Free the alternative Shivaji bridge | पर्यायी शिवाजी पुलाचा मार्ग मोकळा


कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पुरातत्त्व खात्याच्या आक्षेपामुळे, या पर्यायी पुलाचे काम रखडले होते. मात्र पुरातत्त्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. थंबी दुराई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकसभेच्या कामकाजात हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. त्यामुळे पूल बांधकामातील तांत्रिक अडचणी बाजूला होणार आहेत. हे विधेयक आता अंतिम मंजुरीसाठी राज्यसभेत येणार असून दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नाही.
संसदेत वेळोवेळी शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम रखडल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांनी लक्ष वेधले होते तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्ली येथे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. केंद्रीय सांस्कृतिक व पुरातत्त्व खात्याचे मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन, पर्यायी पुलाचे काम सुरू करण्यासाठी, कायद्यात आवश्यक तो बदल अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शर्मा यांनी, १८ जुलै २०१७ रोजी लोकसभेत, ‘प्राचीन स्मारक-पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष संशोधन’ विधेयक सादर केले. मंगळवारी हे विधेयक मंजूर झाले.
हजारो व्यक्तींचा प्रश्न
ऐरणीवर : महाडिक
खासदार महाडिक यांनी चर्चेत सहभाग घेताना, पुरातत्त्व खात्याच्या सन १९५८ मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले. जनहिताच्या बाबी, ज्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे आणि जे प्रकल्प जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचे आहेत. कोल्हापुरातील शिवाजी पूल १३८ वर्षे जुना झाला असून, रोज सुमारे ५० हजार व्यक्ती ये-जा करतात. अशा परिस्थितीत अनुचित घटना घडू नये म्हणून कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केले.
पंतप्रधानांची तत्परता : संभाजीराजे
खासदार संभाजीराजे यांनी, २४ मार्च २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेमधील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले सचिव राजीव टोपनो यांना या बाबतीत त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले होते, लगेच शिवाजी पुलासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रखडलेल्या शिवाजी पुलाची माहिती व कागदपत्रे मागविली होती. त्यामुळे ेया विषयाला गती मिळाली. आता लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेत येणार असून त्याच्या मंजुरीसाठी सर्वपक्षीय खासदारांकडे सहयोग मागणार असल्याची माहिती मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी दिली.
‘भाजप-ताराराणी’तर्फे साखर वाटप
हे विधेयक संमत झाल्याचे समजताच भाजप-ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या सर्वांनी शिवाजी पुलावर साखर वाटप केले. यावेळी ताराराणी आघाडीचे प्रमुख सत्यजित कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांचे आभार मानले.
भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, किरण नकाते, शेखर कुसाळे, राजसिंह शेळके, विजय खाडे पाटील, संतोष गायकवाड, भाजप उपाध्यक्ष विजय जाधव, सुरेश जरग, संदीप कुंभार, आदी उपस्थित होते.