आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलीसांची आर्मीवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 06:00 PM2018-04-30T18:00:29+5:302018-04-30T18:00:29+5:30

उपांत्यपूर्व लढतीत मध्य रेल्वेने आयकर(पुणे) संघाचा रोमहर्षक लढतीत 30-28 असा पराभव केला. आता त्यांची गाठ महाराष्ट्र पोलीसांशी पडेल.

MLA Kabaddi Kabaddi: Maharashtra Police defeats Army | आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलीसांची आर्मीवर मात

आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलीसांची आर्मीवर मात

Next
ठळक मुद्देपुण्याच्या बीईजीने एअर इंडियाचे कडवे आव्हान 39-37 असे परतावून लावले.

मुंबई : पहिल्या डावातील पिछाडीनंतर महेश मकदूमने केलेल्या अफलातून चढाया आणि त्याला महेंद्र राजपूतच्या लाभलेल्या साथीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीसांनी नाशिक आर्मीवर 35-22 अशी सहज मात करीत आमदार चषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अन्य उपांत्यपूर्व लढतीत मध्य रेल्वेने आयकर(पुणे) संघाचा रोमहर्षक लढतीत 30-28 असा पराभव केला. आता त्यांची गाठ महाराष्ट्र पोलीसांशी पडेल. तसेच पुण्याच्या बीईजीने एअर इंडियाचे कडवे आव्हान 39-37 असे परतावून लावले. आता ते उपांत्य फेरीत देना बँकेला 32-22 असे सहज हरवणाऱया भारत पेट्रोलियमशी भिडतील.

तब्बल अडीच हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या चवन्नी गल्लीत मध्य रेल्वे आणि आयकर पुणे यांच्यातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना रोमहर्षक झाला. रेल्वेसाठी तूफानी खेळ करणाऱया श्रीकांत जाधवने आजही आपल्या तूफानाचा झटका आयकरला दिला. श्रीकांत दोनदा दोन-दोन गडी बाद करून आयकरला बाद केले. त्याला गणेश बोडकेनेही सुरेख साथ दिल्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा मध्य रेल्वेकडे 19-11 अशी जबरदस्त आघाडी होती. मात्र उत्तरार्धात अक्षय जाधव आणि निलेश साळुंखेने कल्पक खेळ करीत पिछाडीही भरून काढली. सामना संपायला चार मिनीटे असताना त्यांनी 25-25 अशी बरोबरीही साधली होती, पण श्रीकांतची एक वेगवान चढाई आयकरला चांगलीच महागात पडली. त्यामुळे हा सामना 30-28 असा दोन गुणांनी रेल्वेने जिंकला.

तगड्या पोलीस आणि बलाढ्य आर्मी या संघांतील द्वंद्व पाहायला आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण हे चढाया-पकडींचे युद्ध रंगलेच नाही.  नाशिक आर्मीने नरेंदर आणि दर्शनच्या जोरावर पूर्वार्धात 13-11 अशी दोन गुणांची का होईना आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात महेश मकदूमने एकाच चढाईत टिपलेले चार गडी पोलीसांसाठी स्फूर्तीदायक ठरले. झटपट एकामागोमाग दोन लोण चढवत महाराष्ट्र पोलीसांनी हा सामना 35-22 असा सहज आपल्या खिशात घातला. महेशला महेंद्र राजपूत, सुलतान डांगे आणि बाजीराव होडगेनेही चांगली साथ दिली. तसेच एअर इंडिया आणि बीईजी पुणे यांच्यातील सामनाही पैसा वसूल होता. या लढतीत एअर इंडियाला सिद्धार्थ देसाई आणि मोनूच्या चढायांमुळे 24-20 अशी आघाडी मिळाली. बीईजीच्या रंजीत आणि रवी यांनीही जोरदार चढाया करीत एअर इंडियाला जास्त आघाडी घेऊ दिली नाही. मध्यंतरानंतर एअर इंडिया सुसाट झाली. त्यांनी 30-21 अशी जबरदस्त आघाडी घेतली, पण बीईजीच्या रंजीतने ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. एकेक करत त्यांनी एअर इंडियाला गाठले आणि शेवटच्या दोन मिनीटात आघाडी 39-37 अशी वाढवत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.

दिवसाची शेवटची लढतही रंगतदार झाली. काल महिंद्रावर चढाई करणाऱया देना बँकेच्या नितीन देशमुखने आजही जोरदार खेळ केला.मध्यंतराला गुणफलक 12-10 असा संथ होता. तेव्हा भारत पेट्रोलियमच्या नितीन मदनेने वेगवान चढाया करीत गुणफलकालाही वेगवान केले. अवघ्या पाच मिनीटात त्याने 12-10 वरून गुणफलक 21-11 वर नेला. त्यानंतर देना बँकेच्या पंकज मोहितेने आधी चढाईत तीन आणि नंतर चार गडी बाद करीत पेट्रोलियमवर लोणच लादला नाही तर 21-22 असा गुणफलकही केला. मात्र त्यानंतर पेटून उठलेल्या मदने आणि सुरिंदरने देना बँकेची कोंडी करीत गुणांचा पाऊस पाडला. दरम्यान त्यांनी नितीन आणि पंकजचीही पकड करून सामन्यावर आपली पकड घट्ट केली. अखेर हा सामना भारत पेट्रोलियमने 32-20 असा जिंकत सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: MLA Kabaddi Kabaddi: Maharashtra Police defeats Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी