33 unauthorized cabins were deleted in the city | शहरात ३३ अनधिकृत केबिन हटविल्या


कोल्हापूर : सलग सुट्यांमुळे गेले आठवडाभर थांबलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी पुन्हा राबविण्यात आली. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोहीम राबवून सुमारे ३३ केबिन, १६ साईन बोर्ड, ११ शेड व १० ठिकाणच्या छपºया काढल्या. दरम्यान, रंकाळा स्टँड चौकातील दोन केबिन हटविण्यास शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विरोध दर्शविला. कारवाई केल्यास उद्रेकास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला, अधिकारी निष्प्रभ ठरले. अखेर पोलीस बंदोबस्त नसल्याने दोन दिवसांची मुदत देत अतिक्रमण निर्मूलन पथकास माघारी फिरावे लागले.
मंगळवारी सकाळी ही मोहीम शिवाजी चौकातून सुरू झाली. शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपाची कमान, जोतिबा रोडचा काही भाग आणि बिंदू चौक सबजेलमार्गे कारवाई बिंदू चौकाच्या दिशेने गेली.
त्यावेळी जोतिबा रोडवर फूलविक्रेत्यांची शेड्स हटविताना काही महिला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या आडव्या आल्या; त्यामुळे काहीवेळ वादावादी झाली. त्यानंतर ही मोहीम गंगावेश, शाहू उद्यान परिसरात राबविली.
त्यानंतर पाडळकर मार्केटमार्गे रंकाळा स्टँड चौक परिसरात ही मोहीम आली असता तेथे दोन केबिन हटविण्यावरून वादाला तोंड फुटले. या परिसरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख धनाजी दळवी यांनी केबिन हटविण्यास विरोध दर्शविला. बळाचा वापर करून केबिन हटविल्यास प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा यावेळी पथकास दिला.

प्रथम आयुक्तांशी चर्चा घडवा, मगच केबिन हटवा
रंकाळा स्टँड चौकातील मोबाईल शॉपी आणि घड्याळ विक्री ही दोन केबिन हटविताना त्याला धनाजी दळवी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. गेल्या आठवड्यात आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी अधिकाºयांनी आयुक्तांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा आधार घेत दळवी यांनी प्रथम फेरीवाले झोनबाबत आयुक्तांशी चर्चा घडवा, मगच केबिन हटवा अशी भूमिका घेतली. तणावजन्य परिस्थितीत चारही उपअभियंत्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून घटनास्थळाची वस्तुस्थिती मांडली. त्यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे ही कारवाई थांबविली; तसेच केबिन दोन दिवसांत काढून घ्याव्यात, असे दळवी यांना बजावून पथके माघारी फिरली.
बांगड्यांचा आहेर
आणि संतप्त कर्मचारी
गेल्या महिन्यात काही वेळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या गटाने महापालिकेच्या प्रशासनाला बांगड्यांचा आहेर भेट दिला. त्याचाही आधार घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी मोहीम थांबल्याने संतापून चर्चा करीत होते.