ठळक मुद्देलखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ तलाव पर्यटकांचे आकर्षणनिसर्गाच्या सान्निध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो गर्दीमुळे हॉटेल, किराणा दुकान, निवासस्थाने यांना ‘अच्छे दिन’

गगनबावडा : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यांमुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून गगनबावाड्याचा उल्लेख केला जातो. वातावरणात थोडीशी थंडी पडू लागल्याने शाळांच्या सुट्यांमुळे हिवाळ्यातील गुलाबी थंडीतून पर्यटकांची वर्दळ गगनबावड्यात पाहावयास मिळत आहे. कोकणाला जोडणाºया करूळ व भुईबावडा या दोन्ही घाटमाथ्यांमुळे गोवा, सिंधुदुर्ग यासह कोकण दर्शनासाठी जाणाºया पर्यटकांची लागलेली रीघ दिसत आहे.

गगनबावड्यातील निसर्ग सौंदर्यात भर घालणारे लखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ या ठिकाणी असणारे तलाव पर्यटकांना आकर्षण केंद्र बनले आहे. साहजिकच पर्यटकांचा त्या ठिकाणी ओढा वाढलेला दिसतो. पाण्याने भरलेले तलाव सभोवतालची हिरवळ, झाडे, काही तलावांच्या ठिकाणी असणारे सिमेंट कट्टे, मनसोक्तपोहणे यामुळे तलाव ठिकाणी कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत. पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे सभोवताली चारचाकी, दोन चाकी वाहनांची गर्दी दिसून येते. डोंगराळ, दुर्गम कोदे या तलावाजवळ पर्यटकांसाठी जेवणासाठी हॉटेल सुविधाही मिळत आहे. त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. हिरवेगार डोंगरमाथ्यामुळे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
गगनबावड्यातील गगनगिरी महाराजांच्या गगनगिरी मठावरून (गगनगड ) कोकण दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दोन्ही घाटमाथेच्या मध्ये असणारा गगनगडावरून कोकण दृश्य टिपता येते. पळसंबे येथील जंगलातील शांत वातावरणातील ‘रामलिंग मठ’ (पुरातन लेणी) पुरातन काळाची आठवण करून देतात. येथील थंड पाण्याबरोबरच प्राचीन लेणी भुरळ घालणारी आहेत. बोरबेट येथील मोरजाई व वेताळ माळ येथील निसर्गाच्या सान्निध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो. पर्यटकांच्या या गर्दीमुळे हॉटेल, किराणा दुकान, निवासस्थाने यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

मद्यपींचा पर्यटकांना त्रास
तलावाजवळ पाणी असल्याने कुटुंबासह आलेले अनेक पर्यटक स्वत: जेवण तयार करून खातात. त्या ठिकाणी काही तरुण मंडळी दारू पिऊन तर्र अवस्थेत असतात. त्यामुळे महिला पर्यटकांना, स्थानिक स्त्रिया व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.