चित्रपट महामंडळाचा गत दोन वर्षांचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:13 AM2018-07-16T00:13:31+5:302018-07-16T00:14:09+5:30

The film industry has slipped the last two years | चित्रपट महामंडळाचा गत दोन वर्षांचा आलेख घसरला

चित्रपट महामंडळाचा गत दोन वर्षांचा आलेख घसरला

Next

इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठी चित्रपसृष्टीची शिखरसंस्था असलेले ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ निद्रितावस्थेत आहे. महामंडळावर निवडून गेलेल्या विद्यमान संचालकांनी दोन वर्षांत एक-दोन कार्यक्रमवगळता सुमार कामगिरी केली आहे. हितसंबंध, मागील संचालकांच्या कारभाराविरुद्धच्या कुरबुरी, न्यायालयीन प्रक्रिया यातच गुरफटल्याने मराठी चित्रपटसृष्टीसमोरील अडचणींकडे आणि नावीन्यपूर्ण कल्पना कृतिशीलपणे राबविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
एकेकाळी कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे केंद्र असल्याने त्याची शिखरसंस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. गेल्या ५० वर्षांत महामंडळावर नियुक्त झालेल्या सर्व अध्यक्ष व संचालकांनी महामंडळाच्या लौकिकात भरच टाकली, त्याला अपवाद ठरली ती सन २०१०-१५ या काळातील कार्यकारिणी. या काळात घडलेल्या घटनांनी महामंडळाची प्रतिमा पार डागाळली. परिणामी त्याविरोधात रान उठविलेल्या सभासदांच्या पॅनेलला सन २०१५ला निवडून दिले. या कार्यकारिणीकडून फार अपेक्षा होत्या.
मराठी चित्रपटांच्या अनुदानाचा प्रश्न रेंगाळला आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत, वितरण व्यवस्था सक्षम नाही, चित्रपट व्यवसायापुढील प्रश्न अशा अनेक अडचणी असताना त्यावर ठोस उपाययोजनांचा विचार होत नाही. शासनदरबारी काम व्हावे यासाठी कृतिशील पाऊल उचलले जात नाही. शासनदरबारी महामंडळाने काही मागण्या केल्या आहेत. मात्र. त्यांची फारशी दखल सांस्कृतिक खात्याकडून घेतली जात नाही.

सर्वसाधारण सभेला बगल
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील सहा महिन्यांत चित्रपट महामंडळाची सर्वसाधारण सभा होणे गरजेचे असते.
मात्र, नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यापासून एक विशेष सभा सोडली तर एकही सर्वसाधारण सभा घेतलेली नाही.
मागील कार्यकारिणीच्या कामाबद्दल सध्या न्यायालयीनप्रक्रिया सुरू आहे, तिचा निकाल कधी लागेल माहीत नाही.
पण विद्यमान कार्यकारिणीनेसुद्धा आपल्या तीन वर्षांतील कामाचा अहवाल सभासदांपुढे ठेवलेला नाही. त्यामुळे ‘महामंडळाचे नेमके काय चाललंय,’ अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शाखा विस्तार
कोल्हापूर हे चित्रपट महामंडळाच्या घडामोडींचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या शहरांत शाखा वाढवून महामंडळाची सभासद संख्या वाढविली जात आहे. महामंडळाचे मुख्य कार्यालय पुण्याला हलविले जावे, अशी काहीजणांची मागणी आहे. बरेच कार्यक्रम मुंबई-पुण्यातच होतात; त्यामुळे झालेले सभासद हे खरेच चित्रपट व्यावसायिक आहेत का, याची पÞडताळणी केली जावी, अशी काही चित्रपट व्यावसायिकांची मागणी आहे.

Web Title: The film industry has slipped the last two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.