हिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर, कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:44 AM2017-12-03T00:44:21+5:302017-12-03T00:49:15+5:30

कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 The concept of Hindu Rashtra is dangerous to the unity of the country: Irfan Engineer, A.V. Pansare Lecture | हिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर, कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला

हिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर, कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला

Next
ठळक मुद्देधर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जातोययापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी जातीय दंगे झाले, तेथे भाजपची सत्ता आली कॉँग्रेसने मात्र ‘आम्ही सगळे भारतीय’ अशी व्याख्या मांडली.

कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात अठराव्या शतकापर्यंत कधीच जातीय हिंसा, दंगली झाल्या नाहीत. ब्रिटिशांनी मात्र स्वार्थासाठी हिंदू या भौगोलिकतेवर आधारलेल्या शब्दाला धर्माचा रंग दिला आणि जातींमध्ये तेढ निर्माण केली.

आता भाजप आणि संघाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे मूल्य सांगणारी राज्यघटना नाकारून चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित हिंदुराष्ट्र निर्माण करावयाचे आहे. हिंदुराष्ट्र ही संकल्पना भारताच्या एकतेला धोकादायक आहे, अशा परिस्थितीत आपण सामाजिक न्यायासाठी दीर्घकाळ संघर्षाकरिता तयार राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनिअर यांनी शनिवारी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या अवि पानसरे व्याख्यानमालेत त्यांनी ‘जमातवाद आणि जातीय दंगे’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी आनंद मेणसे होते. व्यासपीठावर प्रदीप निंबाळकर, ईर्शाद वडगावकर उपस्थित होते.

इंजिनिअर म्हणाले, सद्य:स्थितीत भाजप आणि संघाला भारताला सांप्रदायिक हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना पुढे केले जात असले तरी दलित, महिला, बहुजन ही त्यांची लक्ष्ये आहेत. काँग्रेस संविधानावर आधारित देश चालवू शकते, अशी एक शक्यता असली तरी त्यांनीही सोयीनुसार सांप्रदायिकतेचे राजकारण केले आहे. अशा परिस्थितीत जनता म्हणून आपण काय करू शकतो, हा मुख्य मुद्दा आहे. ही निवडणुकीची लढाई नाही. २०१९ मध्ये कोणताही पक्ष जिंकला तरी फार फरक पडेल अशा भ्रमात राहता कामा नये. आपण आजवर बोनस, पगार, शेतमालाला हमीभाव अशा कारणांसाठी लढलो. आता त्यासोबतच सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी, महाराणा प्रताप यांनी अकबराशी केलेली लढाई अशा राजवटींच्या लढाया राजनीतीवर आधारलेल्या होत्या. आता मात्र त्यांना धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. ‘भारतीय’ असा व्यापक अर्थ मांडणाºया हिंदू या शब्दाला ब्रिटिशांनी १८६१ साली जनगणना करताना जातीच्या चौकटीत बसविले आणि तेव्हापासून धर्माच्या नावावर दंगे आणि हिंसा सुरू झाली. महात्मा गांधी, मौलाना आझाद हे धार्मिक होते; पण सांप्रदायिक नव्हते; तर सावरकर आणि जिना धार्मिक नव्हते; पण सांप्रदायिक होते. कॉँग्रेसने मात्र ‘आम्ही सगळे भारतीय’ अशी व्याख्या मांडली.
आनंद मेणसे म्हणाले, सामान्य माणूस कधीच जातीयवादी नसतो. ज्यांना सत्ता स्थापन करायची असते, अशा व्यक्तींकडून धर्माचे राजकारण केले जाते. प्रदीप निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ईर्शाद वडगावकर यांनी आभार मानले.

तिथेच भाजपची सत्ता
इंजिनिअर म्हणाले, निवडणूक आली की मुस्लिम हे पाकधार्जिणे असल्याचे सांगत राग निर्माण करायचा. हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचे आणि सत्ता जिंकायची असा आजवर अजेंडा राहिला आहे. देशात यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी जातीय दंगे झाले, तेथे भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये लागणारा निकाल हा २०१९ सालच्या निवडणुकीवर परिणाम करणारा असणार आहे.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अवि पानसरे व्याख्यानमालेत इरफान इंजिनिअर यांनी ‘जमातवाद आणि जातीय दंगे’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी आनंद मेणसे, प्रदीप निंबाळकर, ईर्शाद वडगावकर उपस्थित होते.

Web Title:  The concept of Hindu Rashtra is dangerous to the unity of the country: Irfan Engineer, A.V. Pansare Lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.