जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:56 AM2018-08-13T00:56:49+5:302018-08-13T00:56:54+5:30

70,000 hectares of sugarcane 'Tambera' in the district | जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर पावसाची उघडझाप राहिली, तर वाढ चांगली होऊन उसाचा उतारा चांगला मिळतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जास्त असला, तरी उघडझाप असायची; पण यंदा गेले सव्वा दोन महिने एकसारखा पाऊस आहे; त्यामुळे जमिनीला वापसा मिळत नाही, याचा परिणाम सर्वच खरीप पिकांवर झाला आहे. या हवामानाचा सर्वाधिक फटका उसाला बसला आहे. उसाच्या सऱ्यांतील पाणी कमी होत नसल्याने वाढ खुंटली आहे. त्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाची तीव्रता इतकी प्रचंड आहे, की अखंड उसाचा प्लॉटच तांबडाभडक दिसत आहे. उसाच्या पानाखाली बघितले की तांबूस रंगाच्या पावडरीचा थर आपणास पाहावयास मिळतो. ‘तांबेरा’ पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने खोडाची ताकद कमी होते. सध्या पानांतून खोडात साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावेळीच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाढीबरोबरच उताराही घटणार आहे.
हंगाम दोन महिन्यांवर आला आहे; त्यामुळे आता उसाची उंची फार वाढणार नाही. आता साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पावसाचा जोर आणि शेतकºयांना घोर

साधारणत: आपल्याकडे १ आॅगस्टपासून उसाच्या आडसाल लावणी सुरू होतात. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने लावणीच्या उगवणीस मदत होते; पण सध्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकºयांचा घोर वाढला आहे. लावण केलेल्या उसाचे बियाणे पाण्याखाली गेले, तर कुजण्याची भीती असते.
हे करावे शेतकºयांनी :
‘दायथेनिअम-४५’ पावडर ३० ग्रॅम त्यात १९ : १९ : १९ खत ७५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी. उसात फवारणी करताना सगळे औषध अंगावरच पडते, यासाठी खांद्यावर झेंडा घेतल्यासारखा पंपाचा नोजल घेऊन फवारणी करीत सरीतून पुढे सरकत गेल्यास औषधाची फवारणी पानावर होते. अरुंद सरी आणि गच्च पाल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होतो, यासाठी उसाची लावण करतानाच मोठी सरी सोडावी व उसाला पाला सुटतो, त्यावेळी पाला काढून सरी मोकळी ठेवल्यास हवा खेळती राहते.

Web Title: 70,000 hectares of sugarcane 'Tambera' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.