गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:49 PM2019-03-01T18:49:52+5:302019-03-01T18:53:02+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

Gaikwad factory's 'FRP' till Tuesday, administration softens after 'Swabhimani' | गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखाना चालवायला घेतलेल्या अथणी शुगर्सने थकीत एफआरपी त्वरीत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात येऊन जाब विचारला. (फोटो: नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले साखर सहसंचालक कार्यालयात तासभर ठिय्या

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

संघटनेने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. एफआरपी घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा दम भरल्यानंतर साखर आयुक्त, सहसंचालक आणि कारखान्याचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी फोनवरच बिले भागविण्याची हमी दिली.

या कारखान्यांने २३०० रुपये प्रतिटन याप्रमाणे डिसेंबरअखेरचीच बिले दिली आहेत. हंगाम बंद झाला तरी बिले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावरच हल्लाबोल केला.

जोरदार घोषणाबाजी करीत कारखान्यावर कारवाई का करीत नाही, कार्यालयाचे नेमके काम काय, दरवेळी आंदोलन केल्यानंतरच यंत्रणा हलणार काय, ‘आरआरसी’च्या कारवाया का थांबविण्यात आल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विजय पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी व आयुक्त स्तरावर कारवाईचे अधिकार असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला; पण संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारवाईचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आणि हातात बिले पडल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला.

अखेर तासभर प्रशासनाशी वाटाघाटी केल्यानंतर ५ मार्चपासून बिले जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले. आंदोलनात अण्णा मगदूम, तानाजी वठारे, आशिष समगे, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, राजाराम पटील, बाबासो पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, एकनाथ पाटील, एकनाथ पोवार, सागर शंभुशेटे सहभागी झाले.


उर्वरित कारखान्यांनीही थकीत एफआरपी लगेच द्यावी, साखर सहसंचालकांनी तशा सूचना द्याव्यात; नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. येथून पुढे येताना एकेक कारखान्यासाठी येणार नाही, एकदमच येऊन पळता भुई थोडी करीन.
भगवान काटे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 


 

 

Web Title: Gaikwad factory's 'FRP' till Tuesday, administration softens after 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.