त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिपांनी उजळला कोल्हापुरातील ’पंचगंगा ’ किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:31 PM2017-11-04T12:31:20+5:302017-11-04T12:37:01+5:30

 पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

Due to Tripurari Purnima, the 'Panchaganga' edge in Kolhapur was brightened by Dip | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिपांनी उजळला कोल्हापुरातील ’पंचगंगा ’ किनारा

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, आकर्षक रांगोळ्यांची सजावट त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगेचा काठ ज्योतींच्या उजेडात न्हावून निघाला. (छाया : दीपक जाधव )

googlenewsNext
ठळक मुद्देशिवमुद्रा फ्रेंडस् सर्कलने लावल्या ५१ हजार पणत्या भक्ती गीतांची साथ ; रांगोळीतून प्रबोधन

कोल्हापूर ,दि. ०४ :  पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.


जीवनातील संघर्षरूपी अंधकार दूर करून आपल्या प्रकाशाने मने उजळून टाकणाऱ्या ‘दिवाळी’ची सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये भल्या पहाटे अथवा दिवेलागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करून या प्रकाशोत्सवाची सांगता करण्यात येते. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा फें्रड्स सर्कलच्यावतीने ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉइंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते.

या उत्सवाची सुरुवात दिप पुजनाने झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई , उद्योजक चंद्रकांत जाधव, सुनील पाटील, हर्ष कुलकर्णी, अमोल डांगे, अभिजीत साळोखे, डॉ. प्रविण कोडोलीकर, दिपक देसाई आदी उपस्थित होते.

या दीपोत्सवाच्या आयोजनात प्रविण डांगे, अक्षय मिठारी, अवधूत कोळी, रोहीत फराकटे, पृथ्वीराज निकम आदींनी परिश्रम केले. याकरीता अनेक रंगावलीकारांनी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून रांगोळी काढण्यास प्रारंभ केला होता. या अपूर्व सोहळ्याचा आनंद हजारो नागरिकांनी पहाटे साडेतीनपासून साडेसहा वाजेपर्यंत लुटला.

लक्षवेधी ठरल्या रांगोळ्या

दिपोत्सवाबरोबरच पंचगंगा परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारीत ‘ नका घेऊ फाशी’ जग राहील उपाशी ’ असा संदेश देणारी रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. तर सेल्फीमुळे हौस की वेडेपणा यावरही ‘ माणसाने आपली माणुसकी दाखविण्याचा कहर ’ अशी विडबनात्मक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

‘ तुझ्यात जीव रंगला ’ या एका वाहीनीवर सुरु असलेल्या मालिकेतील ‘राणा दा गणेशाबरोबर कुस्ती करतानाची रांगोळी तर तरुणाईने मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी जणु स्पर्धाच लागली होती. रविवार पेठेतील सत्यनारायण तालीम मंडळाने पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी ‘ विष्णू आणि लक्ष्मी प्रकट ’ झाल्याचा देखावा चक्क नदीत उभा केला होता. ‘

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती ’ अशा स्त्री भू्रण हत्या, देवदर्शन, आदी विषयांवरील रांगोळी काढून रंगावलीकार व मंडळांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. यासह जुना बुधवार पेठेतील ‘ सोल्जर गु्रप ’ ने सोलर सिटीचा आराखडा मॉडेलच्या रुपाने सादर केला होता.

भक्ती गीतांनी दिपोत्सवाला चारचाँद लावले

‘रसिकरंजन‘ तर्फे दिपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्ती गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘व्यंकटेश स्त्रोत्र ’ ने वैदा सोनुले, वैदही जाधव यांनी सुरुवात केली. तर उत्तरोत्तर रंगलेल्या या भक्ती गीतांच्या मैफीत महेश सोनुले, स्वानंद जाधव, निखील मधाळे, विजय दावडे, यांनी अनेक भक्ती व भावगीते सादर करीत रसिकांना अक्षरश: न्हाऊन काढले.
 

पार्किगकरिता स्वयंशिस्त हवी

दिपोत्सव पाहण्यासाठी अक्षरश: शहर लोटत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठा निर्माण होत आहे. अनेक नागरीकांनी पंचगंगा तालीम मंडळ मार्ग, तोरस्कर चौक, शिवाजी पुल चौक या मार्गावर जागा दिसेल त्या ठिकाणी आपली वाहने वेडीवाकडी लावली होती. त्यामुळे अनेक वाहनधारकांना अर्धातासाहून अधिक काळ वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढच्या दिपोत्सवावेळी तरी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे बनले आहे.

 

 

Web Title: Due to Tripurari Purnima, the 'Panchaganga' edge in Kolhapur was brightened by Dip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.