चिल्लर पार्टी आता शाळांमध्येही...

By admin | Published: May 15, 2015 12:20 AM2015-05-15T00:20:03+5:302015-05-15T00:20:15+5:30

वर्षपूर्तीनंतरचा परिणाम : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देश

Chillar party is now in schools ... | चिल्लर पार्टी आता शाळांमध्येही...

चिल्लर पार्टी आता शाळांमध्येही...

Next

इंदुमती गणेश - कोल्हापूर -विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ‘चिल्लर पार्टी चित्रपट चळवळ’ आता शाळांमध्येही चालविली जाणार आहे. या चळवळीच्या वर्षपूर्तीचा सकारात्मक परिणाम म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्णातील विविध शाळांनी या उपक्रमाची मागणी केली आहे.
चित्रपट हे असे माध्यम आहे, ज्याचा समाजमनावर खोलवर प्रभाव पडतो. प्रतिष्ठित गुंडगिरी आणि प्रेमाची न समजलेली व्याख्या यांमुळे होणारे अन्याय- अत्याचार यांना बहुतांश प्रमाणात चित्रपटदेखील जबाबदार आहेत. मात्र, त्याचवेळी अनेक चांगले चित्रपटही येतात, ज्यांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात. असे चित्रपट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी शिवाजी मराठा हायस्कूलचे शिक्षक मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून ‘चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी’ला सुरुवात झाली.
पहिली दोन वर्षे केवळ त्यांच्याच शाळेपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम गतवर्षी एप्रिलअखेर ‘चिल्लर पार्टी’ या नावाने कोल्हापुरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू झाला. शाहू स्मारक भवनमध्ये दर महिन्याच्या चौथ्या रविवारी एक चित्रपट यानुसार वर्षभरात देश-विदेशातील टू ब्रदर्स, दिल्ली सफारी, आय अ‍ॅम कलाम, पिस्तुल्या, कॅमेरा, रेड बलून, होम असे उत्तमोत्तम बारा चित्रपट दाखविण्यात आले.
याशिवाय चित्रपट कसा बनवायचा याचे प्रशिक्षणही मुलांना देऊन दोन लघुपट बनविण्यात आले. त्यांचे प्रदर्शन ज्येष्ठ अभिनेते अमोल
पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
हे चित्रपट पाहण्यासाठी सुजाण पालक आणि त्यांचीच मुले येत असल्याचे जाणवले. त्या मुलांनी यावेच; पण सर्वसामान्य आणि तळागाळात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा हे चित्रपट पोहोचणे गरजेचे आहे. या तळमळीतून यादव यांनी ज्या ज्या शाळांमध्ये प्रोजेक्टरची सोय आहे, त्या शाळांमध्ये चित्रपट दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या या प्रस्तावाला अनेक शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम शाळांमध्ये चालविला जाईल.



कशी चालेल ही चळवळ?
महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विशेषत: हा उपक्रम राबविण्याचा उद्देश असून, त्याला महापालिकेच्या शिक्षण सभापती व शिक्षण उपसंचालकांनी मान्यता दर्शविली आहे. याशिवाय पन्हाळा तालुक्यातील १० गावांतील शाळा, करवीरमधील चार, भुदरगड या तालुक्यांतील काही शाळा व शिक्षकांनी त्यात पुढाकार दर्शविला आहे. अगदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनीही चिल्लर पार्टीकडे चित्रपटांची मागणी केली आहे. महिनाअखेरीच्या दिवशी शाळा अर्धा वेळच असल्याने या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविला जाईल. चित्रपटाची सीडी पुरविणे, त्या चित्रपटाची माहिती कशी सांगावी, विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, याबद्दलची माहिती शिक्षकांना व विद्यार्थ्यांना चिल्लर पार्टीच्यावतीने दिली जाईल.

Web Title: Chillar party is now in schools ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.