ठळक मुद्दे : ‘गोकुळ’ प्रशासनाकडून शिल्लक रक्कम बॅँकेत ठेवताना निकष धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ प्रशासनाने पूर्वीच्या बल्क कुलर रकमेचा वापरही न करता अहवाल सालात २ कोटी ७२ लाखांची बल्क कुलरची नव्याने खरेदी कशासाठी केली, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी संघाला पत्राद्वारे केला आहे. संघाची शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी संबंधित बॅँकेचा एनपीए पाहून सक्षमतेनुसार ठेवण्याचे आदेश सहकार विभागाचे असताना ते निकष धाब्यावर बसविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बल्क कुलर बसविण्यासाठी दुग्ध विभागाची परवानगी घेतली आहे का? एकूण बल्क कुलर किती, त्यात जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर किती बसविले याची माहिती द्या. संघाकडील शिल्लक ५४ कोटी ३ लाख रक्कम चालू खात्यावर आहे.

ही रक्कम यूथ बॅँक, पार्श्वनाथ बॅँक, वीरशैव बॅँकेत ठेवली आहे. या बॅँकांचा नेट एनपीए शून्य टक्के आहे का? सहकार कायद्याचे उल्लंघन करण्यामागे कोणाचा ‘रस’ आहे? ठरावीक बॅँकांमध्ये विनाव्याज एवढी मोठी रक्कम ठेवण्यामागे संचालक मंडळाचा कोणता उद्देश आहे? गोकुळ शिरगाव, नवी मुंबई व पुणे येथे दुधाच्या वाहतुकीसाठी संघ मालकीचे टॅँकर्स वगळता उर्वरित १०० टॅँकर भाड्याने घेत असताना त्याच्या निविदा कशा मागविल्या? असे प्रश्न त्यांनी संघ व्यवस्थापनाला विचारले आहेत.

साधारणत: सर्वच संस्थांच्या सभा दुपारी एक वाजता ठेवल्या जातात; पण ‘गोकुळ’ने सकाळी अकरा वाजता बोलावली आहे. सभासद उपस्थित राहूच नयेत, यासाठी वेळ बदलल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
संघाने सर्वांना आॅनलाईन बॅँकीगची सक्ती केली मात्र ज्या ठिकाणी बॅँकिंग नेटवर्क नाही, अशा ठिंकाणी संघ काय व्यवस्था केली, अशी विचारणा आमदार पाटील यांनी केली आहे.

सर्वसाधारण सभा उद्या; विरोधक थंडच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात होत आहे. गेल्यावर्षी विरोधी गटाने आक्रमकपणे तयारी करत सत्तारूढ गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने सभा गाजली होती; पण यंदा विरोधकांची तयारी पाहता नियमित प्रश्न वगळता फारसा आक्रमकपणा दिसण्याची शक्यता कमी आहे.
गेल्यावर्षी निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण यावेळेला त्यांच्या गटाने विहीत वेळेत ३४ लेखी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये वाहतुकीचा ठेका देताना काढलेले टेंडर, त्यासाठी ५० लाख रुपये ठेवलेली बयाणा रक्कम, वाहनासाठी डिझेल-पेट्रोलवर झालेला ९६ लाखांचा खर्च त्याचबरोबर वाहनभाड्यावर दोन कोटींचा खर्च, वासाचे दूध असे विविध प्रश्न आमदार पाटील यांच्या गटाने केले आहेत.

सतेज पाटील यांचे प्रश्नगोकुळ शॉपी अपहाराची रक्कम व्याजासह वसूल झाली का?
नोकरभरतीसाठी कोणते निकष लावले, त्याला शासनाची मान्यता आहे का?
बंद संस्थेकडील पशुखाद्याच्या थकबाकीबाबत कोणती कार्यवाही केली?
संचालकांचा प्रवास खर्च मंजुरीपेक्षा जादा कसा?
सर्वसाधारण गटातील तीन संचालक वाढीची कारण काय?
दुय्यम प्रतीचे दूध किती? चांगल्या प्रतीच्या दूधवाढीसाठी काय प्रयत्न केले?
तिसंगी येथील भेसळीबाबत संघाने कोणती कारवाई केली?