम तसेच त्रास झाला असला तरी परिस्थिती आता सुधारत आहे. आर्थिक शिस्त यायला लागली आहे. केंद्र सरकारच्या दीर्घ मुदतीच्या योजना चांगल्या आहेत; परंतु त्यांचे परिणाम यायला आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारची योजना असलेले ‘मुद्रा लोन’ बॅँका देत नाहीत, अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे हा विषयही आम्ही हाती घेणार आहोत. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाºयांना भेटून याबाबत तक्रारी केल्या जातील. जिल्हाधिकाºयांमार्फत मुद्रा लोन देण्यासाठी बॅँकांवर दबाव आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, मंडलेचा यांनी कोल्हापुरातील उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जयेश ओसवाल, शिवाजीराव पोवार, चंद्रकांत जाधव, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, आनंद माने, हरिभाई पटेल, बाबासो कोंडेक र, राजू पाटील, आदी उपस्थित होते.

कृषी उद्योगाबाबत फेब्रुवारी २०१८ मध्ये परिषद
राज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्टÑ चेंबरने नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नवीन संधी याविषयी विशेष परिषद फेबु्रवारी २०१८ मध्ये कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडित विविध तरतुदी, समस्या यांच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजार समित्यांशी निगडित घटकांची राज्यस्तरीय परिषद डिसेंबरच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाणार असल्याची माहितीही मंडलेचा यांनी दिली.