ठळक मुद्देजयप्रकाश रामानंद यांची माहिती रांगोळीतील महिलेला पोटात दुखणे, चक्कर येणे असा होता त्रास

कोल्हापूर , दि. १७ :  किडनीच्या वरील भागावर असलेली अ‍ॅड्रीनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) काढण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोल्हापूर जिल्हयातील रांगोळी (ता. हातकणंगले) येथील सुमती राजगोंडा पाटील (वय, ३२) या महिलेवर ही विनामुल्य शस्त्रक्रिया करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयामधील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.


डॉ. रामानंद म्हणाले, रांगोळीतील सुमती पाटील यांना महिन्यापुर्वी सीपीआर रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांच्या पोटात दुखत होते तर वारंवार चक्कर येत होती.याच्यामुळे त्या त्रस्त होत्या. त्यामुळे शस्त्रक्रिया विभागातील डॉ.विजय कस्सा व त्यांच्या पथकाने पाटील यांच्या सर्व तपासण्या केल्या.

तपासणीमध्ये अ‍ॅड्रीनल ग्रंथीची गाठ असल्याचे निदान दिसून आले. ही गाठ उजव्या अ‍ॅड्रीनलमध्ये साधारण चार सेंटिमीटर आकाराची आहे. अ‍ॅड्रीनल ग्रंथी ही शरीराच्या विविध कार्यावर आपल्या विकाराद्वारे (हार्माेन्स) नियंत्रण ठेवते. एपिनेफ्रिनमुळे शरीराचे रक्त दाब नियंत्रणात राहते तर अल्डोस्ट्रोन नावाचे विकार शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

इतर काही स्त्राव शरीराच्या वाढीसाठी व जनेंद्रीयाच्या विकासासाठी गरजेचे असतात. अ‍ॅड्रेनलच्या गाठीमुळे स्त्राव अ‍ॅड्रेनल अनियमित निर्माण होऊन या क्रिया वाढ यात बिघाड होऊ शकतो. साधारण अ‍ॅड्रेनल ग्रंथीच्या पाच ते सात टक्के गाठी या कॅन्सरच्या असू शकतात व यातील १५ टक्के गाठी या अनुवंशिक असतात. सर्व तपासण्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला.


डॉ. कस्सा यांच्यासह डॉ. वासिम मुल्ला, डॉ. सत्येंद्र ठोंबरे, डॉ. प्रसाद, डॉ. रजनीश यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. सुमारे दोन ते अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. त्यांना विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पवार यांचे सहकार्य लाभले. पत्रकार परिषदेस वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य सुनील करंबे आदी उपस्थित होते.

इचलकरंजी येथे खासगी रुग्णालयात पहिल्यांदा उपचार घेतले. तेथे २० हजार रुपये बिल देऊनही काही उपयोग झाला नाही.अखेर सीपीआरमध्ये अ‍ॅड्रीनल ग्रंथीच्या गाठीचे निदान झाले.ही शस्त्रक्रिया विनामुल्य शस्त्रक्रिया केली आहे.
-सुमती पाटील, रांगोळी.