बजेटमधील निधीत फेरफार --: आम्हीपण शिव्या द्यायच्या का? नगरसेविकेचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:37 AM2019-06-20T00:37:29+5:302019-06-20T00:38:09+5:30

‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) धरण्यात आलेल्या विकास निधीत सत्तारूढ गटाने मोठ्या प्रमाणात बदल केले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी

 Changing the funding of the budget - why do we give it to Shiva? Resentment of corporator | बजेटमधील निधीत फेरफार --: आम्हीपण शिव्या द्यायच्या का? नगरसेविकेचा संताप

कोल्हापूर महानगरपालिका सभेत बुधवारी असमान निधी वाटप केल्याबद्दल भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या पुस्तकाची सभागृहात पूजा केली आणि आमच्यावरील अन्याय दूर करा म्हणून हे अंदाजपत्रक आयुक्तांकडे सुपूर्द केले.

Next
ठळक मुद्देविरोधकांचा सभात्याग : महापालिका सभेत अंदाजपत्रकाची पूजा करून निषेध

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) धरण्यात आलेल्या विकास निधीत सत्तारूढ गटाने मोठ्या प्रमाणात बदल केले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. त्यापूर्वी त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची सभागृहातच पुष्पहार घालून तसेच हळद-कुंकू लावून पूजा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विकासकामांकरिता अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या निधीचा विषय उपस्थित केला. त्यावर विरोधी सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. स्थायी समितीने ज्या कामांसाठी निधीची तरतूद केली होती, अशी अनेक कामे अंदाजपत्रकाच्या पुस्तकात दिसत नाहीत. मग हा निधी कोठे गेला, कोणत्या कामांकरिता धरण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली.
सत्ता तुमची आहे म्हणून काहीही करता का? कोणाला विचारून हे बदल केले? असे सवाल करीत अंदापत्रकातील फेरबदल आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कदम यांनी सभेत दिला. आमच्या आघाडीच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार कदम यांनी यावेळी केली.
निषेध म्हणून विरोधी गटाच्या सदस्यांनी सभागृहातच अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची पूजा केली. यावेळी पुस्तकास पुष्पहार घातला, हळद-कुंकू वाहिले, नारळ अर्पण केला आणि हे पुस्तक आयुक्तांकडे सादर करीत आम्हांला तुमच्याकडून न्याय अपेक्षित असल्याचे कदम यांनी सांगितले.

सहायक आयुक्त संजय सरनाईक यांनी समाधानकारक उत्तर न देता, ‘महापालिकेचा निधी कोणत्या कामावर किती खर्च होणार आहे, याची सगळी माहिती पुस्तकात असल्याने वेगळी माहिती देण्याची आवश्यकता नाही,’ असे सांगताच सत्यजित कदम पुन्हा भडकले.
आम्हाला अंदाजपत्रकातील काही कळत नाही. तुम्ही आम्हाला माहिती द्या, अशी त्यांनी सुूचना
केली. तेव्हा सरनाईक यांनी ‘जेथे बदल झाले आहेत त्यांची माहिती तुम्हाला दिली जाईल,’ असे सांगितले. तरीही विरोधी गटाच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

पोवार यांचा इशारा

सभागृह नेते दिलीप पोवार महापालिकेच्या शाळेतील दर्जा वाढविण्याच्या अनुषंगाने काही सूचना करीत होते. त्याच वेळी त्यांच्या मागे शेवटच्या बाकावर बसलेल्या काही सदस्यांची आपापसांत चर्चा सुरू होती. एक-दोनदा सूचना करूनही सदस्य गप्प बसत नाहीत म्हटल्यावर दिलीप पोवार संतप्त झाले. मागील सदस्य आपल्याला काहीतरी म्हणत आहेत अशा समजातून पोवार यांनी त्यांना कोल्हापुरी भाषेत सज्जड इशारा दिला. उपमहापौर भूपाल शेटे दंगेखोर नगरसेवकांना समज दिली. दुसरीकडे पोवार यांना प्रा. जयंत पाटील, तौफिक मुल्लाणी यांनी शांत केले.

प्रस्ताव आठ दिवसांत
अश्विनी बारामते यांनी कृष्ण-कृष्णाईनगर, चिले कॉलनी ते यल्लम्मा मंदिर या मार्गावरील विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला. योग्य वेळेत कामे न झाल्यामुळे निधी परत जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. नगरोत्थान, ‘अमृत’मधील कामे रखडल्यामुळे नवीन प्रस्ताव पाठविले नाहीत; त्यामुळे सरकारकडून निधी मिळालेला नसल्याची तक्रारही यावेळी झाली. तेव्हा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आठ दिवसांत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू, असे सांगितले. ‘अमृत’ व नगरोत्थान योजनेचे प्रस्ताव लवकर तयार केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.

आम्हीपण शिव्या द्यायच्या का?
नगरसेविकेचा संताप : मुकादम पैसे घेत असल्याचा आरोप

कोल्हापूर : जर शिव्या देणाऱ्या नगरसेवकांनाच त्यांच्या प्रभागात पुरेसे सफाई कामगार मिळणार असतील, तर मग आम्हीपण शिव्याच द्यायच्या का? असा संतप्त सवाल बुधवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला विचारला. असमान कामगार वाटपावरून सभेत सर्वच सदस्यांनी आरोग्य विभागावर टीकेची झोड उठविली. आरोग्य विभागातील मुकादम केवळ पैसे उकळण्याचे काम करीत असल्याचा आरोपही यावेळी झाला.
प्रभागातील सफाईकरिता प्रत्येक भागात कामगारांचे असमान वाटप झाले असून, एकेका प्रभागात १५ ते २० कामगार आहेत; तर दुसरीकडे सात ते आठ कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रभागातील सफाईच्या कामावर परिणाम होत असल्याची ओरड बुधवारच्या सभेत सदस्यांनी केली. अश्विनी बारामते यांनी या संदर्भातील विषय उपस्थित केला आणि सफाई कामगार मागूनही मिळत नसल्याची तक्रार केली. रूपाराणी निकम तर यावर प्रचंड संतापल्या. गेले वर्षभर मागणी करूनही सफाई कामगार मिळत नाहीत, हे वास्तव आहे. शिव्या देणाºया नगरसेवकांनाच जर कामगार मिळणार असतील, तर आम्हीपण शिव्याच द्यायच्या का? असा सवालच त्यांनी विचारला.

सत्यजित कदम यांनी सफाई कामगार बायोमेट्रिक मशीनवर हजेरी दिली की निघून जातात, कामे करीत नाहीत, असे निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांच्या घरात तीन-तीन महिला कामगार कामाला आहेत. आरोग्य विभागावर होणारा सगळा खर्च फुकट जात असल्याचे कदम यांनी सांगितले. कामगार कधीही खोरे हातात घेत नाहीत. मुकादम तर हप्ते गोळा करीत फिरत असतात, असा आरोप नकाते यांनी केला.

सदस्यांच्या तीव्र भावनांची दखल घेत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागातर्फे समान कामगार वाटप करण्यात येईल. याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील, असे सांगतानाच जे कर्मचारी कामात हयगय करतील त्यांची गय केली जाणार नाही. त्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा दिला.

स्विपिंग मशीन बोगस असल्याचा आरोप
स्विपिंग मशीन बोगस असून केवळ महानगरपालिकेच्या पैशांची लूट केली जात आहे. त्यामुळे हे मशीन तत्काळ बंद करून टाका, अशी सूचना तौफिक मुल्लाणी यांनी सभेत केली. त्यावर, जे चुकीचे आहे त्याला पाठीशी घालणार नाही. स्वीपिंग मशीनबद्दल तक्रारी आल्यामुळे ते सध्या बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

माणसं मेल्यावर जागे होणार का?
संभाजीनगर येथील कामगार चाळीची इमारत धोकादायक असून केव्हाही कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्या जागेवर नवीन इमारत बांधायची होती. मात्र हा प्रस्ताव का मागे घेतला?असा सवाल नगरसेवक गायकवाड यांनी विचारला. त्यावर उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितले की, ही इमारत महापालिकेच्या मालकीची असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतून विकसित करण्यास ‘म्हाडा’ने नकार दिला आहे. आपण स्वत: विकसित करायची असेल तर इस्टेट विभागाकडून प्रस्ताव केला पाहिजे.

सदस्य ठरावावरून ठाणेकर संतप्त
सभेत होणाºया सदस्य ठरावावरून अजित ठाणेकर यांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांना धारेवर धरले. सदस्य ठरावांना प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जाते हा सभागृहाचा, नगरसेवकांचा अपमान आहे. नगरसचिवांनी या ठरावांचे होते काय याचे उत्तर द्यावे, अशी सूचना ठाणेकर यांनी केली. ठाणेकर बोलत असताना कारंडे हसत असल्याचा समज झाला. त्यामुळे ठाणेकर संतप्त झाले. ‘हसताय काय?’ असे विचारत ते पुढे गेले. पुढील सभेपूर्वी सदस्य ठरावाची माहिती देण्याची सूचना त्यांनी केली.

धोकादायक कामगार चाळ
कामगार चाळ धोकादायक असून, एकूण पाच इमारतींत ८० कुटुंबे राहत असल्याची माहिती उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिली. जर या इमारती धोकादायक असतील तर त्या तत्काळ पाडल्या पाहिजेत. धोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा महापालिका अन्य इमारत मालकांना देत असेल तर महापालिकेनेही त्याची अंमलबजावणी स्वत:पासून केली पाहिजे. जर दुर्घटना घडली तर प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संतोष गायकवाड यांनी दिला.

 

Web Title:  Changing the funding of the budget - why do we give it to Shiva? Resentment of corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.