केवळ ३२ मतदारांसाठी निवडणूक यंत्रणा चिक्केवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:07 AM2019-04-18T01:07:21+5:302019-04-18T01:07:26+5:30

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. ...

 Chikkawadi election system for only 32 voters | केवळ ३२ मतदारांसाठी निवडणूक यंत्रणा चिक्केवाडीत

केवळ ३२ मतदारांसाठी निवडणूक यंत्रणा चिक्केवाडीत

googlenewsNext

प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. येथे फक्त ३२ मतदान असून; त्यासाठी निवडणूक यंत्रणा या गावात नेली जाते तरीही पूर्ण क्षमतेने मतदान होत नाही. लोकप्रतिनिधींसह नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मतदानाबाबत अनास्था दिसत आहे.
गारगोटीपासून ५० किलोमीटरवर रांगणा किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव आहे. पाटगावच्या जंगलातील अतिदुर्गम असलेले हे गाव कोकण व घाटमाथ्याच्या नैसर्गिक सीमेवर आहे. १0 कि.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या तांब्याच्यावाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे हे गाव एक भाग आहे. गावात चार-पाचच घरे आहेत. तीही गवत, मातीची खुपटी. येथे एकूण ३२ मतदार आहेत. यातील तरुण पोटापाण्यासाठी शहरात कामाला असल्याने गावात वयस्कर मंडळीच दिसतात. त्यांचा उदरनिर्वाह म्हैसपालनावर अवलंबून आहे. गावात मोजकीच कामे झाली आहेत. यामध्ये सौरऊर्जेचा समावेश आहे. वनविभागाच्या कायद्यामुळे इतर विकासकामे करताना अडचणी येत आहेत; त्यामुळे येथे विकासाला गती लागलेली दिसत नाही.
गाव अतिदुर्गम असल्याने येथे लोकप्रतिनिधींचाही वावर कमी आहे. ३२ मतांसाठी ५० कि.मी.ची पायपीट करण्याची कोणाचीही मानसिकता दिसत नाही. निवडणुकीची यंत्रणा येथे येऊन कर्तव्य बजावते. मतदान कमी आहे म्हणून त्यांना अन्य केंद्रांवर मतदानासाठी पाठविण्याऐवजी यंत्रणाच गावात लावली जाते. मतदान पूर्ण होईपर्यंत ते थांबतात, हा निवडणुकीचा इतिहास आहे. यंदाही निवडणूक यंत्रणा येथे कार्यान्वित केली आहे. मतदानाबाबत मात्र येथे अनास्था दिसते. आतापर्यंत सुमारे ६० टक्केच मतदान झाल्याचे दिसते. स्थानिक रहिवाशी मतदानाचा हक्क बजावतात. पोटा-पाण्यासाठी शहरात गेलेले मतदानाकरिता येण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे.
मतदान केंद्रावर एक मतदान यंत्र

गावात निवडणूक विभागाकडून उभारलेल्या मंडपात मतदान प्रक्रिया पाडली जाणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांसह पाच कर्मचाऱ्यांची टीम येथे कार्यरत असणार आहे. एका मतदान यंत्रा (ईव्हीएम)वर मतदान होईल. मतदानाच्या चिठ्ठ्याही वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल होणार आहेत.
राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील चिक्केवाडी गावात जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे ३२ इतके मतदान आहे. त्यामध्ये १९ पुरुष व १३ महिला मतदारांचा समावेश आहे.
मुक्काम पोस्ट चिक्केवाडी! : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारांचे गाव असलेल्या चिक्केवाडीत वीज व पाण्याची व्यवस्था आहे. गावातील मतदान जास्तीत जास्त व्हावे, यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. ‘लोकमत’ने बुधवारी या गावास भेट दिली.

Web Title:  Chikkawadi election system for only 32 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.