लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या गोदामातून ११ हजार साखर पोती लंपास झाल्याचे शनिवारी चंदगड पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संशयित म्हणून न्युट्रीयन्स कंपनीचे मालक व कर्मचाºयांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जिल्हा बँकेचे गोडावून किपर नामदेव पाटील यांनी शुक्रवारी चंदगड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
१७ जुलै ते १0 आॅगस्ट या दरम्यान तीन नंबरच्या गोदामाचे शटर लोखंडी सळईने उचकटून गोदामातील ११ हजार नऊ क्विंटल साखर लंपास झाली आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेली दौलत न्युट्रीयन्सची साखर कारखानास्थळावरील गोदाम नंबर तीनमध्ये ठेवण्यात आली होती. त्या गोदामाच्या समोरील व मागील बाजू जिल्हा बँकेने कुलूप लावून सील केले होते. गुरुवारी गोदाम निरीक्षक नामदेव पाटील हे गोदामाच्या बाजूला फेरफटका मारत असताना गोदामाच्या मागील बाजूची कडी उचकटलेल्या अवस्थेत दिसली. संशय बळावल्याने त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून गोदामातील साखर पोत्यांची मोजदाद केली. शनिवारी चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद वाघ, संग्राम पाटील, सागर चौगुले, नामदेव पाटील, हलकर्णीचे सरपंच एकनाथ कांबळे, जिल्हा बँकेचे कर्मचारी व दौलत व्यवस्थापनाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. कागल येथील कामगारांनी गोदामातील सर्व साखर पोत्यांची पुन्हा थप्पी मारून मोजदाद करण्यास मदत केली.
दरम्यान, शनिवारी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक प्रताप चव्हाण यांनी पाहणी केली. साखर पोत्यांची संपूर्ण मोजदाद होईपर्यंत ते तेथे थांबून होते.