चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा : बालगोपालला नमवून ‘खंडोबा’ साखळी फेरीत; २-१ ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:26 AM2019-03-16T11:26:28+5:302019-03-16T11:28:57+5:30

साईराज दळवीच्या दोन गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ फुटबॉल संघाने यजमान बालगोपाल तालीम मंडळाचा २-१ असा पराभव करीत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.

Chandrakant Cup football championship: Balgopal to win 'Khandoba' league 2-1 over | चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा : बालगोपालला नमवून ‘खंडोबा’ साखळी फेरीत; २-१ ने मात

 कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व यजमान बालगोपाल तालीम मंडळ संघात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देबालगोपालला नमवून ‘खंडोबा’ साखळी फेरीतचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा :२-१ ने मात

कोल्हापूर : साईराज दळवीच्या दोन गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ फुटबॉल संघाने यजमान बालगोपाल तालीम मंडळाचा २-१ असा पराभव करीत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी ‘खंडोबा’ व ‘बालगोपाल’ या दोन तुल्यबळ संघात बाद फेरीतील अखेरचा सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘खंडोबा’कडून स्वराज्य दळवी, प्रभू पोवार, प्रणव घाटगे, प्रतीक सावंत, कपिल शिंदे यांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले; तर ‘बालगोपाल’कडून बबलू नाईक, ऋतुराज पाटील, राकेश दास, लुकी मायकेल, इडाची यांनीही प्रतिआक्रमण करीत गोल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांच्यात समन्वय व अचूक पासिंग नसल्याने गोल करण्यात त्यांना यश आले नाही. ३४ व्या मिनिटास ‘खंडोबा’च्या साईराज दळवी याने मिळालेल्या संधीवर वेगवान गोलची नोंद करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर ‘बालगोपाल’च्या गोलक्षेत्रात पुन्हा जोरदार मुसंडी मारत खंडोबाच्या अजीज मोमीनने गोल करण्याचा प्रयत्न केला. यात ‘बालगोपाल’चा गोलरक्षक पुढे आल्याची संधी त्याला साधता आली नाही. त्यानंतर ‘बालगोपाल’कडून लुकी मायकेललाही खंडोबाचा गोलरक्षक पुढे आल्याची संधी साधत गोल करता आला नाही. त्यामुळे पूर्वार्धात ‘खंडोबा’ने १-० अशी आघाडी घेतली.
उत्तरार्धात ‘बालगोपाल’कडून आक्रमक व वेगवान चाली रचल्या जातील असा कयास फुटबॉलप्रेमींंकडून होता. मात्र, बालगोपाल संघाकडून समन्वय नसल्याने अनेक वेळा खंडोबाच्या गोलक्षेत्रात धडक मारूनही गोल करता आले नाही.

विशेष म्हणजे बालगोपाल संघास सहा कॉर्नर किक मिळाल्या. मात्र, त्यांचे रूपांतर त्यांना गोलमध्ये करता आले नाही. उलट ४९ व्या मिनिटास ‘खंडोबा’कडून साईराज दळवीने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल नोंदवत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर बालगोपाल संघाने आघाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले.

त्यात ५३ व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून लुकी मायकेलने गोल करीत २-१ ने आघाडी कमी केली. त्यानंतर अखेरपर्यंत बालगोपालकडून बरोबरी, तर ‘खंडोबा’कडून आघाडी वाढविण्याचे प्रयत्न झाले. अखेरीस हा सामना खंडोबा संघाने २-१ अशा गोलफरकाने जिंकत स्पर्धेची साखळी फेरी गाठली.

आज, शनिवारी सामना होणार नाही. रविवारपासून साखळी फेरीला सुरुवात होत आहे. यात रविवारी दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ या दोन तुल्यबळ संघांत लढत होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • सामनावीर - कुणाल दळवी (खंडोबा)
  • लढवय्या खेळाडू - लुकी मायकेल (बालगोपाल)

 

 

Web Title: Chandrakant Cup football championship: Balgopal to win 'Khandoba' league 2-1 over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.