इंदूमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्राला संगीत नाटकांची फार मोठी परंपरा आहे. काळानुसार संगीत नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असले तरी या नाटकांचा स्वतंत्र असा एक प्रेक्षकवर्ग आहे. संगीत नाटकांचे प्रयोग सादर व्हावेत यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणारा निधी खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने नाटकांचे मर्यादित प्रयोग सादर होतात. त्यामुळे ‘अनुदान आहे पण लाभ घेता येईना’ अशीच या क्षेत्राची अवस्था झाली आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या कलासंस्कृतीत संगीत नाटकांचे अमूल्य योगदान आहे. दीडशे वर्षांहून मोठी परंपरा असलेल्या संगीत नाटकांना राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि ही कला राज्यभर रूजली. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या ‘किचकवध’ या नाटकातील दृश्यांचे किस्से आजही सांगितले जातात. बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसलेंपासूनची ही परंपरा अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. त्याकाळी नागरिकांना मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते. त्यामुळे नाटक हेच सामाजिक प्रबोधनाचेही माध्यम होते. गडकरींच्या ‘एकच प्याला’सारख्या सामाजिक संदेश देणाºया नाटकापासून ते ‘मत्सगंधा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’सारख्या विनोदी नाटकांपर्यंतचे विविध कलाकृती प्रेक्षकांनी अनुभवली. त्याकाळी ही नाटके रात्री आठ नऊ वाजता सुरू झाली की पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालत.
आताचा प्रेक्षक एकाजागी एवढा वेळ बसू शकत नाही. त्यामुळे संगीत नाटके सहा तासांवरून अडीच तीन तासांवर आली. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य प्रेक्षक संगीत नाटकांपासून दुरावला आणि समांतरलिखित पद्य नाटकांकडे ओढला गेला. त्यामुळे संगीत रंगभूमीची पीछेहाट झाली. मात्र, महाराष्ट्राला लाभलेली ही समृद्ध परंपरा जपण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला व एका संगीत नाटकाला २५ हजार रुपयांचे अनुदान सुरू केले. आता ही रक्कम ३० हजार रुपये झाली आहे. मात्र, अनुदानापेक्षा नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा, रंगमंचीय व्यवस्था, कलाकारांचे मानधन यांचे व्यस्त प्रमाण असल्याने संस्थांना अनुदानाचा लाभ घेता येत नाही, अशी स्थिती आहे. आताचा संगीत नाटकांचा प्रेक्षक मर्यादित आहे किंबहुना तो जुन्या पिढीतला आहे. त्यामुळे संस्थेच्या जोरावर नाटकाचा प्रयोग लावलाच तर किती प्रतिसाद मिळेल हे सांगता येत नाही. शहरांतर्गत प्रयोग लावणे अन्य शहरांत प्रयोग करण्यापेक्षा तुलनेने कमी खर्चिक असते.
खर्च ५० हजारांच्या पुढे..
संगीत नाटकांचा नेपथ्य. रंग-वेशभूषा हा वादक असा मोठा असतो त्यामुळे अन्य शहरांमध्ये प्रयोग करायचा म्हणजे प्रवासखर्च, कलाकारांच्या निवासाची जेवणाची सोय, नाट्यगृहाचे भाडे, नेपथ्य हे सगळे तीस हजारांत बसूच शकत नाही. हा खर्चच जातो ५० ते ६० हजारांपर्यंत त्यामुळे व्यावसायिक संस्थाही बाहेरगावी प्रयोग करण्यासाठी फारसे धजावत नाहीत.
नवनिर्मिती आणि कलाकारांचा अभाव
संगीत नाटके पौराणिक कथांवर आधारलेली असतात. या नाटकांच्या प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने गायन आणि अभिनय या दोन्ही पातळीवर सक्षमच असावे लागते. आताच्या पिढीत हा मेळ कमी प्रमाणात असतो. नवीन नाटकाला एकदा का राज्य नाट्यमध्ये यश मिळाले की नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येते त्यामुळे दर्जाच्या पातळीवर राज्य नाट्यमध्ये टिकणे हेच मोठे आव्हान असते. ते फारच कमी संस्था पेलू शकतात.

शासनाने हे अनुदान जाहीर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यात किमान पन्नास टक्के नाटके ही शहराबाहेर सादर झाली पाहिजेत, तिकीट दर मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये, खर्चाचा हिशेब ठेवणे, कागदोपत्री सादरीकरण अशा काहीशा किचकट बाबी असल्याने त्या निकषांत बसणेही संस्थांना अवघड जाते. त्यामुळे या नाटकांचे प्रयोग सादर होत नाहीत.
- प्रफुल्ल महाजन (नाट्यवितरक)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.